'शांताराम' आता मराठीत!

चंद्रकांत शिंदे

शनिवार, 10 एप्रिल 2010 (15:41 IST)
PR
PR
वादळी आयुष्य जगलेल्या ग्रेगरी डेव्हिड रॉबर्टस यांनी आपल्या भारतातील वास्तव्यावर आधारित लिहिलेल्या शांताराम या कादंबरीचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केला आहे. अनुवादासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळवलेल्या अपर्णा वेलणकरांनीच शांताराम मराठीत आणले आहे. ग्रेगरी रॉबर्टस यांच्या हस्तेच या मराठी अनुवादाचे प्रकाशन शुक्रवारी मुंबईत एका छोटेखानी कार्यक्रमात करण्यात आले. याप्रसंगी ग्रेगरीची पत्नी प्रिंसेस विशेषत्वाने उपस्थित होती.

या कार्यक्रमानंतर ग्रेगरी यांनी वेबदुनियाशी दिलखुलास गप्पा मारल्या. मुंबई आणि प्रामुख्याने मराठीविषयी त्यांच्यात असलेली आपुलकीही या शब्दांतून डोकावत होती. ते म्हणाले, मी भारतात पहिल्यांदाच आलो तेव्हा येथे येण्यापूर्वीच विमानात माझ्या कानावर जो पहिला शब्द पडला तो मराठीच होता. येथे आल्यावर मी मराठी शिकलो. मराठी भाषेमुळेच माझी येथे अनेक कामे झाली. महाराष्ट्रात मराठी भाषा म्हणजे गुरुकिल्ली आहे. महाराष्ट्राबाहेरील व्यक्तीला मराठी येत असेल तर मुंबईत त्याची कामे चटकन होतात. मराठी भाषेचे सौंदर्य आणि माधुर्य माझ्या मनात घर करून आहे त्यामुळे भारतीय भाषांमध्ये शांतारामचा अनुवाद करण्याचे ठरले तेव्हाच मी ठरवले की पहिला अनुवाद हा मराठी भाषेतच असेल. आज हा मराठी अनुवाद प्रकाशित करताना खूप आनंद होत आहे. अपर्णाने खूपच उत्कृष्ट अनुवाद केला आहे.

शांतारामचा जगभरातील ४० भाषांत पोहोचले आहे. १८० देशांमध्ये याच्या ५० लाखांहून अधिक प्रति विकल्या गेलेल्या आहेत.

मेहता प्रकाशनचे सुनील मेहता यांनी सांगितले, मी जेव्हा ग्रेगरी यांच्या प्रकाशक एजंटकडून या कादंबरीच्या मराठी अनुवादाचे हक्क घेतले. त्यानंतर जवळ-जवळ एक-दीड वर्ष अपर्णा वेलणकर यावर काम करीत होत्या. त्यांनी ग्रेगरी यांची भेट घेऊन हे या पुस्तकाचा केवळ अनुवाद न करता त्यातल्या भावनांसहित ते मराठीत उतरवलेले आहे. खरे तर आम्ही या पुस्तकाच्या अनुवादाचे हक्क घेतले तेव्हाच मल्याळी प्रकाशकानेही अनुवादाचे हक्क घेतले होते. आम्हाला भीती वाटत होती, की आमच्या अगोदर मल्याळी भाषेतील पुस्तक बाजारात येते की काय। परंतु, स्वतः ग्रेगरी यांनीच मराठीतच सर्वप्रथम पुस्तक येण्याची इच्छा व्यक्त केल्याने हा मान आम्हाला मिळाला आहे.

लेखिका अपर्णा वेलणकर यांनी याप्रसंगी सांगितले, की शांताराम वाचल्यानंतर मला वाटले की मुंबईकरांचे हे पुस्तक मराठीत यायला हवे. मेहता प्रकाशनकडे जेव्हा मी ही गोष्ट बोलले तेव्हा त्यांनाही ही कल्पना आवडली आणि त्यांनी लगेच त्याचे अधिकार विकत घेतले. सुरुवातीला मी काही प्रकरणांचे भाषांतर केले आणि ग्रेगरी यांना भेटायला गेले. मराठी भाषा त्यांना अस्खलित बोलता येत नाही, परंतु समजते. त्यांनी भाषांतरित भाग ऐकला आणि आनंद व्यक्त केला. भाषांतर करताना मी ग्रेगरीची लेखनशैली जपतच भाषांतर केले आहे.

काय आहे शांताराम?
PR
PR
शांताराम ही खुद्द ग्रेगरी रॉबर्टस यांच्या आयुष्यावरच आधारीत कादंबरी असल्याची चर्चा आहे. किमान त्यातला काही भाग तरी त्यांच्या आयुष्यावर आधारीत आहे हे नक्की. कादंबरीचा नायक लीन ऑस्ट्रेलियात गुन्हेगार आहे नि हिरॉईनचा व्यसनी. ऑस्ट्रेलियात शिक्षा झालेली असताना तुरूंग फोडून तो बाहेर पडतो आणि भारत गाठतो. मुंबईत आल्यानंतर तो इथेच रहातो. इथलाच टॅक्सी ड्रायव्हर प्रभाकर त्याला मुंबईचे खरे स्वरूप दाखवतो.

प्रभाकरच त्याला धारावीत राहायला घर मिळवून देतो. इथल्या वातावरणाशी तो समरस होऊन जातो. मधल्या काळात कार्लाशी त्याचे प्रेम जमते. पण अनेक उपकथानकांचा प्रवास करून आणि अनेक वळणे येऊनही लीनची गाडी पुन्हा गुन्हेगारी वर्तुळावरच धावू लागते. अखेरीस तो मुंबई पोलिसांच्या हाती लागतो. त्याला तुरूंगात टाकतात. तिथे त्याचा बराच छळही होतो. तिथून सुटल्यानंतर पुन्हा एकदा गुन्हेगारी वर्तुळ त्याला खुणावतो. त्यातूनच तो अफगाणिस्तानात जातो. तिथून पाकिस्तान पुन्हा मुंबई आणि मग श्रीलंका हा सगळा गुन्हेगारी पायवाटेवरच होतो. पण त्यात अनेक भावनिक साथसोबतीही त्याच्याबरोबर असतात. हा संपूर्ण प्रवास थरारक आहे. त्यामुळे शांताराम वाचणे हा वेगळा अनुभव आहे. या कादंबरीवर चित्रपट बनविण्याचे घाटत आहे.

वेबदुनिया वर वाचा