हरितगृह वायू म्हणजे काय?

वेबदुनिया

सोमवार, 7 डिसेंबर 2009 (18:50 IST)
ND
ND
कोपेहेगन परिषदेच्या निमित्ताने ग्रीन हाऊस गॅसेस अर्थात हरितगृह वायूची चर्चा होत आहे. या वायूंच्या उत्सर्जनामुळे पृथ्वीवरच्या पर्यावरणाला नख लागते आहे. पण हे वायू म्हणजे नेमके काय?

ग्रीनहाऊस गॅसेस अर्थात हरितगृह वायू म्हणजे वातावरणातील असे वायू जे अदृश्य किरण (इन्फ्रारेड रेडिएशन) शोषून घेत त्याचे उत्सर्जनही करू शकतात. पृथ्वीचा पृष्ठभाग तप्त करण्यासाठी (ग्रीनहाऊस इफेक्ट) हे वायू कारणीभूत ठरतात. पृथ्वीच्या वातावरणात असलेले असे वायू म्हणजे पाण्याचे बाष्पीभवन, कार्बन डाय ऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड आणि ओझोन.

आपल्या सौरमंडळात शुक्र, मंगळ या ग्रहांत हे वायू मोठ्या प्रमाणावर आहेत. पृथ्वीच्या वातावरणातही हे वायू असल्याने त्याचा मोठा परिणाम पर्यावरणावर होतो आहे. हे वायू नसते तर पृथ्वीचा पृष्ठभाग किमान ३३ अंश सेल्सियसने थंड असता.

जगभरात औद्योगिकरणाला सुरवात झाल्यानंतर या वायूंचे प्रमाण वाढायला सुरवात झाले. साधारणपणे औद्योगिक क्रांतीचा काळ म्हणजे साधारणपणे १७५० च्या आसपासचा काळ हा हरितगृह वायूंचे उत्सर्जन वाढीला लागण्याचा काळ समजायला हरकत नाही.

वर उल्लेखिलेले वायू पृथ्वीचा पृष्ठभाग तापवतात. पण या प्रत्येक वायूचे वैशिष्ट्य वेगवेगळे आहे कणाकणाने एकत्र केलेला मिथेन वायू कार्बन डाय ऑक्साईडच्या आठ पटीने घातक आहे. पण तो कणा कणात विखुरलेला असल्याने त्याची 'उपद्रवक्षमता' कमी ठरते. या तापदायक वायूंची क्रमवारी लावायची झाल्यास ती अशी असेल.

पाण्याचे बाष्पीभवन (३६-७२ टक्के)
कार्बन डायऑक्साईड ( ९.२६ टक्के)
मिथेन ( ४-९ टक्के)
ओझोन ( ३-७ टक्के)


ग्रीनहाऊस इफेक्टसाठी एखादा वायू किती टक्के कारणीभूत ठरतो हे नक्की सांगता येत नाही. कारण काही वायू इतर वायूंच्याच प्रमाणात शोषण आणि उत्सर्जन करतात, पण त्यावरून एकाच वायूचे योगदान नेमकेपणाने ठरवता येत नाही.

या हरितगृह वायूंशिवाय इतरही काही वायू या प्रकारात मोडले जातात. त्यात सल्फर हेक्झाफ्लोराईड, हायड्रोफ्ल्युरोकार्बन्स आणि पर्फ्ल्युरोकार्बन्स हे काही वायू आहेत. नायट्रोजन ट्रायफ्ल्युरोगाईड हा वायू जागतिक तापमानवाढीला सर्वाधिक कारणीभूत ठरू शकतो. पण त्याचे प्रमाणातच मुळातच वातावरणात कमी असल्याने तो तितका 'तापदायक' ठरत नाही.

या वायूंचे प्रमाण वाढल्याने जागतिक तापमानवाढीची समस्या उद्भवली आहे. यामुळे केवळ पृथ्वीचे तापमानच वाढते आहे, असे नाही तर मानवी आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे.

हरिगृह वायूंच्या वाढीला निसर्ग आणि मानव दोन्ही जबाबदार आहेत, पण त्यात मानवाचे प्रमाण जास्त आहे. औद्योगिकीरणापूर्वी या वायूंचे प्रमाण कायम रहात होते, पण औद्योगिकरणानंतर ते प्रमाण वाढीला लागले. त्यात इंधनाच्या ज्वलनामुळे आणि जंगलांच्या कत्तलीमुळे त्यात भर पडली.

वेबदुनिया वर वाचा