कोरोना : कोव्हिड रुग्णालयात दाखल होण्यासाठी पॅाझिटिव्ह रिपोर्ट सक्तीचा नाही
शनिवार, 8 मे 2021 (20:00 IST)
कोव्हिड रुग्णालयात दाखल होण्यासाठी पॅाझिटिव्ह रिपोर्ट सक्तीचा नसल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलंय. रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याबाबतचं राष्ट्रीय धोरण केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज जाहीर केलंय.
रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्याबाबतचं राष्ट्रीय धोरण काय आहे आपण पाहूयात.
संशयित रुग्णांना गरजेप्रमाणे कोव्हिड केअर सेंटर, कोव्हिड हेल्थ सेंटर आणि कोव्हिड रुग्णालयात संशयित वॅार्डमध्ये दाखल केलं जावं.
कोव्हिड रुग्णालयात दाखल होण्यासाठी पॅाझिटिव्ह रिपोर्ट सक्तीचा नाही.
कोणत्याही परिस्थितीत रुग्णाला उपचार नाकारले जाऊ नयेत, रुग्ण दुसऱ्या शहरातला असला तरी त्याला उपचार आणि औषधं द्यावीत, ऑक्सिजनची गरज असल्यास तो देखील पुरवण्यात यावा.
ज्या शहरात रुग्णालय आहे त्या विभागातील कायदेशीर मान्यता असलेलं ओळखपत्र रुग्णाकडे नसलं तरी त्याला दाखल करून घेऊन उपचार द्यावेत.
रुग्णालयात दाखल होण्याची गरज नसलेल्यांना बेड्स देण्यात येऊ नयेत. हॉस्पिटलमध्ये राहण्याची गरज नसलेल्या व्यक्ती बेड्स अडवून ठेवणार नाहीत, याची काळजी घ्यावी.
नवीन डिस्चार्च पॉलिसीच्या आधारे रुग्णांना हॉस्पिटलमधून रजा देण्यात यावी.
डॉक्टरांकडून धोरणांचं स्वागत
आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या या धोरणांचं डॉक्टर्सनी स्वागत केलंय.
याविषयी बोलताना इंडियन मेडिकल असोसिएशचे माजी अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर म्हणाले, "या मार्गदर्शक सूचनांना भले खूप उशीर झाला असेल पण याचं स्वागत करतो. ज्या रुग्णांना लक्षणं आहेत, पण त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आहे. अशांना याचा नक्की फायदा होईल.
"हे रुग्ण सुपर स्प्रेडर बनणार नाहीत. त्याचसोबत एका शहरातून दुसऱ्या शहरात उपचारासाठी जाणाऱ्यांना मदत मिळेल. बऱ्याच रुग्णांना लक्षणं असूनही रिपोर्ट निगेटिव्ह येतो. आता हे रुग्ण कोव्हिड सेंटरमध्ये संशयित म्हणून दाखल होऊ शकतात."