राजू श्रीवास्तव यांनी आज पहिल्यांदाच लोकांना रडवलं असेल...

बुधवार, 21 सप्टेंबर 2022 (18:31 IST)
अफलातून निरीक्षणातून निखळ विनोदाने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य करणारे कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं निधन झालं. ते 58 वर्षांचे होते. 10 ऑगस्ट रोजी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांनी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्रकृती गंभीर असल्याने ते प्रदीर्घ काळ व्हेंटिलेटरवर होते.
 
त्यांच्या कुटुंबीयांनी यासंदर्भात माहिती दिली. जिममध्ये ट्रेडमिलवर धावत असताना त्यांच्या छातीत दुखायला लागलं आणि ते खाली कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
 
2005 ची गोष्ट आहे. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चँलेंज' नावाचा एक शो स्टार टीव्हीवर आला होता. हा काळ ओटीटीपूर्व होता. आपल्याला हवं तेव्हा हवा तो कार्यक्रम पहायचं प्रस्थ तेव्हापर्यंत नव्हतं. विविध क्षेत्रातले रिअलिटी शो तेव्हा आले होते. टीव्ही आणि असलंच तर इंटरनेट हे तेव्हा करमणुकीचं मुख्य माध्यम होतं.
 
'स्टार वन' या वाहिनीवर 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' नावाचा एक शो आला होता. आज जे स्टँड अप कॉमेडियनचं पीक आलं आहे त्याची पायाभरणी या शो मुळे झाली. स्टँड अप कॉमेडियनची स्पर्धा आणि त्यातून एक विजेता असा हा शो होता. समोर शेखर सुमन आणि नवज्योतसिंह सिद्धू परीक्षकाच्या भूमिकेत असायचे. वाक्या वाक्याला गडगडाटी हसणारा सिद्धू, कमनीय बांध्याची अँकर आणि तमाम हास्यवीर अशी ती जमून आलेली भट्टी होती. त्यातलाच एक होता राजू श्रीवास्तव
 
शिडशिडीत बांधा, गव्हाळ वर्ण, अजिबात हिरोपण नसलेला चेहरा, बिहारी तोंडवळ अशी ही आकृती माईक हातात घेतल्या क्षणापासून एकपात्री स्किटच्या माध्यमातून एक विश्व उभं करायचा. कधी ते लोकल ट्रेनचं असायचं, कधी लग्नाच्या सीनमधलं, कधी काही तर कधी काही. वाक्यांची फेक, किस्से, विविध पात्रांचे चेहरे तो लीलया उभे करायचा. त्यात नकला, कथा, प्रसंग सगळं असायचं. राजू यांच्या वाणीतून ते जग दिसायचं.
 
वानगीदाखल उदाहरणं घ्यायचं झालं तर एकदा त्याने मुंबई लोकल ट्रेन उभी केली होती. लोकल रिकामी असताना कशी दिसते, भरलेली असताना कशी दिसते, जेव्हा ट्रेन रिकामी असते तेव्हा हात पकडण्याचं हँडल कसं दिसतं हेही साकारलं होतं ते स्किट पाहून मुंबईच्या कोणत्याही स्टेशनला उभं राहिलं, ट्रेन आली की तिचा एक वेगळा चेहरा दिसायचा. प्रत्येक ट्रेन एका व्यक्ती सारखी दिसायची. हे यश राजू श्रीवास्तव यांच्या निरीक्षणाचं होतं.
 
तसंच एक स्कीट होतं ते लग्नातलं. मुलीची पाठवणी सुरू असते. आई जावयाच्या बाजूला उभी असते. वर्र्हाडी आपापल्या कामात व्यग्र असतात. बस्स इतकाच प्रसंग पण त्यातून आपली मुलगी कशी चांगली आहे, तिच्यासाठी आम्ही किती खस्ता खाल्ल्यया वगैरे जावयाला सांगत असते. उत्तर भारतातल्या टिपिकल लग्नाचा सीन. राजू यांचं स्कीट सुरू असेपर्यंत ती सगळी पात्रं डोळ्यासमोर उभी राहतात. प्रत्येक लग्नात थोड्याफार प्रमाणात तेच होत असल्याने ते पटतं आणि आवडतंसुद्धा.
 
तसंच एक स्कीट होतं. एका गावात लोक बसलेले असतात. त्यांचा म्होरक्या शोले पिक्चरची कथा सांगत असतो. अशा पद्धतीने शोले आपण खचितच पाहिला असेल. टिपिकल भोजपुरी भाषेत शोले सिनेमा पाहिल्याचं ते आगळं समाधान राजूच देऊ शकत होते.
 
