गुलछबू भूमिकांचा कंटाळा- शाहिद कपूर

PR
PR
आगामी 'कमीने' या चित्रपटात शाहिद कपूर खलनायकी भूमिकेत पडद्यावर येतोय. या भूमिकेवर प्रेक्षक काय प्रतिक्रिया व्यक्त करतात हे जाणून घेण्यासाठी तो उत्सुक आहे.

एरवी गुलछबू भूमिका करणार्‍या शाहिदने या भूमिकेसंदर्भात बोलताना सांगितले, की नेहमीच गोडगोड भूमिका केल्या तर कंटाळा येतो. म्हणूनच हा थोडा बदल. दिग्दर्शक विशाल भारद्वाजने जे सांगितले ते मी यात केले. ही दुहेरी भूमिका आहे आणि गेल्या काही दिवसांतली सगळ्यांत चांगली भूमिका याला म्हणता येईल.

या फिल्ममध्ये शाहिद 'गुड्डू' व 'चार्ली' हे कॅरेक्टर करतोय. यात तो एका भूमिकेत तोतरे बोलताना दाखविला आहे. 'गुड्डूची भूमिका आव्हानात्मक होती, असे सांगून शाहिद म्हणतो, त्यासाठी आम्ही इएनटी तज्ज्ञांना भेटलो. तोतरे बोलणार्‍या व्यक्तींची गाठ घेतली. यातल्या दोन्ही पात्रांना मी जगण्याचा प्रयत्न केलाय.'

'पूर्वी अशा भूमिका विनोदनिर्मितीसाठी असायच्या. पण यात मात्र त्या अभिनय करताना दाखविल्या आहेत. विशेष म्हणजे मुख्य अभिनेताच तसा दाखविण्याचीही ही कदाचित पहिली वेळ असावी, असे शाहिद सांगतो. पण या चित्रपटाला ए सर्टफिकेट मिळाल्याने शाहिद नाराज झाला आहे. यापेक्षा इतर चित्रपटात बरीच हिंसा असते, पण यावर सेन्सॉरने एवढे लक्ष का द्यावे कळत नाही, असे तो म्हणतो.

या चित्रपटात शाहिदबरोबर प्रियंका चोप्रा आहे. यात ती 'स्वीटी' नावाची भूमिका करतेय. चित्रपट ११०० प्रिंट्स सह रिलिज होतोय. यातले टॅं टे टॅण हे गाणे आधीच लोकप्रिय झाले आहे.

मध्यंतरी विशाल आणि शाहिददरम्यान खटके उडाल्याची चर्चा होती. पण शाहिदने त्याचे खंडन केले. विशालने माझ्या वडिलांबरोबरही काम केले आहे. या फिल्डमध्ये विशाल खूप ज्येष्ठ आहे. त्यांचा मी खूप आदर राखतो, अशा शब्दांत शाहिदने त्यांच्याविषयीचा आदर व्यक्त केला.

वेबदुनिया वर वाचा