बॉलिवूडमधीस प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन झाल्याची माहिती अभिनेता अनुपेम खेर यांनी ट्वीटद्वारे दिली आहे.
कौशिक 67 वर्षांचे होते.
अनुपेम खेर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "ही गोष्ट मी मान्य करतो की मृत्यू हे अंतिम सत्य आहे. पण ही गोष्ट कधी आपल्या जीवलग मित्राबाबत कधी जिवंतपणी लिहावी लागेल अशी कल्पनाच मी केली नव्हती. 45 वर्षांच्या मैत्रीला अचानक पण पूर्णविराम लागला आहे. हे आयुष्य कधीच आता पूर्ववत होणार नाही, सतीश."
असा शोकसंदेश अनुपम खेर यांनी लिहिला आहे.
ऑल इंडिया रेडियो न्यूजने देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
तेरे नाम, हम आपके दिल में रहते है, क्योंकी, इत्यादी अनेक सुपरहिट चित्रपटांचं त्यांनी दिग्दर्शन केलं होतं,
सतीश कौशिक यांनी अनेक चित्रपटातून अभिनय देखील केला. जाने भी दो यारो या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाच्या कारकीर्दीला सुरुवात केली. त्यांनतर मासूम, मंडी या चित्रपटात त्यांनी काम केले.
अनिल कपूर यांच्या मि. इंडिया चित्रपटात त्यांनी साकारलेली 'कॅलेंडर'ची भूमिका विशेष गाजली. अनेक वर्षं अभिनय केल्यानंतर त्यांनी दिग्दर्शनाकडे आपला मोर्चा वळवला.
अनिल कपूर आणि श्रीदेवी यांना सोबत घेऊन सतीश कौशिक यांनी रूप की रानी, चोरों का राजा हा चित्रपट काढला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष चालला नव्हता.
काही वर्षांनंतर आलेले हम आपके दिल में रहते है, हमारा दिल आपके पास है हे चित्रपट गाजले होते. तुषार कपूर आणि करीना कपूर यांना सोबत घेऊन त्यांनी मुझे कुछ कहना है चित्रपट काढला.
त्यांचा दिग्दर्शक म्हणून सर्वाधिक गाजलेला चित्रपट हा तेरे नाम ठरला. सलमान खानने अभिनय केलेल्या या चित्रपटाची इतकी क्रेझ निर्माण झाली होती की अनेक तरुण सलमान खानप्रमाणे केशभूषा करू लागले होते.
पंकज त्रिपाठी यांच्यासोबतचा कागज हा त्यांचा शेवटचा प्रदर्शित चित्रपट ठरला.
काही दिवसांपूर्वीच सतिश कौशिक यांनी एक फोटो ट्वीट केला होता. मुंबईत पहिल्यांदा आल्यावरचा हा फोटो होता.
9 ऑगस्ट 2022 ला त्यांनी हा फोटो ट्वीट केला होता. त्यात ते म्हणाले होते की, '43 वर्षांपूर्वी मी या शहरात आलो आणि या शहराने प्रेमाने मला कुशीत घेतलं आणि कधीच दूर होऊ दिलं नाही. असंच प्रेम करत राहा आणि शक्ती देत राहा. अजून अनेक स्वप्नं बाकी आहेत.'