रेल्वे प्रवास करणा-या प्रवाशांना सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असतील तर एक-दोन रुपये भाडे वाढ केली तरीही चालेल अशा भावना सर्वसामान्यांतून व्यक्त केल्या जात आहे. राजकीय अडचणींमुळे गेल्या काही वर्षांमध्ये प्रवास भाड्यात वाढ करण्याचा धोका कुठल्याही रेल्वे मंत्र्याने पत्करलेला नाही.
प्रवास भाड्यातून होत असलेले नुकसान भरून काढण्यासाठी भाडे वाढ न करता रेल्वेच्या इतर साधानांच्या माध्यमातून तुट भरण्याच्या बाता केल्या जात असल्या तरीही त्यात हवे तितके यश मिळालेले नाही. अशा स्थितीत भाडेवाढ करणे अव्यवहार्य नसावे असे वाटते.
रेल्वेचे अनेक दीर्घकालीन प्रकल्प अडकून पडले आहेत. मात्र त्यासाठी निधी उपलब्ध होऊ शकलेला नाही. त्यासाठी निधी उपलब्ध झाला तर रेल्वेची सथिती सुधारण्यास वेळ लागणार नाही. प्रवास भाड्यात एक-दोन रुपयांची वाढ केली तरीही प्रवाशांना त्यापासून कदाचित कुठलीही अडचण नसावी. कारण त्याबळावर स्टेशन आणि गाड्यांमध्ये स्वच्छता टीकवून ठेवणे, खाण्यापिण्याच्या वस्तुंची गुणवत्ता टीकवून ठेवणे आणि आसन व्यवस्था अधिक चांगली करणे शक्य होणार आहे.
भारतीय रेल्वेचा प्रवास आज इतर कुठल्याही सार्वजनिक वाहतुकीपेक्षा स्वस्त आहे. बस आणि मेट्रो ट्रेनमध्ये भाडेवाढ झाली तरीही लोक थोडीफार नाराजी दर्शवून ती स्वीकार करतातच ना. मग रेल्वे भाड्यात एक-दोन रुपयांच्या वाढीमुळे फारसे कोणते नुकसान होणार आहे. जर एक रुपया भाडेवाढ केली तरीही दररोज प्रवास करणा-या सरासरी एक कोटी 75 लाख प्रवाशांप्रमाणे रेल्वेला दररोज पावणे दोन कोटींपेक्षा अधिक रुपयांचा फायदा होणार आहे. या आकडेवारीनुसार वर्षभरात सुमारे साडे सहाशे कोटी रुपये अधिकचे येणार आहेत. या बदल्यात जर प्रवाशांना अधिक चांगल्या सोयी-सुविधा आणि सुरक्षा मिळत असेल तर प्रवास वाढीस हरकत कसली.