पं. ह्रदयनाथ मंगेशकरांना मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्‍कार प्रदान

शुक्रवार, 24 डिसेंबर 2021 (21:51 IST)
संगीत जगतात आपले अढळ स्‍थान निर्माण करणाऱ्या पंडित ह्रदयनाथ मंगेशकर यांना यावर्षीचा मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्‍कार तर सुप्रसिध्‍द गायिका कविता कृष्‍णमूर्ती यांना सन २०२१ मोहम्‍मद रफी पुरस्‍कार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कविता कृष्णमूर्ती यांचा पुरस्कार त्यांचे पती प्रसिद्ध व्हायोलिन वादक पद्मश्री एल सुब्रमण्यम यांनी स्वीकारला.
 
मोहम्मद रफी यांचे स्मरण करताना आपण इश्वराकडे प्रार्थना करु या की, असे महान कलावंत पुन्हा पुन्हा आपल्यामध्ये जन्म घेऊ दे, तर पाश्चात्याचे चांगले आहे ते घेतलेच पाहिजे पण अनुकरण करताना त्यामध्ये वाहत जाऊ नये, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या कार्यक्रमात केले.
यावेळी राज्यपालांनी, रफी पुरस्कार सुरु केल्याबद्दल आमदार आशिष शेलार यांचे कौतुक केले. कलावंत हा अमर असतो. कलाकार किती ह्रदया पर्यंत पोहचतो त्यावरच तो अमर होतो. रफी साहेबांना हे अमरत्व प्राप्त झाले आहेच. पण आज त्यांच्या सारख्या कलावंताचे स्मरण करताना पुन्हा पुन्हा असे महान कलावंत जन्माला यावे , अशी प्रार्थना आपण करु यास, असे आवाहनच राज्यपालांनी रफींच्या चाहत्यांना केला.
 
भाजप नेते आ. आशिष शेलार यांच्या स्पंदन या संस्थेतर्फे मोहम्मद रफी यांच्या वाढदिवसा दिवशी त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी एका संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंताला जीवन गौरव व मोहम्मद रफी पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. पुरस्काराचे हे चौदावे वर्ष असून १ लाख रू. रोख, स्मृतीचिन्ह आणि शाल श्रीफळ असे जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप असून, ५१ हजार रू. रोख आणि मानचिन्ह असे रफी पुरस्काराचे स्वरूप आहे.
 
यावेळी पंडित ह्रदयनाथ मंगेशकर यांनी हा पुरस्कार स्विकारताना मला आनंद होत असून रफी ही एक संगीताला लाभलेली दैवी देणगीच होती. ते कलावंत म्हणून मोठे होते तेवढेच माणूस म्हणून मोठे होते. आपल्याला दैवाकडून जे मिळाले ते त्यालाच परत कसे करायचे याची जाण त्यांना होती. त्यामुळे ते कसे कसे या दैवी देणगीची परतफेड करायचे ते मी पहिलेय. असे सांगत पंडित ह्रदयनाथ मंगेशकर यांनी रफी यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.
 
या कार्यक्रमाला आमदार आशिष शेलार, प्रतिमा शेलार यांच्यासह रफी यांच्या कन्या नसरीन आणि यास्मिन याही उपस्थितीत होत्या. या नंतर ‘फिर रफी’ ही गाण्यांची मैफल रंगली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती