लतादीदी अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

रविवार, 6 फेब्रुवारी 2022 (19:30 IST)
भारतरत्न आणि स्वर कोकिळा लता मंगेशकर यांच्यावर रविवारी मुंबईतील शिवाजी पार्कवर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबियांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला आणि लतादीदी या अनंतात विलीन झाल्या. 
 
यावेळी लतादीदींचे हजारो चाहते आणि कुटुंबीय उपस्थित होते. लतादीदींच्या अंत्यसंस्काराला चित्रपट जगतापासून ते राजकीय आणि क्रीडा जगतातील सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती.
गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. त्या 93 वर्षांच्या होत्या. 8 जानेवारीपासून त्यांच्यावर मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
 
मुंबईतल्या शिवाजी पार्कवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवाजी पार्कवर आले. यावेळी त्यांनी लतादीदींच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं.
 
लतादीदींच्या अंत्यविधीसाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत व्यक्ती शिवाजी पार्कवर उपस्थित राहिले.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, मनसे प्रमुख राज ठाकरे, अभिनेता शाहरूख खान, आमिर खान, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, गीतकार जावेद अख्तर आणि इतरही अनेक प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित राहिले.
 
याआधी लतादीदींचं पार्थिव 12.15 ते 12.30 वाजण्याच्या दरम्यान 'प्रभू कुंज' या त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आलं.
 
त्यानंतर सैन्य दल, नौसेना, वायुसेने दलातील शिष्टाचार विभागातील अधिकाऱ्यांनी मानवंदना दिली.
 
दरम्यान, लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवारी 7 फेब्रुवारी 2022 रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती