सबा आझाद: ऋतिक रोशनची ही चर्चित मैत्रीण नेमकी आहे तरी कोण?
गुरूवार, 7 एप्रिल 2022 (12:39 IST)
- सुप्रिया सोगले
अभिनेता ऋतिक रोशन आणि त्याची मैत्रीण सबा आझाद यांच्याबद्दल सध्या बॉलीवूड इंडस्ट्रीत जोरदार चर्चा सुरू आहे.
ऋतिक आणि सबा नुकतेच मुंबई विमानतळावर हातात हात धरून जाताना दिसले. त्यामुळेच त्यांच्याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
'कहो ना प्यार है', चित्रपटापासून आपली अभिनयाची कारकीर्द सुरू करणाऱ्या ऋतिक रोशनला हिंदी चित्रपटातील सर्वात सुंदर अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखलं जातं.
2000 साली ऋतिकने प्रेयसी सुझैन खान हिच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. पण 2014 मध्ये दोघांनी परस्पर सहमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.
घटस्फोट झाल्यानंतरही ऋतिक आणि सुझैन एकमेकांसोबत अनेकवेळा दिसले होते. आपल्यामधील मैत्रीचं नातं अद्याप कायम असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
पण गेल्या काही दिवसांपासून ऋतिक आणि सबा आझाद यांच्या मैत्रीची आणि त्यांच्यात असलेल्या नात्याची चर्चा होऊ लागली आहे.
सबा आझादचं नाव फार पूर्वीपासून ऋतिकशी जोडलं जात होतं. एके दिवशी रोशन कुटुंबीयांच्या एका कौटुंबिक कार्यक्रमाचा फोटो ऋतिक रोशनचे काका राजेश रोशन यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. यामध्ये सबाच्या उपस्थितीमुळे ऋतिकच्या चाहत्यांच्या भुवया उंचावल्या.
यानंतर अनेकवेळा ऋतिकच्या कुटुंबीयांसोबत सबा आझाद दिसली. ऋतिक रोशनसुद्धा सबा आझादच्या सोशल मीडिया अकाऊंटवर कमेंट करताना दिसून येतो. त्यामुळेच ऋतिक आणि सबामधील नात्याबाबत विशेष चर्चा होताना दिसते.
सबा आझाद कोण आहे?
सबा आझादचं खरं नाव सबा सिंह ग्रेवाल आहे. 1 नोव्हेंबर 1990 रोजी तिचा दिल्लीत जन्म झाला. पंजाबी आणि काश्मिरी आई-वडिलांचं अपत्य असलेली सबा सार्वजनिक जीवनात वावरताना सबा आझाद हेच नाव वापरते.
सबाच्या नावावरून सुरुवातीच्या काळात तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आलं होतं. त्यावेळी तिने सोशल मीडियावर आपल्या नावाबद्दल समजावून सांगितलं होतं.
सबाला स्वतःवर कोणत्याही प्रकारचा शिक्का नको असून तिला सर्व गोष्टींपासून स्वतंत्र राहायचं आहे. स्वतःची ओळख स्वतः बनवायचं असं तिने ठरवल्यामुळेच ती स्वतःचं नाव सबा आझाद असं सांगते.
सबा ही नाट्यक्षेत्रातील महान कम्युनिस्ट लेखक-दिग्दर्शक सफदर हाश्मी यांची भाची आहे. ती 'जन नाट्य मंच' या आपल्या मामांच्या नाट्य समूहाशी लहानपणापासूनच जोडलेली होती.
सबाने नाट्यक्षेत्रात अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलं आहे. उदा. एम. के. रैना, हबीब तन्वीर, जी. पी. देशपांडे आणि एन. के. शर्मा इत्यादी.
सबा आझादने अनेक प्रकारची नृत्यकौशल्ये आत्मसात केली. तसंच ओडिसी शास्त्रीय नृत्यही तिने शिकलं. आपल्या गुरू किरण सहगल यांच्यासोबत त्यांनी परदेशातही अनेक सादरीकरणं केली आहेत.
सबा आझादने पृथ्वी थिएटर्समध्ये मकरंद देशपांडे दिग्दर्शित 'टू मेन प्ले' या नाटकात अभिनय करत मुंबईत आपलं पाऊल ठेवलं होतं.
पडद्यावरील अभियनाची सुरुवात तिने 'गुरूर' या ईशान नायर दिग्दर्शित शॉर्टफिल्ममधून केली. हा लघुपट न्यूयॉर्क आणि फ्लॉरेन्स यांच्यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये दाखवण्यात आला होता.
हिंदी चित्रपटांमधील प्रवास
सबाच्या चित्रपटांमधील अभिनय प्रवासाकडे आता एक नजर टाकू.
तिने दिल कबड्डी या चित्रपटातून बॉलीवूड कारकिर्दीस सुरुवात केली होती. हा चित्रपट 2008 मध्ये प्रदर्शित झाला होता. यात अभिनेता राहुल बोसची प्रमुख भूमिका होती.
2011 मध्ये यशराज फिल्म्सचा एक चित्रपट आला होता - 'मुझसे फ्रेंडशीप करोगे'. या चित्रपटात सबा साकिब सलीम याच्यासोबत प्रमुख भूमिकेत होती.
नुकतेच 'रॉकेट बॉईज' या वेब सिरीजमध्येही सबा दिसली होती. यामध्ये तिने परवाना ईराणी यांची भूमिका केली आहे. सबाच्या या भूमिकेचंही चांगलं कौतुक होताना दिसत आहे.
दरम्यान, 2010 मध्ये सबाने 'स्किन' नामक स्वतःचा थिएटर ग्रुप स्थापन केला. तत्पूर्वी, 'द लवप्यूक' या नाटकाचं दिग्दर्शन सबाने केलं होतं. त्याचा पहिला शो मुंबईच्या 'नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स एक्सपेरिमेंटल थिएटर'मध्ये सादर करण्यात आला होता.
संगीतात रस असलेल्या सबाने हिंदी चित्रपटांमध्ये गायनही केलं आहे. यामध्ये 'शानदार' चित्रपटातील 'नींद ना मुझको आये', 'कारवाँ' चित्रपटात 'भरदे हमारे गिलास' आणि 'मर्द को दर्द नहीं होता' चित्रपटातील 'नखरेवाली' या गाण्यांचा समावेश आहे.
सबा ही आमिर खानच्या धूम 3 चित्रपटातील अँथेम गाण्याचाही भाग होती. नसीरुद्द्दीन शाह यांचा मोठा मुलगा इमाद शाह याच्यासोबत मिळून सबाने 'पॉप्यूलर इलेक्ट्रॉनिक बँड मेड बाय मिंक' स्थापन केलं होतं.
माध्यमांमधील बातम्यांनुसार, सबाचं अनेक वर्षे इमाद शाह याच्यासोबत प्रेमप्रकरण सुरू होतं. दोघांमधील हे नातं नंतर संपुष्टात आलं तरी त्यांनी आपला म्युझिक बँड चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. अजूनही ते एकत्रित शो करताना दिसून येतात.
जानेवारी 2020 मध्ये शाहीन बाग येथे झालेल्या CAA आंदोलनातही सबा आझाद सहभागी झाली होती. यावेळी तिने 'इंडिया पीपल थिएटर असोसिएशन'चं 'तू जिंदा है' हे गाणं म्हटलं होतं. सबाने त्यावेळी फैज अहमद फैज यांची 'बोल के लब आझाद है' ही कविताही लोकांना ऐकवली होती.