ज्येष्ठ अभिनेते, लेखक आणि नाटककार गिरीश कर्नाड यांचे आज, प्रदीर्घ आजाराने वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी बंगळूर येथील निवासस्थानी गिरीश कर्नाड यांची प्राणज्योत मालवली. मराठी चित्रपट 'उंबरठा'मध्येही त्यांनी भूमिका साकारली होती. पद्मश्री, पद्मभूषण आणि ज्ञानपीठ पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. तुघलक, नागमंडल, हयवदन या मराठी नाटकांचं त्यांनी दिग्दर्शन केलं.
गिरीश कर्नाड यांचा जन्म 19 मे 1938 रोजी माथेरान येथील एका कोकणी कुटुंबात झाला. कर्नाड यांचे मूळगाव कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील ‘कार्नाड’ हे आहे. वडील रघुनाथ कर्नाड हे नावाजलेले डॉक्टर होते. आई कृष्णाबाई ऊर्फ कुट्टाक्का-बालविधवा असलेल्या त्यांनी डॉ. कर्नाडांशी विवाह केल्यानंतर सामाजिक टीका झाली. गिरीश कर्नाड यांचे शालेय शिक्षण पुण्यात झाले. गणित आणि संख्याशास्त्र हे विषय घेऊन कर्नाड प्रथम श्रेणीत बीए उत्तीर्ण झाले. त्यांचे उच्च शिक्षण लिंकन कॉलेज, ऑक्सफर्ड येथे झाले. कर्नाड हे शिकागो विद्यापीठाचे हंगामी प्राध्यापक आणि फुलब्राइट विद्वान होते. त्यांनी नाट्यक्षेत्रात स्वतःला झोकून दिले. प्रतिष्ठित ऱ्होडस शिष्यवृत्ती मिळवून ऑक्सफर्ड विद्यापीठात अर्थशास्त्र व राज्यशास्त्र या विषयांत 1963मध्ये त्यांनी पदवी मिळवली. त्यानंतर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसमध्येच काही काळ काम केल्यानंतर ते मद्रास येथील कचेरीत कार्यरत झाले.