रत्ना पाठक-शाह यांनी का म्हटलं, ‘भारतीय संपूर्ण जगभरात कुचेष्टेचा विषय बनलेत’

सोमवार, 16 जानेवारी 2023 (11:08 IST)
'भारतीय आज जगभरात कुचेष्टेचा विषय बनले आहेत, असं ज्येष्ठ अभिनेत्री रत्ना पाठक शाह यांनी म्हटलं आहे.
बॉलीवूड चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याच्या वाढत्या ट्रेंडवर चिंता व्यक्त करताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
'सारा भाई वर्सेस साराभाई' मधील भूमिकेसाठी चाहत्यांमध्ये चर्चेत असणाऱ्या रत्ना पाठक शाह म्हणाल्या, "आपण वाईट गोष्टी मागे सोडल्या पाहिजेत."
 
बीबीसीसोबतच्या संवादात रत्ना पाठक शाह म्हणाल्या, "हे पाहून मला खूप वेदना होतात. आपल्याकडे तीन हजार वर्ष जुनी सुंदर सभ्यता आहे. आपण सुंदर कला आणि परंपरेला प्रोत्साहन दिले पाहिजे आणि वाईट गोष्टी मागे सोडल्या पाहिजेत."
 
बॉलीवूड चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याच्या वाढत्या ट्रेंडबद्दल त्या म्हणाल्या, "आपल्याला चांगले चित्रपट बनवण्याची काळजी असायला हवी. पण आपण काय करतोय? तुम्ही काय परिधान केलेत? तुम्ही काय म्हणाले? तुम्हाला काय म्हणायचे आहे? कुणाचा अपमान झाला? याकडे आपलं लक्ष आहे. असं असेल तर कला अशा वातावरणात कशी टिकेल?" रत्ना पाठक शाह उघडपणे आपलं मत मांडत आल्या आहेत. आपल्या वक्तव्यांमुळे त्या अनेकदा वादातही सापडल्या आहेत.
 
गेल्या महिन्यात मुंबईत एका पुस्तक प्रकाशनाच्या वेळी त्यांनी एस.एस. राजामौली यांच्या 'आरआरआर' चित्रपटाला 'प्रतिगामी' (कालबाह्य चित्रपट) म्हटलं होतं.
 
इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटातील एका गाण्याच्या वादावर त्या म्हणाल्या होत्या, "हा मूर्खपणाचा काळ आहे, लोकांकडे खायला अन्न नाही पण त्यांना दुसऱ्याच्या कपड्यांचा त्रास होतो."
 
रत्ना पाठक यांनी 'लिपस्टिक अंडर माय बुरखा', 'साराभाई व्हर्सेस साराभाई', 'कपूर अँड सन्स', 'थप्पड' आणि 'खूबसूरत' यांसारख्या चित्रपट आणि मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. नुकत्याच त्या 'कच्छ एक्सप्रेस' या चित्रपटात दिसल्या आहेत.
 
गुजराती चित्रपटात पहिली संधी
चार दशकांपासून भारतीय चित्रपट आणि रंगभूमीचा एक भाग असलेल्या रत्ना पाठक शाह यांनी वयाच्या 65 व्या वर्षी मातृभाषेतील गुजराती चित्रपटात पहिलं पाऊल ठेवलं.
 
त्या सांगतात की, "गुजराती भाषेतील नाटकं आणि चित्रपटांमध्ये काम करण्याची खूप दिवसांपासून इच्छा होती, पण यापूर्वी कोणत्याही चांगल्या ऑफर मिळाल्या नाहीत."
 
रत्ना यांची आई आणि प्रसिद्ध अभिनेत्री दिना पाठक तसंच त्यांची मावशी यांनी अनेक गुजराती नाटक आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
 
रत्ना पाठक शाह सांगतात की, "त्या चित्रपटांमध्ये मला कधीच रस नव्हता. कारण त्यामध्ये 'परंपरावादी कल्पना, भडक रंग आणि भरपूर मेलोड्रामा' होता."
 
रत्ना सांगतात की, त्या बर्‍याच दिवसांपासून चांगल्या स्क्रिप्टची वाट पाहत होत्या. त्यांची प्रतीक्षा आता संपली आहे आणि त्या गुजराती चित्रपट 'कच्छ एक्सप्रेस'चा भाग बनल्या आहेत.
 
या चित्रपटात त्यांची भूमिका एका 'आधुनिक सासू'ची आहे जी आपल्या सुनेला आधार देते, पाठिंबा देते.
 
रत्ना पाठक सांगतात, "सासू आणि सून यांच्यातील नात्याचं सिनेमात शोषण करण्यात आलं आहे. या नात्यात संघर्ष असावाच असं नाही. दोन महिलांना एकमेकांशी भिडवण्याची परंपरा शतकांपासून चालत आली आहे. आणि वेळेनुसार चित्रपटांनीही या नात्याकडे पारंपरिक दृष्टिकोनातून बघितलं आहे.”
 
रत्ना यांना गुजराती सिनेमातही काही बदल बघायचे आहेत.
 
त्या सांगतात, "सिनेमामध्ये प्रत्येक प्रांतातील लोकांना स्टिरियोटाईप केलेलं आहे. ते सर्व मूर्ख म्हणून दाखवले आहेत. मग हुशार कोण आहे? फक्त चित्रपटाचा हिरो. आणि हिरोचा कोणताही प्रांत नसतो. त्याला मिस्टर विवेक, डॉ. राजेश असं संबोधलं जातं.”
 
पण भारतीय चित्रपट बदलत आहे आणि त्याबद्दल आपण आनंदी असल्याचं रत्ना सांगतात.
 
त्या म्हणतात, "सध्या हिंदी चित्रपटसृष्टीत गोंधळाचा काळ सुरू आहे आणि प्रेक्षकांना काय आवडेल हे कोणालाच समजत नाहीये.
 
काही चित्रपट निर्माते अजूनही 1990 आणि 2000 च्या दशकातील सिनेमा बनवत आहेत आणि प्रेक्षकांना ते आवडतील अशी आशा करत आहेत. तर दक्षिण भारतीय सिनेमा काहीतरी नवीन घेऊन येत आहे आणि प्रेक्षकांना ते आवडत आहे."
 
या बदलांमधून जात असताना बॉलिवूडलाही काही आव्हानांचा सामना करावा लागत आहे. रत्ना सांगतात की, "चित्रपट अद्योग अद्यापही कोरोना साथीच्या धक्क्यातून सावरलेला नाहीये आणि यावर बहिष्काराचे ढग जमा झाले आहेत."
त्या पुढे सांगतात, "तुम्ही (चित्रपट) बघत नाही. त्यामुळे लोक चित्रपट पाहायला जात नाहीत. कोणताही चित्रपट तेव्हाच हिट होतो जेव्हा प्रेक्षक पुन्हा पुन्हा तो पाहायला जातात. आता तसं होत नाही. कारण महागडी तिकिटं पुन्हा पुन्हा विकत घेण्यासाठी कुणाकडे पैसे नसतात.
 
चला त्या प्रकारची कला घडवण्याचा प्रयत्न करूया, सांस्कृतिक कला बनवूया, प्रेक्षक ती कितपत स्वीकारतात ते पाहूया.”
 
"मला वाटत नाही की ते लोकांच्या पचनी पडेल. कारण त्यात खोटेपणा आहे. आपण जे कर्मकांड म्हणून पाळतो त्याच्या उलट काम लोक करतात. हा ढोंगीपणा आपल्या देशात सर्वत्र पसरला आहे आणि त्याला इतका मान दिला जात आहे. याचा मला त्रास होतो.”
 
वातावरण बदलण्यावर भर देत त्या सांगतात, "देशातील सर्वांत मोठा मुद्दा हा आहे की आपण मागे वळून पाहत आहोत, पूर्वी जे होते तेच करा, असा आपला आग्रह आहे. जातीला महत्त्व द्या, असेच भांडणं करा. महिलांना घरात कोंडून घ्या. असेच कपडे घाला.
 
पुढे चालून हेच होईल. हा पुराणमतवादाचा काळ आहे, धोकादायक काळ आहे. या वातावरणात मी 'कच्छ एक्सप्रेस' सारख्या प्रगतीशील सिनेमाचा एक भाग आहे याचा मला आनंद आहे."
 
विरल शाह दिग्दर्शित 'कच्छ एक्सप्रेस'मध्ये रत्ना पाठक शाह यांच्यासह मानसी पारेख, धर्मेंद्र गोहिल, दर्शील सफारी आणि विराफ पटेल यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जानेवारीला प्रदर्शित झाला आहे.
 
Published By- Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती