सहा दिवसाच्या कोरोनाबाधित बाळाचा वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू

सोमवार, 7 जून 2021 (08:41 IST)
पालघर जिल्ह्यात एका सहा दिवसाच्या कोरोनाबाधित बाळाचा वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला आहे. ३१ मे रोजी पालघर जिल्ह्यातील सफाळा येथे एका खासगी रुग्णालयात एका बाळाचा जन्म झाला. मूदतपूर्व जन्माला आलेल्या या बाळाचे वजन कमी होतं. त्यामुळे त्याला चांगल्या उपचारासाठी गरज होते. उपचार मिळावे यासाठी बाळाच्या पालकांना पालघरमधील एका रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. तिथं गेल्यानंतर बाळाची आई आणि बाळाची करोना अँटीजेन चाचणी करण्यात आली. त्या रिपोर्टमध्ये आईचा रिपोर्ट निगेटीव्ह, तर बाळाचा रिपोर्ट पॉजिटिव्ह आला. 
 
यानंतर बाळाच्या पालकांना कोरोना बाधित बाळाला घेऊन पालघरमधील ग्रामीण रुग्णालयात जाण्यास सांगितले. मात्र तिथेही योग्य सुविधा नसल्याने पुढील उपचारासाठी जव्हार येथील रुग्णालयात हलविण्यात आलं. त्यातच बाळाची प्रकृती खालावत गेली. जव्हारमध्येही वैद्यकीय सुविधा अपुऱ्या असल्याचे समजताच त्याला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी उपचार सुरू केले. मात्र उपचारादरम्यान त्या सहा दिवसांच्या बाळाचा मृत्यू झाला. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती