सिद्धार्थ शुक्लाचं निधन, आज होणार अंत्यसंस्कार

शुक्रवार, 3 सप्टेंबर 2021 (08:35 IST)
अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन झालं आहे. त्याच्या मृत्यूचा कारण मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही.
सिद्धार्थच्या मृत्यूचं कारण आज अधिकृतपणे पोलिसांकडून सांगितलं जाण्याची शक्यता आहे. दरम्यान त्याच्या पार्थिवावर आज मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत.
 
" गुरुवारी साधारण साडेदहाच्या आसपास सिद्धार्थला रुग्णालयात आणण्यात आलं, तेव्हाच त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूचं कारण अद्याप लगेच सांगता येणार नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच त्याबाबत अधिक माहिती देता येईल," असं कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी बीबीसीला सांगितलं आहे.
 
पण कुटुंबीयांचं म्हणणं आहे की सिद्धार्थला हार्टअटॅक आला होता, असं डॉ. मोहिते यांनी बीबीसीला सांगितलंय.
बिग बॉस जिंकल्यानंतर सिद्धार्थ शुक्ला सातत्याने चर्चेत राहिला.काही दिवसांपूर्वीच सिद्धार्थ डान्स दिवाने आणि बिग बॉस या दोन रिअॅलिटी शोमध्ये दिसला होता.
 
सिद्धार्थ शुक्ला मुळचा मुंबईचा आहे. गेल्या महिन्यात सिद्धार्थ शुक्लाची ब्रोकन बट ब्यूटिफूल- 3 वेब सीरिज प्रदर्शित झाली होती.
 
बालिका वधू आणि दिल से दिल तक या मालिकांमधून सिद्धार्थ शुक्लाने आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती. या दोन्ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीला उतरल्या.
 
आलिया भट्ट आणि वरुण धवन यांच्या हम्प्टी शर्मा की दुल्हनीया या सिनेमातही सिद्धार्थ झळकला होता.बिग बॉस 3 मध्ये सिद्धार्थ आणि त्याची मैत्रीण शेहनाझ गिल यांची जोडी सुपरहीट ठरली होती.
 
सिद्धार्थ शुक्ला कोण होता?
सिद्धार्थ शुक्ल मॉडेल आणि अभिनेता आहे. 12 डिसेंबर 1980 मध्ये मुंबईमध्ये जन्मलेल्या सिद्धार्थने 2008 मध्ये 'बाबूल का आँगन छुटे ना' या मालिकेतून पदार्पण केलं.त्याचं शिक्षण सेंट झेव्हियर्स कॉलेजमध्ये झालं. त्याने रचना संसद महाविद्यालयातून इंटेरियर डिझाईन विषयात पदवी घेतली.
 
बिग बॉसमध्ये येण्याआधी त्याने 'झलक दिखला जा', 'फिअर फॅक्टर: खतरों के खिलाड़ी' अशा अनेक रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता.2014 मध्ये त्याने 'हम्टी शर्मा की दुल्हनिया' या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. 2017च्या 'लव्ह यू जिंदगी' या चित्रपटातही तो झळकला होता.
 
अभिनयाबरोबरच त्याने अनेक शोजचं निवेदनही केलं. 'इंडियाज गॉट टँलेट' या शोचं भारती सिंग बरोबर निवेदन केलं होतं. 'सावधान इंडिया' या शोचं निवेदन त्याने केलं.आता तो बिग बॉसचा विजेता ठरला तरी बिग बॉसच्या 10व्या सिझनमध्यो तो पाहुणा कलाकार म्हणून आला होता.
 
अभिनेता मनोज वाजपेयीने ट्वीट करून दुःख व्यक्त केलंय. "ही खूपच दुःखद आणि हैराण करणारी बातमी आहे. त्यांच्या जवळच्या लोकांचं जे नुकसान झालं आहे ते शब्दांमध्ये व्यक्त करता येऊ शकत नाही. नाही यार," असं मनोज वाजपेयीने लिहंल आहे.
 
या बातमीमुळे मला मोठा धक्का बसला आहे, असं बालिका वधूफेम अविका गोरनं म्हटलं आहे. या बातमीवर विश्वासच बसत नाही. तो अत्यंत चांगला व्यक्ती होता.त्याच्या आत्म्याला शांती लाभो, असं तिने पुढे म्हटलंय.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती