तापसीने घेतला चांगला निर्णय

बुधवार, 28 जून 2017 (15:18 IST)
तापसी पन्नू जेंव्हापासून हिरोईन म्हणून ओळखली जायला लागली, तेंव्हापासून तिच्याकडून अपेक्षाही खूप वाढायला लागल्या. जाहिराती आणि इव्हेंटसाठीही तिच्याकडे बऱ्याच ऑफर यायला लागल्या आहेत. मध्यंतरी तिला अशाच एका इव्हेंटसाठी उपस्थितीचे निमंत्रण आले होते. पण तिने चक्क हा इव्हेंट नाकारला. पैसे बऱ्यापैकी मिलणार होते. पण तापसीने नक्की कोणत्या कारणासाठी हा इव्हेंट नाकारला हे समजले, तर तिच्याबद्दल आदरच वाटायला लागेल. या इव्हेंटच्या उपस्थितीबाबत जे मानधन मिळणार होते, ते रोख स्वरुपात मिळणार होते. तशी अटच या इव्हेंटच्या आयोजकांनी तापसीला घातली होती. पण रोख पैसे स्वीकारणे हे भारत सरकारच्या “डिजीटलायजेशन’च्या धोरणाच्या विसंगत असल्याने तापसीने या इव्हेंटला उपस्थित राहण्याचेच नाकारले. भोपाळमधील ज्या कार्यक्रमासाठी ती जाणार होती त्याची जाहिरात केली गेली होती. पण जेंव्हा तिला आपले मानधन रोख मिळणार असल्याचे समजले तेंव्हा चेक किंवा कॅश ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे देण्याची विनंती तिने केली. मात्र याला आयोजकांची तयारी नव्हती. म्हणून इव्हेंटच्या दोन दिवस आगोदर तिने आपला नकार कळवला. काळा पैसा रोखण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. तेंव्हा एवढे तरी आपण निश्‍चितपणे करू शकतो, असे ती म्हणते. रोखीच्या व्यवहारांना टाळण्यासाठी तिने नेहमीच “डिजीटल” पर्याय स्वीकारले आहेत. तापसीला कष्टाने आणि प्रामाणिकपणे कमावलेला पैसा हवा आहे. त्यासाठी अधिक चांगली कामे करण्याची तिची तयारी आहे. 

वेबदुनिया वर वाचा