प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेने या भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरू झाली होती. पण, आता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून याचे खंडन करण्यात आले आहे. तसेच खासदारकीचे तिकिट कोणाला द्यायचे याचा निर्णय केंद्रातील नेत्यांकडून घेण्यात येईल असे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले.
माधुरी दीक्षित या भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत. त्यानंतर त्यांना मुंबईतील एका मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येईल, असे बोलले जात होते. पण, माधुरी दीक्षित यांना तिकिट देण्याचा कोणताही इरादा नसून त्या भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत, असे भाजपमधील वरिष्ठ नेत्याने सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
विशेष म्हणजे माधुरी दीक्षित यांनी स्वत: भाजप प्रवेशाच्या चर्चांचे खंडन केले होते. सध्या तरी राजकारणात प्रवेश करण्याचा माझा कोणताही इरादा नाही, असे त्या म्हणाल्या होत्या. त्यानंतरही या चर्चा सुरूच होत्या. आता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील या चर्चांचे खंडन केले आहे. त्यामुळे या विषयावर पडदा पडण्याची शक्यता आहे.