काइट्स एक वेगळी प्रेमकथा आहे- राकेश रोशन

चंद्रकांत शिंदे

शनिवार, 17 एप्रिल 2010 (12:05 IST)
PR
कहो ना प्यार है पासून क्रिशपर्यंत रितिक रोशनची वेगवेगळी रूपे पडद्यावर साकारणारे निर्माता-दिग्दर्शक राकेश रोशन आता रितिकला काइट्स चित्रपटात आणखी एका वेगळ्या लुकमध्ये घेऊन येत आहेत. मात्र या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले नसून अनुराग बसुवर सोपवले आहे. हा पहिला हिंदी चित्रपट आहे जो हिंदी आणि इंग्रजी भाषेत एकाच वेळेस संपूर्ण जगात मे मध्ये प्रदर्शित होत आहे. चित्रपटाच्या मेकिंगविषयी राकेश रोशन यांनी त्यांच्या आलिशान ऑफिसमध्ये वेबदुनियाशी खास गप्पा मारल्या.

काइट्स आहे काय?
काइट्स म्हणजे पतंग. आकाशात पतंग उडताना आपण पहातो तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो. वेगवेगळ्या रंगांच्या पतंग आकाशात एक इंद्रधनुष्य साकारतात. पतंग कोण उडवत आहे ते आपल्याला ठाऊक नसते, पण आकाशात पतंग एकमेकांच्या जवळ येताना, एकमेकांना काटताना मजा येतो. माझा हा चित्रपटही असाच आहे, प्रेक्षकांचे सगळ्या प्रकारचे रंग दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. दोन पतंगांच्या रूपात मी माझ्या या चित्रपटात रितिक रोशन आणि बार्बरा मोरी यांना दाखवलेले आहे. आकाशात उडताना पतंगांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते ते दाखवण्याचा एक प्रयत्न या चित्रपटात आहे.

चित्रपटाची कथा सुचली कशी?
एक दिवस मी गॅलरीत बसलो होतो आणि आकाशात मला दोन पतंग उडताना दिसल्या. त्यांच्याकडे पहात असताना मला जाणवले की या पतंग एकमेकांना ओळखत नाहीत परंतु त्यांच्या एक वेगळे आकर्षण आहे. ते क्षणात जवळ येत होते आणि क्षणात दूर जाते. त्यांची दोरी दुसर्‍याच्याच हातात असल्याने त्यांना मनाप्रमाणे उडता येत नव्हते. ते पहात असतानाच माझ्या डोक्यात एक प्रेमकहाणी आकार घेऊ लागली. मी एका भारतीय मुलाची आणि एका वेगळ्या भाषेतील मुलीची 'वन लाइनर' कागदावर उतरवली.

कथा तुम्हाला सुचली तर दिग्दर्शनही तुम्हीच का केले नाही?
खूपच चांगला प्रश्न आहे. सगळ्या पुरस्कार सोहळ्यात क्रिशबरोबर चौथ्या पाचव्या नंबरवर गैंगस्टर नावाचा चित्रपट आणि अनुराग बसुचे नाव होते. मी तो चित्रपट पाहिला नव्हता आणि अनुरागबद्दलही मला काही ठाऊक नव्हते. मी गैंगस्टर चित्रपटाची डीवीडी मागवली आणि चित्रपट पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर मला जाणवले की अनुरागची या माध्यमावर चांगली पकड आहे. त्याला स्क्रिप्टची माहिती तर आहेच परंतु कॅमेरा एंगल, लोकेशन आणि अन्य तांत्रिक बाबीही चांगल्या ठाऊक आहेत. मी त्याला फोन करून बोलावले आणि सांगितले की मला तुझ्याबरोबर एक चित्रपट करायचा आहे आणि त्यात रितिक नायक असेल. तेव्हा त्याला प्रथम वाटले की मी त्याची टिंगल करतोय. तो म्हणाला मी आतापर्यंत छोट्या बजेटचे चित्रपट तयार केले आहेत. मोठा भव्य चित्रपट केलेला नाही तेव्हा मी म्हटले की मी तुझ्याबरोबर आहे, तू काळजी करू नकोस. मी त्याला माझी 'वन लाइन स्टोरी' ऐकवली तेव्हा त्यालाही ती आवडली. मी त्याला सांगितले की तू ही डेवलप कर आणि मला सांग. त्याने एक महिन्याचा वेळ मागून घेतला. एक महीना होऊन गेला तरी त्याचा फोन आला नाही तेव्हा मला वाटले की त्याला हा चित्रपट बनवू असा आत्मविश्वास नाहीय. परंतु काही दिवसांनी त्याचा फोन आला आणि तो स्क्रिप्ट घेऊन भेटायला आला. त्याने जी स्क्रिप्ट तयार केली होती ती खूपच उत्कृष्ट होती. मी त्याला घरी घेऊन गेलो आणि त्याने ऋतिकला स्क्रिप्ट ऐकवली तेव्हा तो लगेच म्हणाला की चित्रपट केव्हा सुरु करतोय. चित्रपट आम्ही लगेच सुरु करू शकत होतो परंतु आम्हाला जसे लोकेशन हवे होते तसे मिळत नव्हते. आम्हाला न्यू मेक्सिकोबद्दल सांगण्यात आले. तेव्हा मी अनुरागला घेऊन न्यू मेक्सिकोला गेलो आणि लोकेशन पहाताच जाणवले की हेच आमच्या चित्रपटाचे लोकेशन आहे. संपूर्ण चित्रपट आम्ही न्यू मेक्सिकोमध्येच चित्रित केला आहे.

PR
नायिका म्हणून बार्बरा मोरीची निवड का केली?
आमच्या चित्रपटाची कथा दोन अशा प्रेमिकांची आहे ज्यांना एकमेकांची भाषा येत नाही. भाषा येत नसतानाही दोघे प्रेम करू लागतात. ऋतिक रोशन अमेरिकेत वाढलेला आहे आणि आम्हाला स्पॅनिश बोलणारी नायिका हवी होती. मी एखाद्या हिंदी चित्रपटातील नायिकेला विदेशात रहाणारी मुलगी म्हणून दाखवू शकलो असतो परंतु प्रेक्षकांना ते पटले नसते. म्हणून आम्ही स्पॅनिश नायिकेचा शोध सुरू केला. मला एकाने सांगितले की माय ब्रदर्स वाइफ चित्रपट पहा त्यात बार्बरा मोरीने चांगले काम केले आहे. आम्ही तो चित्रपट पाहिला आणि बार्बराच्या अभिनयाच्या प्रेमात पडलो. आम्ही लगेच बार्बराच्या एजंटशी संपर्क केला. बार्बराला भेटलो तेव्हा सर्वप्रथम आमच्याबद्दल माहिती दिली आणि नंतर चित्रपटाची कथा ऐकवली. चित्रपटाची कथा ऐकून ती खूपच प्रभावित झाली आणि लगेच काम करण्यास तयार झाली. तू हा चित्रपट पहाशील तेव्हा तुलाही जाणवेल की बार्बराच या भूमिकेसाठी योग्य आहे.

मग कंगनाचे काय?
मी स्पष्ट करू इच्छितो की कंगना राणावत चित्रपटात दूसर्‍या नायिकेची भूमिका करीत नाही तर ती पाहुणी कलाकार म्हणून छोट्याशा परंतु महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

चित्रपट एकाच वेळेस हिंदी आणि इंग्रजीत प्रदर्शित करण्याचे काही खास कारण?
जपानी, चिनी, थायलंड आणि अन्य देशातील चित्रपट हॉलीवुडमध्ये आपले स्थान निर्माण करू शकतात मग आपला भारतीय चित्रपट तेथे का नाही. या विचाराने प्रेरित होऊनच आम्ही एकाच वेळेस हिंदी आणि इंग्रजीत चित्रपटाचे शूटिंग केले. हा चित्रपट आम्ही आंतरराष्ट्रीय दर्जाचा बनवला आहे. हा चित्रपट जेव्हा हॉलीवुडचे प्रेक्षक पहातील तेव्हा त्यांनाही कळेल की भारतीय चित्रपट ही त्यांच्याबरोबरीचा असू शकतो. इंग्रजी चित्रपटाची संपूर्ण जबाबदारी माझा हॉलीवुडचा दिग्दर्शक मित्र ब्रॅड रटनरने स्वीकारली. त्याच्या घरी मी एकदा जेवायला गेलो होतो तेव्हा त्याला मी काइटस्‌ची इंग्रजी प्रिंट दाखवली. त्याला चित्रपट प्रचंड आवडला आणि त्याने विनामोबदला चित्रपटाच्या एडिटिंगपासून बॅकग्राउंड म्यूजिकपर्यंसगळी कामे केली आणि हॉलीवुडमध्ये बनणार्‍या चित्रपटाचा लुक या चित्रपटाला दिला. त्याने चित्रपटातील गाणी आणि काही दृश्ये काढून दीड तासाचा उत्कृष्ट चित्रपट तयार केला आहे. हा चित्रपट यशस्वी झाला तर भारतीय चित्रपटांसाठी एक वेगळे दालन सुरु होईल. आणि असे झाले तर मला खूपच आनंद होईल कारण तेव्हात आपण खर्‍या अर्थाने ग्लोबल होऊ.

चित्रपटातील ऍक्शनची खूपच चर्चा आहे.
हो. चित्रपटाचे प्रोमो पाहून मला अनेकांनी फोन केले. ऍक्शनवर आम्ही खूपच मेहनत घेतली होती. या चित्रपटात आम्ही जी ऍक्शन दाखवत आहोत ती भारतीयच नव्हे तर हॉलीवुडपटातही आजवर आलेली नाही. यासाठी मी ५१ गाड्या विकत घेतल्या होत्या. एक गॅरेज सुरू केले होते. प्रत्येक दृश्यासाठी जवळ जवळ तीन गाड्या स्टॅडबाय ठेवल्या होत्या. ऍक्शनवर आम्ही खूपच मेहनत घेतली आहे.

चित्रपटाची कथा काय आहे?
ही एक प्रेमकहानी आहे. ऋतिक आणि बार्बरा यांची संस्कृति, भाषा वेगळी आहे परंतु नियती त्यांना एकत्र आणते. प्रत्येक माणसात एक वाईट आणि एक चांगला माणूस असतो. या चित्रपटात आम्ही या दोघांचीही दोन्ही रूपे दाखवली आहेत. पोलीस या दोघांच्या मागावर असतात. यानंतर काय आणि कसे होते ते चित्रपटात पहाणेच योग्य ठरेल. ऋतिकचे एक नवीन रूप प्रेक्षकांसमोर येणार आहे आणि प्रेक्षकांना ते नक्कीच आवडेल.

वेबदुनिया वर वाचा