लाफ्टर चॅलेंज शोमध्ये राजू यांचा तिसरा क्रमांक आला होता. मात्र ते प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात राहिला होता. पुढेही त्याने अनेक शो केले. पण लाफ्टर चॅलेंजची सर कशालाच नव्हती.
 
नकलांचा नाद
राजू श्रीवास्तव यांना लहानपणापासून नकलांचा नाद होता. मुंबईला आल्यावर त्याच्या त्यांच्या कलेला वाव मिळाला. टी सीरिज ने त्यांच्या जोक्सची एक कॅसेटही केली होती. आता युट्यूबवर एका क्लिकवर त्यांचे हजारो जोक ऐकायला मिळतात. पण कॅसेट लावून जोक ऐकायची संकल्पना आता ऐकायला अगदीच विचित्र वाटते.
 
त्यांचा जन्म 25 डिसेंबर 1963 ला कानपूरला झाला. ते उत्तर प्रदेशातल्या उन्नाव भागातले होते. त्यांचं खरं नाव सत्यप्रकाश होतं. पण त्यांना राजू श्रीवास्तव नावानेच ओळखलं जायचं. लहानपणी शाळेत आणि त्यानंतर कॉलेजमध्ये त्यांनी अनेकांच्या नकला केल्या. त्यांचे वडील कवी होते.
 
राजू श्रीवास्तव यांनी शोले पाहिला आणि अमिताभ बच्चनचा राजूवर प्रचंड प्रभाव पडला. अमिताभने त्याच्यांवर अगदी गारूडच केलं. राजू त्यांच्यासारखे चालू लागले, बोलू लागले. तरीही त्याने पोट भरू शकतं याची त्यांना कल्पना नव्हती.
 
जेव्हा पैशाची निकड भासायला लागली तेव्हा राजूचं आयुष्य बदलायला सुरुवात झाली. ते आईला पैसे मागायचे तेव्हा त्यांची आई त्यांना म्हणायची की 'स्वत: कमावशील तेव्हा कळेल.' अमिताभ बच्चन यांची नक्कल केल्यावर त्यांना जेव्हा पैसै मिळू लागले तेव्हा हा व्यवसाय असल्याचं त्यांना जाणवलं. मग राजू विविध नेत्यांची नक्कल करू लागले. तरीही काही काळानंतर नकलाच किती करत राहणार असं त्यांना वाटलं आणि त्यातून एकपात्री प्रयोगांचा जन्म झाला.
 
1982 मध्ये ते मुंबईत गेले.1988 मध्ये त्यांनी तेजाब चित्रपटात काम केलं. त्यानंतर 'मैने प्यार किया', 'बाजीगर' या चित्रपटातही भूमिका केल्या.
 
2005 मध्ये लाफ्टर चॅलेंज कार्यक्रमामुळे ते घराघरात पोहोचले. त्यांनी साकार केलेलं गजोधर भैया हे पात्र प्रचंड लोकप्रिय झालं. त्याचा इतका परिणाम झाला की राजू यांच्या आवाजतल्या कॅसेट्स तयार केल्या. एकदा राजू श्रीवास्तव ऑटोत जास्त असताना ऑटोवाला त्याची कॅसेट लावून हसत होता. इतकंच नाही तर राजू यांनाही ती कॅसेट ऐकण्याची शिफारस त्या ऑटोवाल्याने केली.
 
रिअलिटी शोमधली प्रसिद्धी तशी औटघटकेचीच असते. त्यानंतर बिग बॉसच्या तिसऱ्या सीझनमध्येही झळकले होते.
 
2014 मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला. आधी त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आणि मग ते भाजपात गेले.
 
विनोदनिर्मिती करताना जितकं ओरिजिनल राहू तितकं चांगलं असं राजू सांगायचे. द्वयर्थी विनोदाने काही वेळ आनंद वाटतो पण तो दीर्घकाळासाठी त्याचे परिणाम गंभीर होतात असं राजू यांचं मत होतं.
 
आता राजू आपल्यात नाहीत. गेल्या बऱ्याच काळापासून राजू मुख्य प्रवाहात नव्हते. तरी त्याचं नाव आठवलं की चेहऱ्यावर हसू उमटायचं. आयुष्यभर लोकांना इतकं हसवणाऱ्या राजू यांनी आज पहिल्यांदाच चाहत्यांना रडवलं असेल.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती