बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचे पती राज कुंद्रा यांचा त्रास कमी होण्याचे नाव घेत नाहीये. यापूर्वीही राज कुंद्रा यांना अश्लील चित्रपट बनवून अॅपवर अपलोड केल्याप्रकरणी तुरुंगवास भोगावा लागला आहे. त्याचवेळी शिल्पा आणि तिच्या आईवरही फसवणुकीचा आरोप करण्यात आला होता. आता शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्यावर मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन बराई नावाच्या व्यक्तीने शिल्पा आणि राज यांच्यावर फसवणुकीचा आरोप करत एफआयआर दाखल केला आहे. जुलै 2014 पासून आतापर्यंत मेसर्स एसएफएल प्रायव्हेट कंपनीचे संचालक, शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, काशिफ खान, दर्शित शहा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याच्याशी फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
आपल्या कंपनीची फ्रँचायझी घेऊन पुण्यातील कोरेगाव परिसरात स्पा आणि जिम सुरू केल्यास खूप फायदा होईल, असे आपल्याला सांगण्यात आल्याचे नितीन बराई यांनी पोलिसांना सांगितले. त्याच्या म्हणण्यानुसार, राज कुंद्रा आणि शिल्पाने 2014-15 मध्ये फिटनेस कंपनीच्या माध्यमातून त्याची 1.51 कोटी रुपयांची फसवणूक केली.
बराई यांच्या तक्रारीनंतर वांद्रे पोलिसांनी शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा आणि इतर आरोपींविरुद्ध कलम 406, 409, 420, 506, 34 आणि120 (बी) अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. या प्रकरणी शिल्पा आणि राज यांची लवकरच चौकशी होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.