रणवीर सिंहचं न्यूड फोटोशूट : ‘मी हजारो लोकांपुढे अभिनयातून नग्न होऊ शकतो, कसोटी मला पाहणाऱ्यांची आहे’
शुक्रवार, 22 जुलै 2022 (18:42 IST)
बॉलिवूडचा अभिनेता रणवीर सिंहचे नग्न फोटो सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. रणवीरने न्यूड फोटो शूट केलं आहे.
रणवीर नेहमीच आपल्या पेहराव आणि अभिनयामुळे चर्चेत असतो. मात्र त्याने आता आपलं न्यूड फोटो शूट पेपर मॅगझिनसाठी केलंय.
त्यामुळे सगळ्यांना हा प्रश्न पडलाय की एरव्ही निराळे, रंगी-बेरंगी आणि अंगभर कपडे घालणाऱ्या रणवीर सिंगने आपलं न्यूड फोटो शूट करण्याचा का निर्णय घेतला?
सोशल मीडियावर रणवीर सिंहचे चाहतेही चकीत होऊन आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. रणवीरच्या या फोटोंसह अनेक मीम्सही आता सोशल मीडिया व्यापून टाकताना दिसून येत आहेत. पण रणवीर सिंहने हे फोटो का काढले असावे? या प्रश्नाचं उत्तर आधी जाणून घेऊया.
या प्रश्नाचं उत्तर देताना पेपर मॅगझिनमध्ये छापून आलेल्या लेखात रणवीर म्हणतो की, "नग्न शरीराचं प्रदर्शन करणं तसं माझ्यासाठी फार अवघड नाही. पण माझ्या काही भूमिका सादर करताना मी तर यापेक्षाही नग्न झालोय. माझ्या अभिनयातून लोक माझ्या नग्न शरीराच्या आतला आत्माही पाहू शकले असतील."
"या नग्नतेला तुम्ही काय म्हणाल? मी हजारो लोकांपुढे असा अभिनयाच्या माध्यमातून नग्न होऊ शकतो. कसोटी तर मला पाहणाऱ्या प्रेक्षकांची आहे."
रणवीरची त्याच्या नग्न फोटोशूटबद्दलची ही भूमिका आहे.
दरम्यान, रणवीरची ही भूमिका असली तरी सोशल मीडियावर त्याच्याबद्दल अजून एक चर्चा सुरू झाली आहे.
हॉलिवूडमधले अभिनेते बर्ट रेनॉल्ड्स यांना समर्पण म्हणून असे फोटो काढण्याचा निर्णय घेतल्याचं डाएट सब्या या इन्स्टाग्राम हँडलवर म्हटलं आहे.
रणवीरच्या फोटोशोटमुळे सोशल मीडियावर प्रतिक्रियांना उधाण आल्याचं दिसून येत आहे. रणवीरनं यामागची त्याची भूमिकाही स्पष्ट केली आहे.
पण, असं असलं तरी अशाप्रकारचे फोटोशूट आपल्याला नवीन नाहीयेत. भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक वर्षांपासून असे फोटोशूट होत आले आहेत. त्यांच्यावर वेळोवेळी टीकाही झालीय आणि संबंधितांनी त्याबद्दलची त्यांची भूमिकाही मांडलीय.
या बातमीत आपण आतापर्यंत कुणी कुणी न्यूड फोटोशूट केले, त्यामागची त्यांची भूमिका काय होती, नग्नता आणि अश्लीलता यामध्ये नेमका काय फरक असतो आणि मूळात असे फोटोशूट का केले जातात, या प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत.
याआधी यांनी केलं नग्न फोटोशूट
नग्न फोटोशूटमध्ये चर्चेत आलेली अलीकडच्या काळातली 2 उदाहरणं म्हणजे मिलिंद सोमण आणि वनिता खरात.
अभिनेता मिलिंद सोमण यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये गोवा इथल्या बीचवर न्यूड फोटोशूट केलं होतं आणि तो फोटो सोशल मीडियावर टाकला होता.
गोवा बीचवर विनावस्त्र धावतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी या फोटोला "55 and running!" असं शीर्षक दिलं होतं
यानंतर मिलिंद सोमण यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता.
अभिनेत्री वनिता खरात हीनं जानेवारी 2021 मध्ये नग्न फोटोशूट केलं होतं. त्यावेळी तिच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती.
हे फोटो पोस्ट करतानाच तिनं त्याविषयीची तिची भूमिका स्पष्ट केली होती. फोटोसोबतच्या टीझरमध्ये तिनं लिहिलं होतं, कोणताही न्यूनगंड न बाळगता स्वतःला स्वीकारण्याचा प्रयत्न. म्हणूनच तिने या फोटोसोबत कॅप्शन लिहिलं होतं की, मला माझ्या प्रतिभेचा, माझ्या आवडीचा, आत्मविश्वासाचा अभिमान आहे. मला माझ्या शरीराचा अभिमान आहे...कारण मी 'मी' आहे.
याकडे अश्लीलता म्हणून का पाहता, मला त्यात काहीच अश्लील दिसलं नाही. त्या फोटोकडे एक उत्तम कलाकृती म्हणून पाहावंसं वाटतं, असं वनितानं मुलाखतीच्या सुरूवातीलाच सांगितलं होतं.
याआधी 90 च्या दशकात अभिनेत्री ममता कुलकर्णीने स्टारडस्ट या मॅगेझीनसाठी टॉपलेस फोटोशूट केलं होतं. यामुळे मोठा गदारोळ झाला होता.
तर त्याहीआधी 1974 मध्ये प्रतिमा बेदी या मुंबईच्या जुहू बीचवर नग्न अवस्थेत धावल्या होत्या. Cine Blitz या नव्याने लाँच झालेल्या मॅगेझीनसाठी त्यांनी असं केलं होतं. अर्थात यामुळे बेदी यांच्यावर कडाडून टीका झाली होती. मुक्ती आणि स्वातंत्र्य ही या फोटोशूटमागची त्यावेळची कल्पना होती.
ही उदाहरणं पाहिल्यास भारतीय चित्रपटसृष्टीला न्यूड फोटोशूट काही नवीन नाहीयेत, हे स्पष्ट होतं. पण, मग असे फोटोशूट केल्यामुळे वाद का निर्माण होतात, असा प्रश्न उपस्थित होतो.