जिया खानची हत्या की आत्महत्या? आज मिळणार प्रश्नाचं उत्तर

शुक्रवार, 28 एप्रिल 2023 (10:59 IST)
अभिनेत्री जिया खान मृत्यू प्रकरणात आज (28 एप्रिल) मुंबईतील विशेष न्यायालय निकाल सुनावण्याची शक्यता आहे.विशेष न्यायाधीश ए. एस. सय्यद यांच्या न्यायालयाने 20 एप्रिल रोजी या प्रकरणातील सुनावणी पूर्ण केली.
यानंतर यासंदर्भातील निकाल राखून ठेवण्यात आलेला आहे. हा निकाल शुक्रवारी (28 एप्रिल) देण्यात येईल, असं सांगितलं जात आहे. या प्रकरणात जियाचा बॉयफ्रेंड सुरज पांचोली याने जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.
 
अमेरिकन नागरिक असलेल्या जिया खानचा मृतदेह 3 जून 2013 रोजी संशयास्पद स्थितीत जुहूतील तिच्या राहत्या घरात आढळून आला होता. या घरात जिया ही तिच्या आईसोबत राहत होती.
 
त्यावेळी मुंबई पोलिसांनी म्हटलं होतं की, जिया खानला मृतावस्थेत कूपर रुग्णालयात आणलं गेलं.
या प्रकरणाच्या तपासात जियाने सहा पानांचं एक पत्र लिहिल्याचं आढळून आलं. त्या आधारावर पोलिसांनी सुरज पांचोलीला अटक केली होती. पोलिसांनी सुरजवर जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता.
 
मुंबई पोलिसांना जे पत्र आढळून आलं, ते जियानेच लिहिलं आहे, असं सीबीआयनेही म्हटलं आहे.
 
या प्रकरणाचा तपास सीबीआयने केला आहे. त्यामुळे हे प्रकरण आपल्या अधिकार क्षेत्राबाहेर आहे, असं मुंबई सत्र न्यायालयाने या प्रकरणात 2021 मध्ये म्हटलं. त्यानंतर हा खटला विशेष सीबीआय न्यायालयाकडे वर्ग करण्यात आला.
 
जियाची आई मुख्य साक्षीदार
या प्रकरणात मुख्य साक्षीदार जियाची आई राबिया खान या आहेत. जियाची आत्महत्या नसून हा एक हत्येचा प्रकार आहे, असा त्यांचा आरोप आहे.
 
गेल्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाने याचा पुन्हा तपास करण्याची मागणी फेटाळून लावली होती.
सीबीआय कोर्टात जियाच्या आईने आरोप केले की, सूरज हा जियासोबत शारिरीक अत्याचारासह अपशब्दांचाही वापर करायचा.
 
राबिया यांनी कोर्टात म्हटलं की, जियाने आत्महत्या केली, याबाबत पोलिसांनी किंवा सीबीआयने कोणतेही पुरावे जमा केले नाहीत.
 
सूरज पांचोली विरुद्ध सीबीआय प्रकरणात सुरजचे वकील प्रशांत पाटील यांनी गेल्या गुरुवारी आपला अखेरचा युक्तिवाद केला.
 
बॉलिवूड अभिनेते आदित्य पांचोली यांचा मुलगा असलेला सूरज हा सध्या जामिनावर बाहेर आहे.
 
आपल्या पत्रात जिया खान हिने सूरज पांचोलीसोबतचे आपले वैयक्तिक संबंध, शारिरीक आणि मानसिक अत्याचार, तसंच टॉर्चर यांच्याविषयी लिहिलं होतं.
 
सीबीआयने म्हटलं की या पत्रानुसार, या अत्याचारांना कंटाळून जियाने आत्महत्या करत असल्याचं म्हटलेलं आहे.
 
जिया खान कोण होती?
जिया खानचा जन्म न्यूयॉर्कमध्ये 1988 साली झाला होता. लंडनच्या चेल्सी परिसरात तिचं बालपण गेलं.
 
ती अली रिझवी खान आणि राबिया अमीन यांची मुलगी होती. माध्यमांमधील बातम्यांनुसार, राबिया खान या 1980 च्या दशकात एक अभिनेत्री म्हणून कार्यरत होत्या.
ताहीर हुसैन यांच्या 'दुल्हा बिकता है' चित्रपटात केलेल्या कामासाठी राबिया खान यांना ओळखलं जातं.
 
जिया खान हिला दोन लहान बहिणीसुद्धा आहेत. जियाचं खरं नाव नफीसा असं होतं. पण तिने ते बदलून जिया असं करून घेतलं.
 
जियाने लंडनमध्ये इंग्रजी साहित्य विषयाचं शिक्षण घेतलं. त्यानंतर तिने शेक्सपियर आणि अभिनयविषयक शिक्षणही घेतलं.
 
बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी आपल्या 'निःशब्द' चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत जिया खानला मुख्य भूमिका दिल्यानंत तिचं नाव सर्वप्रथम चर्चेत आलं.
 
चित्रपट जगताचा प्रवास
'निःशब्द' चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा जिया केवळ 19 वर्षांची होती. या चित्रपटाचा विषय अत्यंत संवेदनशील होता. चित्रपटातील तिच्या भूमिकेने लोकांचं लक्ष वेधून घेतलं. यामध्ये जियाने अत्यंत बोल्ड अभिनय केला होता. त्याची प्रचंड चर्चा झाली.
 
निःशब्द चित्रपट 2007 साली रिलीज झाला. जियाला या चित्रपटातील अभिनयासाठी फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. तरुणांमध्ये ती विशेष लोकप्रिय झाली.
 
ती एक प्रशिक्षित ओपेरा गायिका होती. पियानोही वाजवायची. तसंच याशिवाय तिला अनेक नृत्यप्रकारही अवगत होते.
 
ती साल्सा, जॅझ, कत्थक, बेले, रॅगी आणि बेली डान्स यांच्यासारख्या नृत्यप्रकारांमध्ये पारंगत होती.
 
यानंतर आमीर खानच्या 'गजनी' या सुपरहिट चित्रपटातही तिने काम केली. यानंतर हाऊसफुल चित्रपटात ती अक्षयकुमारसोबत दिसली. या चित्रपटालाही चांगलं यश मिळालं.
 
आईसोबत चर्चा
बॉलिवूड अभिनेत्री जिया खान हिच्या मृत्यूनंतर दहा दिवसांनी तिची आई राबिया खान यांनी बीबीसीशी संवाद साधला होता.
 
त्यांनी जियाच्या व्यक्तिमत्वातील अनेक पैलूंवर त्यावेळी चर्चा केली होती.
 
चर्चेदरम्यान अनेकवेळा जियाची आठवण काढून त्या भावनिक झाल्या. पण पुन्हा स्वतःला सांभाळून त्यांनी तिच्या चित्रपट कारकिर्दीचा प्रवास तसंच प्रेमसंबंध यांच्याबाबत माहिती दिली.
 
जिया ही अत्यंत मजबूत होती, तसंच अध्यात्मिकही होती, असंही राबिया यांनी सांगितलं.
राबिया यांच्या मते, “ती विविध विषयांवर आपल्या बहिणींना सल्ले देत असे. मग तो विषय शिक्षणाचा असो किंवा इतर कोणताही. अशी मुलगी इतकी कमकुवत कशी बनली, हे समजत नाही. ती इतरांना प्रत्येक परिस्थितीत लढण्याचा सल्ला देत होती.”
 
राबिया म्हणतात, “जियाची चित्रपट कारकिर्दही योग्य दिशेने सुरू होती. तिच्याकडे अनेक चांगले ऑफर होते. काही ऑफर तिने नाकारलेही होते. जरा विचार करा, इतक्या कमी वयात कुणी ऑफर नाकारू शकतं का?”
 
जिया पाच-सहा वर्षांची असताना तिने राम गोपाल वर्मा यांचा 'रंगीला' चित्रपट पाहिला होता. त्या चित्रपटातील गाण्यांवर ती डान्स करायची. पुढे तिला वर्मा यांचाच निःशब्द चित्रपट मिळाला.
 
राबिया पुढे सांगतात, “एके दिवशी तिने मला सांगितलं राम गोपाल वर्मांनी मला चित्रपटाची ऑफर दिली आहे. तिने मला विषय सांगितलं. मी मह्टलं या विषयावरचा चित्रपट भारतात पसंत केला जाणार नाही, तू हा चित्रपट का करत आहेस?”
 
“तेव्हा जिया म्हणाली, मी कुणासोबत काम करत आहे, माहीत आहे का, महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत. मी त्यावेळी तिच्या चेहऱ्यावरचं आनंद पाहू शकत होते. मी म्हटलं, ठीक आहे कर हा चित्रपट.”
 
नंतर पुढे जाऊन जियाने मोठ्या कलाकारांसोबत चांगल्या चित्रपटांमध्ये काम केलं.
 
Published By- Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती