'झिरो'ला तगडी फाईट करावी लागणार आहे 'केजीएफ'शी

सोमवार, 12 नोव्हेंबर 2018 (17:16 IST)
दिग्दर्शक आनंद एल. राय आणि अभिनेता शाहरुख खान यांचा 'झिरो' हा चित्रपट 21 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे आणि नेमके त्याच दिवशी दाक्षिणात्य अभिनेता यश याचा अतिभव्य चित्रपट 'केजीएफ' अर्थात 'कोलार गोल्ड फिल्ड्‌स' प्रदर्शित होणार असल्यामुळे बॉक्स ऑफिसवर 'झिरो' चित्रपटाला 'केजीएफ'चे तगडे आव्हान असणार आहे.  
 
'झिरो'चा ट्रेलर काही दिवसांपूर्वी लॉन्च झाला. प्रेक्षकांनी त्याला चांगला प्रतिसादही दिला. शाहरुखच्या फॅन्ससाठी ही पर्वणी होती. 'झिरो'साठी 21 डिसेंबर ही रिलीजची तारीख ठरवण्यात आली. नेमकी हिच तारीख रितेश देशुखच्या 'माऊली'च्या रिलीजची होती. 'झिरो'ला महाराष्ट्रात फटका बसू शकतो हे लक्षात आल्यानंतर शाहरुखने रितेशला रिलीजची तारीख बदलण्याची विनंती केली. शाहरुखच्या विनंतीला रितेशनेही मान देऊन तारीख बदलली. यामुळे शाहरुखने महाराष्ट्रापुरता मोकळा श्र्वास घेतला. परंतु 21 डिसेंबरलाच 'केजीएफ' रिलीज होणार असल्यामुळे शाहरुखला धक्का  बसणार हे निश्चित. 
 
नुकताच 'केजीएफ' अर्थात 'कोलार गोल्ड फिल्ड्‌स'चा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि संपूर्ण भारतात वादळ निर्माण झाले. तसेही दक्षिण भारतात हिंदी चित्रपटांना कमी प्रेक्षक भेटतात. त्यामुळे 'केजीएफ' चित्रपटाला तुफान प्रतिसाद दक्षिण भारतात मिळू शकतो. याचित्रपटाची भव्यता 'बाहुबली' चित्रपटासारखी आहे. यामुळे उर्वरित भारतातही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळू शकतो. बॉक्स ऑफिसवर तगडी फाईट 'झिरो'ला करावी लागणार हे आता स्पष्ट झाले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती