विनोद खन्ना व देवळाली यांचे अतूट नाते

शुक्रवार, 28 एप्रिल 2017 (10:54 IST)
बॉलिवूडमध्ये आपल्या सौंदर्याने ‘हॅण्डसम हिरो’ म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध अभिनेते विनोद खन्ना यांच्या निधनाने येथील बार्न्स स्कूलमधील शालेय जीवनातील वास्तव्य स्मृतीपटलावर आले आहे. केंब्रिज विद्यापीठातील संलग्न असलेली व देशातील नामांकित शाळा म्हणून ब्रिटिश काळात सुरू करण्यात आलेल्या येथील बार्न्स स्कूलमध्ये राजघराण्यातील युवकांसह बॉलीवूड व राजकारणातील सध्याच्या धुरंधरांनी शिक्षण घेतले आहे.
 
यात प्रामुख्याने मध्यप्रदेशातील धार संस्थानाचे राजे आदींसह बॉलीवूडमधील दिग्गजांचा समावेश आहे. त्यापैकीच एक असलेले अभिनेते विनोद खन्ना यांनी ६० च्या दशकात शाळेतही मोठा दबदबा निर्माण केला होता. फुटबॉल, क्रिकेट, ऍथेलॅटिक्स, स्विमिंग या खेळात त्यांनी प्राविण्य मिळवले होते. बॉक्सिंग व क्रॉस कंट्री हे त्यांचे शालेय जीवनातील आवडते खेळ होते. याशिवाय अभिनयाचे बाळकडू व आवड येथेच निर्माण झाली होती.
 
आपल्या सौंदर्य व अदाकारीने एकेकाळी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलेल्या विनोद खन्ना हे विद्यार्थी दशेतही लोकप्रिय होते. सुटीच्या दिवशी शेजारील लहवित या खेड्यात मित्रांसह शेतकर्‍यांच्या घरी भोजनाचा कित्येकदा आस्वाद घेतला असल्याचे त्यांच्या समकालीन विद्यार्थी ऍड. बबन मुठाळ यांनी सांगितले. गावातील ओढ्यालगत असलेल्या चिंचा व बोर खाण्याचा त्यांना मोठा षोक होता. याशिवाय अस्सल ग्रामीण राहणीमानाचा त्यांच्या जीवनावर मोठा प्रभाव होता. त्याचा वापर त्यांनी चित्रपटातील आपल्या भूमिकेसाठी चपखल करून घेतला होता. मेरा गाव मेरा देश हा हिंदी चित्रपट वानगीदाखल पुरेसा ठरेल!
 
शिक्षण पुर्ण झाल्यानंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार्‍या विनोद खन्ना यांनी ‘इम्तेहान’ चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी बार्न्स स्कूलला आले असता ‘मला पुन्हा शाळेचे दिवस आठवले’ असे अभिमानाने सांगितले असल्याचे ऍड. मुठाळ यांनी सांगितले. याच चित्रपटातील ‘रूक जाना नही तू कही हार के’ या गीताने त्यावेळी विद्यार्थीदशेतील त्यांच्या आठवणींना उजाळा मिळून डोळ्याच्या कडा पाणावल्या असल्याचे मुठाळ यांनी आवर्जुन सांगितले.
 
सन २००९ मध्ये शाळेच्या स्नेह संमेलनास त्यांनी हजेरी लावली होती. काल विनोद खन्ना यांच्या निधनाने त्यांच्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देताना देवळालीतील बार्न्स स्कूलमध्येही हळहळ व्यक्त केली जात आहे. आज शाळा व्यवस्थापन व विद्यार्थ्यांतर्फे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

वेबदुनिया वर वाचा