बुद्धाची अव्याकृते

युवराज सिद्धार्थाच्या समोर सर्व सुखे हात जोडून उभी होती. त्याच्या जीवनाला दु:खाचा थोडा सुद्धा स्पर्श झालेला नव्हता. एकदा मात्र रथातून रोजच्या सारखा फेरफटका मारत असतांना त्याला अतिशय गलितगात्र झालेल्या वृद्धाचे दर्शन झाले. वृद्धाला डोळ्यांनी दिसत नव्हते. कानांनी ऐकू येत नव्हते. केस पिकले होते, गात्रे शिथिल झाली होती. हातापायातली शक्ती नष्ट झाली होती. हातातील काठी टेकत टेकत थरथरणार्‍या पावलांनी तो कसेबसे एकेक पाऊल पुढे टाकत होता. युवराज ऐन तारुण्यात होता. कालांतराने प्रत्येक तरुण व्यक्तीची अशीच स्थिती होते या कल्पनेने तो कमालीचा अस्वस्थ झाला.

दुसरे दिवशी ज्याच्या हातापायाची बोटे झडली आहेत. ठिकठिकाणी जखमा झालेल्या आहेत, त्यातून रक्त वहाते अशा अत्यंत दयनीय अवस्थेत असलेल्या रोगी व्यक्तीचे दर्शन त्याला झाले. त्याची स्थिती पाहून तो मूळातून हादरून गेला.

तिसरे दिवशी चार व्यक्ती एका प्रेताला खांद्यावरून वाहून आणीत होते. प्रत्येक जिवंत व्यक्तीची परिणती अखेर मृत्यूत होते. त्याचे निष्प्राण कलेवरात रूपांतर होते. मृत्यू म्हणजे सर्व संपणे या कल्पनेचा प्रचंड धक्का त्याला बसला. रोग, जरा,मरण हे सिद्धार्धाने पूर्वी पाहिले नव्हते असे नाही. परंतु त्या क्षणी संपूर्णार्थाने त्या अवस्थांमध्ये निहीत असलेल्या दु:खाचे जे साक्षात् दर्शन सिद्धार्थाला झाले त्यातूनच संपूर्ण जीवनाची निरर्थकता त्याला जाणवू लागली. या दु:खाचा संपूर्ण छडा लावण्याचा ध्यासच त्याने घेतला. कठोर तपश्चर्येनंतर जेव्हा गयेला बोधिवृक्षाखाली त्याला ज्ञान प्राप्त झाले तेव्हा दु:ख, दु:खकारण, दु:खनिरोधाचा मार्गा या चार सत्यांचा त्याला साक्षात्कार झाला. त्यालाच बुद्धाची चार आर्यसत्ये म्हणतात.

बुद्धाचा दृष्टिकोण अतिशय व्यावहारिक होता. त्याला तात्त्विक चर्चांचे वावडे होते. एखाद्याला बाण लागून जर जखम झाली, आणि त्याची वेदना तो साक्षात अनुभवत असताना प्रथम त्या दु:खाचा परिहार कसा होईल याचा विचार करणे आवश्यक आहे. पण एखादी व्यक्ती जर बाण कोणी मारला? बाणाची लांबी किती होती? तो कोणत्या धातूचा होता? तो किती अणकुचीदार होता? त्याची जाडी किती होती? जखम वरवरची आहे की खोलवरची आहे याचाच विचार करीत बसला तर त्या व्यक्तीचे क्लेश अधिकच तीव्र झाल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणूनच प्रथम दु:ख आहे आणि त्या दु:खाचा निरास करण्याचा मार्ग कोणता आहे हा विचार जास्त महत्त्वाचा आहे.

सिद्धार्थाला बुद्धत्त्व प्राप्त झाल्यानंतर त्याचा शिष्य संप्रदाय मोठ्या प्रमाणात वाढला. लोक आपल्या कथा/व्यथा घेऊन गौतम बुद्धाकडे येऊ लागले. आपल्या शंकांचे निरसन करून घेऊ लागले. प्रश्न विचारणार्‍यांमध्ये अनेक लोक तात्त्विक प्रश्न विचारीत असत. उदाहरणार्थ 1) हे जग शाश्वत आहे का? 2) हे जग अशाश्वत आहे का? 3) या विश्वाला सुरुवात आहे का? 4) या विश्वाला अंत आहे का? 5) जीव व शरीर एकच आहेत का? 6) जीव व शरीर भिन्न आहेत का? 7) तथागत मृत्यूनंतर असतो का? 8) तथागत मृत्यूनंतर नसतो का? 9) तथागत मृत्यूनंतर असतोही न नसतोही. 10) तथागत मृत्यूनंतर असतो असे ही नाही व नसतो असेही नाही.

- डॉ. उषा गडकरी

ND
या दहा गोष्टीसंबंधी बुद्धाने काहीही सांगण्याचे नाकारले कारण, एकतर त्यांची उत्तरे नुसत्या विचारशक्तीच्या आटोक्याबाहेरची आहेत व दुसरे म्हणजे त्यांची उत्तरे कळून काहीही फायदा नाही. दु:खाचा विनाश कसा होईल इकडेच फक्त लक्ष दिले पाहिजे. य दहा प्रश्नांना बुद्धाची अव्याकृते म्हणतात. कारण यांची कोणत्याही प्रकारे व्याख्या करता येत नाही. कोणतीही व्याख्या किंवा स्पष्टीकरण दिले तरी त्याच्या विरुद्ध असणारे स्पष्टीकरणही देता येते.

तृष्णेचे मूळ 'मी' च्या कल्पनेत
साठविले असल्यामुळे खर्‍या अर्थाने
'मी' चे शून्यत्त्व उमजणे म्हणजेच
दु:खनिरास करणे होय.

म्हणूनच दु:खाच्या मूळ कारणाचा शोध घेतांना गौतम बुद्धाने 12 कड्या असलेल्या भवचक्राची कल्पना स्पष्ट केली आहे. त्यालाच त्याने 'द्वादश निदान' असे पारिभाषिक नाव दिले आहे. दु:खाचे मूळ कारण अविद्या किंवा अज्ञान होय. अविद्या म्हणजे अहंकार आणि ममत्व यांचा उगम असलेली आत्मकल्पना होय. 12 कराणांच्या मालिकेतील प्रत्येक कडीला 'निदान' असे नाव दिले गेले. ही 12 निदाने खालील प्रमाणे -

1. अविद्या 2. संस्कार 3. विज्ञान 4. नामरूप 5. षडायतन 6. स्पर्श 7. वेदना 8. तृष्णा 9. उपादान 10. भव 11. जाति 12. जरामरण.

या कडीतील सर्वात महत्वाची कडी म्हणजे तृष्णा होय. इंद्रिये आणि मनाच्या साह्याने जेव्हा जीव बाह्य विषयांच्या संपर्कात येतो तेव्हा विषयातून मिळणार्‍या सुखद संवेदनेतून त्यासंबंधीच्या इच्चा किंवा तृष्णा निर्माण होते. त्यातूनच दु:खाची मालिका सुरू होते. त्यामुळे तृष्णेवरच खर्‍या अर्थाने प्रहार करणे आवश्यक आहे. तृष्णेचे मूळ 'मी' च्या कल्पनेत साठविले असल्यामुळे खर्‍या अर्थाने 'मी' चे शून्यत्त्व उमजणे म्हणजेच दु:खनिरास करणे होय. विपश्यनेत या 'मी'चे 'अनित्यत्व' खर्‍या अर्थाने अधोरेखित होते. 'विपश्यना' एका अर्थाने दु:ख निवारण करण्याचाच मार्ग ठरतो. अत्यंत सजगतेने आणि सतर्कतेने त्या मार्गावरून मार्गक्रमणा करणे मात्र अत्यावश्यक आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती