अभिनंदन परतायच्या आत निर्मात्यांना लागले चित्रपटाचे वेध

शनिवार, 2 मार्च 2019 (12:33 IST)
पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी अड्‌ड्यांवर कारवाई केली.
 
त्यानंतर पाकिस्ताननेही भारताच्या हद्दीत घुसण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यावेळी आपले मिग-21 विमान पाकिस्तानी हद्दीत कोसळून विंग कांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानने ताब्यात घेतले. अभिनंदन भारतात परतायच्या आत बॉलिवूड निर्मात्यांना या घटनेवर चित्रपट निर्मितिचे वेध लागले आहेत. या घटनेवर आधारित चित्रपट, वेब सीरिज किंवा टीव्ही शोच्या शीर्षकाची नोंदणी करण्यासाठी निर्माच्यांची रांग लागली आहे. हफींग्टनॉस्ट डॉट इनने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय हवाई दलाने ज्या दिवशी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून कारवाई केली, त्यानंतर लगेच मुंबईच्या अंधेरी इथल्या इंडियन पिक्चर्स प्रॉड्युसर्स असोसिएशनच्या कार्यालयात जवळपास पाच प्रॉडक्शन हाऊसचे निर्माते देशभक्तिवर चित्रपटांच्या शीर्षकाची नोंदणी करण्यासाठी जमले होते. बालाकोट, सर्जिकल स्ट्राइक्स 2.0, पुलवामा अटॅक्स यासारख्या शीर्षकासाठी  निर्मात्यांमध्ये चढाओढ सुरू होती असे तिथल्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. हाऊज द जोश या नावाचीही नोंदणी झाल्याची माहिती आहे.
 
सर्जिकल स्ट्राइकवर आधारित उरी : द सर्जिकल स्ट्राइक हा चित्रपट जानेवारीत प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफीसवर या चित्रपटाने 200 कोटींहून अधिक गल्ला जमवला. देशभक्तिवर चित्रपटांकडे प्रेक्षकांचा कल पाहता चित्रपट निर्मात्यांनी शीर्षक नोंदणीसाठी गर्दी केली आहे. आतापर्यंत पुलवामा, पुलवामा : द सर्जिकल स्ट्राइक, वॉर रुम, हिंदुस्तान हमारा है, पुलवामा टेरर अटॅक, द अटॅक्स ऑफ पुलवामा, टीएस- वन मॅन शो या नावांची नोंदणी झाली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती