खा. हरीभाऊ यांना मंत्रिपदाचे आमिष!

बुधवार, 23 जुलै 2008 (15:29 IST)
विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी गैरहजर राहून संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या विजयात हातभार लावणारे भाजपचे खा. हरीभाऊ राठोड हे राष्ट्रीय कॉग्रेस प्रणीत सेवासंघाच्या वाटेवर असून त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपदाचे आमिष दाखविण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

एकेकाळी गोपीनाथ मुंढे यांचे स्वीय सहायक असणारे हरीभाऊ राठोड यांनी भाजपच्या तिकिटावर यवतमाळ येथून संसदेत प्रथमच धडक मारली. तत्पूर्वी राठोड यांनी गोपीनाथ मुंढे यांच्या प्रेरणेतून 'बंजारा क्रांती दल' ही अखिल भारतीय सामाजिक संघटना उभी केली. या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी बंजारा समाजाचे प्राबल्य असलेल्या यवतमाळ लोकसभा मतदार संघात जनसंपर्क वाढविला.

भाजपने दोन वेळा उमेदवारी देऊनही पराभवाचा सामना कराव्या लागलेल्या खा. राठोड तिस-यांदा उमेदवारी देऊ नये म्हणून विरोधही झाला होता. परंतु तरीही मुढे यांनी आपला जोर दिल्लीत लावून राठोड यांनाच उमेदवारी मिळवून दिली. त्यात राठोड विजयी झाले. मुंढेंचे कट्टर समर्थक समर्थक असलेले हरीभाऊ हे काही दिवसांपासून मात्र मुंढे यांच्याकडून नाराज होते.

खा. राठोड यांच्या बंजारा क्रांती दलात गेल्या काही दिवसांपासून फूट पडली होती. या संघटनेतीलच काही पदाधिकारी हरीभाऊ यांच्या विरुद्ध उभे राहिले होते. यावेळी मुंढे यांनी राठोड यांना मदत न करता त्यांच्या विरोधकांना मदत केली. नंदुरबार येथे नुकताच बंजारा क्रांतीदलाचा मेळावा झाला. मेळाव्याचे प्रमुख नेतृत्व मुंढे यांना बहाल करण्यात आले होते. मात्र मुंढे मेळाव्यास ऐनवेळी गैरहजर राहिल्यानेही राठोड त्यांच्यावर नाराज होते.

गेल्या काही दिवसांपूर्वीच दिल्लीत झालेल्या कॉग्रेस प्रणीत बंजारा सेवादलाच्या बैठकीला खा. राठोड उपस्थित होते. परंतु विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी तर खा. राठोड यांना आगामी निवडणुकीत कॉग्रेसची उमेदवारी देऊन मंत्रिपदाचे आश्वासन दिल्याची खात्रीलायक माहिती आहे. तसेच खा. हरीभाऊ राठोड हे सेवादलाच्या मार्गावर असल्याचीही माहिती समोर आली आहे.

वेबदुनिया वर वाचा