चिमुकल्या मायराची हिंदीमध्ये एन्ट्री

सोमवार, 8 मे 2023 (14:45 IST)
Instagram
'माझी तुझी रेशीमगाठ'त यश चौधरीच्या भूमिकेतील श्रेयस तळपदे, नेहा कामतच्या भूमिकेतील प्रार्थना बेहरे या कलाकारांना प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरले. मात्र सर्वाधिक प्रेम मिळाले ते परी कामत अर्थात बालकलाकार मायरा वायकुळला. मालिका संपल्यानंतरही मायरा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी जोडलेली होती.  परीला आता पुन्हा एकदा टीव्हीवर पाहता येणार आहे आणि तेही नव्या भूमिकेत. मायराची ही नवी भूमिका खूपच खास असणार आहे.
 
मायराची ही नवी भूमिका खूप खास याकरता आहे कारण या नव्या मालिकेत ती शीर्षक भूमिकेत दिसणार आहे. शिवाय यावेळी ती मराठी नव्हे तर हिंदीत काम करताना दिसेल. मायराच्या नव्या मालिकेचं नाव 'नीरजा: एक नयी पहचान' असं असून ही मालिका कलर्स टीव्हीवर पाहता येईल. मायराच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर 'नीरजा' मालिकेचा पहिला प्रोमो शेअर करण्यात आला आहे, ज्यात ती अभिनेत्री स्नेहा वाघसोबत स्क्रिन शेअर करताना दिसतेय.
 
नीरजाच्या प्रोमोमध्ये असे दाखवण्यात आले आहे की, नीरजा अर्थात मायराला घराबाहेर पडण्याची इच्छा असते. मात्र तिची आई (स्नेहा वाघ) काही कारणास्तव तिला घराबाहेर पडू देत नसते, यामध्ये तिच्या आईचा नाईलाज असतो. आता यामागचे नेमके कारण काय हे मालिका सुरू झाल्यानंतरच लक्षात येईल. दरम्यान 'नीरजा' साकारताना परीचा लूक मात्र पूर्णपणे बदलला आहे.  
Edited by : Smita Joshi 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती