काश्मीर फाइल्स, RRR, पृथ्वीराज : या वर्षी रिलीज झालेल्या चित्रपटांनी हिंदू-मुस्लिम दरी वाढवली की कमी केली?

गुरूवार, 29 डिसेंबर 2022 (13:31 IST)
- विकास त्रिवेदी
एक कथा, अनेक व्यक्तिरेखा, अनेकांची मेहेनत... या सगळ्यातून एक चित्रपट साकार होतो. अनेकदा चित्रपटांना समाजाचा आरसा म्हटले जाते.
 
पण हा आरसा अलीकडील काळात धूसर झाला आहे की स्वच्छ झाला आहे?
 
दोन धर्मातील एकी दिसताना, त्यांच्यातील तेढ कमी होताना किंवा ती अजूनच खोलवर जाताना दाखविण्यात आलेले चित्रपट आठवत आहेत का?
 
या गोष्टीमध्ये आपण 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या अशा काही चित्रपटांबद्दल बोलणार आहोत, ज्यातील एखादे दृश्य किंवा संपूर्णच चित्रपटाच्या पार्श्वभूमीलाच धार्मिक रंग होता.
 
तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा...
एखाद्या गाण्यात घातलेल्या कपड्यांना धर्माशी जोडले जाण्याच्या काळात ज्या चित्रपटांची पार्श्वभूमीच धार्मिक आहेत, अशा चित्रपटांचा उल्लेख करणे गरजेचे आहे. 
 
पण त्या आधी, या पूर्वी ज्या चित्रपटांमध्ये दोन धर्मांमधील सख्य किंवा तत्कालीन कटूपणा दर्शविण्यात आला होता त्या चित्रपटांचा आढावा घेऊ या. 
 
सन 1941. व्ही. शांताराम यांचा चित्रपट ‘पडोसी’ प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील पहिल्या दृश्यातच जेव्हा नमाज पठण करण्यासाठी मिर्झा येतात, तेव्हा रामायण वाचणारे पंडित (ठाकूर) तिथून उठतात. 
 
मिर्झा विचारतात – “ठाकूर, तुम्ही उठलात का, रामायणाची कथा पुढे वाचायची तुमची इच्छा होती ना?” पंडित म्हणतात – “मी वाचेन खरा, पण तिकडे तुमच्या नमाज पठणाची वेळ निघून गेली तर पाप मलाच लागेल ना.” 
 
या दृश्याची अजून एक गंमत होती. ती म्हणजे, या चित्रपटात पंडित ही व्यक्तिरेखा मजहर खान यांनी, तर मिर्झा ही व्यक्तिरेखा गजानन जहागीरदार यांनी साकारली होती. 
 
जेव्हा धर्माच्या आधारे पाकिस्तान हे राष्ट्र निर्माण करण्याची योजना आखली जात होती, तेव्हाचा हा चित्रपट आहे. 
 
या चित्रपटात एक गाव आहे. या गावात दोन मित्र आहेत. एक आहे हिंदू तर दुसरा मुसलमान. गावात बांध बांधण्यासाठी आलेल्या अभियंत्यांच्या मनात काहीतरी कट शिजत आहे. पण यावरून हे जुने मित्र परस्परांचे वैरी होतात. या गावातील हा नवीन बांध कोसळतो तेव्हा त्यांच्यातील वैर मिटते. 
 
1946 मध्ये प्रदर्शित झालेला पी. एल. संतोषी यांचा 'हम एक है' हाही असाच एक चित्रपट आहे. या चित्रपटातील जमीनदार आई तीन वेगवेगळ्या धर्माच्या मुलांचे पालन करते. आईची भूमिका दुर्गा खोटे यांनी साकारली आहे.
 
ही तीनही मुले आपपल्या धर्मानुसारच वर्तन करत मोठे होतात. 'हम एक है' या चित्रपटातून देवानंद यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.
 
1959 मध्ये ‘धूल का फूल’ या चित्रपटातील अब्दुल ही धर्माने मुसलमान असलेली व्यक्तिरेखा जंगलात सापडलेल्या मुलाचे पालनपोषण करते आणि या बेवारस मुलामुळे त्यालाही समाज वाळीत टाकतो.
 
अब्दुल या मुलाचे पालन करताना एका गाण्यात म्हणतो, " तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा..." गेल्या काही वर्षांत तुम्ही असे एखादे गाणे किंवा संवाद ऐकला आहे का?
 
याच यादीत ‘अमर, अकबर, अँथनी’ असे जीवन जगणाऱ्या तीन भावांची कथा पडद्यावर दाखवण्यात आली होती.
 
रंग दे बसंती
हिंदू-मुसलमानांमधील दंगली किंवा फाळणीचे दुःख व्यक्त करणारे अनेक चित्रपट तयार झाले आहेत. ही लिस्ट खूप मोठी आहे. पण या ठिकाणी आपण प्रभावी चित्रपटांची चर्चा करत आहोत. 
 
‘गर्म हवा’ हा बलराज सहानी यांचा चित्रपट विस्थापितांचे दुःख व्यक्त करतो. धर्माच्या आधारे देश सोडण्याऐवजी रोजगारासारख्या गरजा अधिक महत्त्वाच्या आहेत, हे या चित्रपटाच्या परिणामकारक क्लायमॅक्समध्ये दाखविण्यात आले आहे. 
 
पिंजर, ट्रेन टू पाकिस्तान आणि तमस हेसुद्धा असेच काही चित्रपट आहेत. 
 
बाबरी मशीद प्रकरणानंतर झालेल्या परिणामांवर आधारित मणिरत्नम दिग्दर्शित बॉम्बे, दंगलीच्या पार्श्वभूमीवर फिराक, देव आणि परझानिया यासारखे चित्रपट आले होते. 
 
‘बॉम्बे’ चित्रपटाच्या शेवटी हत्याकांड करणाऱ्यांना हत्यारं खाली टाकायला सांगून त्यांना हातात हात घ्यायला लावले होते. 
 
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात सिनेमा स्टडीज या विषयाच्या प्राध्यापक इरा भास्कर यांनी बीबीसी हिंदीला सांगितले, "बॉम्बे चित्रपटाच्या शेवटी दोन्ही धर्मांच्या लोकांमध्ये सौहार्द असला पाहिजे, असे दाखविण्यात आले आहे. हातात हात घेताना दाखवून हिंदू-मुसलमानांची समस्या संपणार नाही. पण किमान असे झाले पाहिजे, एकोप्याने राहिले पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही." 
 
या चित्रपटांमधून त्या काळातील वस्तुस्थिती दाखविण्याचा प्रयत्न झाला होता. 
 
सरफरोश चित्रपटात मुकेश ऋषी यांनी इन्स्पेक्टर सलीम ही व्यक्तिरेखा साकारली होती. सलीम एसीपी अजय सिंह राठोडला (आमिर खान) म्हणतो, " बचाने के लिए 10 नहीं, 10 हज़ार सलीम मिलेंगे. अगर आप भरोसा करेंगे तो.... फिर कभी किसी सलीम से ये मत कहना कि ये मुल्क उसका घर नहीं.'' 
 
2006 मध्ये प्रदर्शित रंग दे बसंती या चित्रपटात लक्ष्मण पांडे (अतुल कुलकर्णी) आणि अस्लम (कुणाल कपूर) या व्यक्तिरेखांचा प्रवास हिंदू-मुसलमानांमधील तेढ दाखविण्यापासून सुरू झाला आणि कालांतराने त्यांच्यात आपुलकीचे नाते निर्माण होता दाखविण्यात आले. 
 
चित्रपटाच्या प्रदर्शनावर संकट येऊ पाहत असताना आणि खटला दाखल होण्याची भीती असताना रंग दे बसंतीशी निगडित एक किस्सा सांगणे अत्यावश्यक आहे. 
 
रंग दे बसंती चित्रपटातून सत्ता आणि पुढारी-सरकारी कर्मचाऱ्यांच्या गटाकडे अंगुलीनिर्देश करते. 
 
वायुदलाच्या विमानांच्या दुर्घटना आणि देशाच्या संरक्षणमंत्र्यांवर ताशेरे ओढणारा हा चित्रपट प्रदर्शनाच्या आधी तत्कालीन संरक्षण मंत्री प्रणब मुखर्जी आणि सेनाप्रमुखांना दाखविण्यात आला. 
 
चित्रपट पाहून प्रणव मुखर्जी म्हणाले, "देशाचे संरक्षण करणे हे माझे काम आहे, चित्रपटांना सेन्सॉर करणे नाही. मुलांनी चांगले काम केले आहे." 
 
ज्या चित्रपटात कामकाजातील भ्रष्टाचारामुळे संरक्षणमंत्र्यालाच गोळी मारल्याचे दाखविले आहे, त्या चित्रपटाचा हा किस्सा आहे. 
 
2002 च्या दंगलीवर आधारित काय पो चे हा चित्रपटही खूप प्रभावी होता. 
 
द्वेषाची झळ किती बसू शकते आणि मनाला किती अपराधी वाटू शकते, याचे काय पो चे हा चित्रपट म्हणजे उत्तम उदाहरण आहे. 
 
विशेषतः अली या मुसलमान मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात ईशान आपला जीव गमावतो आणि शेवटी अपराधीपणाची भावना मनात निर्माण झालेला ओमी... ज्याचे ढळणारे अश्रू सांगतात की, मोठ्यात मोठी आगसुद्धा एका आसवाने विझू शकते. 
 
2012 मध्ये प्रदर्शित झालेला ओह माय गॉड आणि पीके सारखे चित्रपटसुद्धा धर्माला मानणाऱ्या लोकांमध्ये तेढ वाढविणाऱ्यांचे पितळ उघडे पाडतात. 
 
अलीकडे चित्रपटांमुळे निर्माण झालेल्या वादांवर भाष्य करताना प्राध्यापक इरा म्हणाल्या, "आपल्याला इराण किंवा चीनसारखे व्हायचे आहे का? १०० वर्षे वय असलेल्या भारतीय सिनेमामध्ये असे काही घडले नाही, मग आता असे का होत आहे, याचा विचार केला पाहिजे." 
 
RRR : 2022 मध्ये रिलीज झालेल्या सिनेमांत काय दिसलं?
आरआरआर या चित्रपटातील या दृश्यात पंचर काढण्याचा विषय येतो.
 
आता प्रश्न आहे आहे की, 2022 च्या कोणत्या चित्रपटांच्या पार्श्वभूमीवर कुठे ना कुठे धर्म होता आणि कोणता संदेश द्यायचा प्रयत्न झाला किंवा सोशल मीडियाच्या या काळात प्रेक्षकांपर्यंत किंवा नागरिकांमध्ये कोणता संदेश गेला? अशाच काही चित्रपटांचा आपण आढावा घेणार आहोत.
 
बाहुबलीकर्ते राजामौली यांच्या आरआरआर या चित्रपटातील एका दृश्यात एनटीआर ज्युनियर आणि राम चरण यांच्यात एक संवाद आहे.
या दृश्यात राजू (राम चरण) आपल्या मित्रासाठी म्हणजेच अख्तरसाठी (एनटीआर ज्युनियर) जेनिफरची गाडी खिळे पसरून थांबवतो.
 
गाडी थांबल्यावर म्हणजे टायर पंक्चर झाल्याचे समजताच अख्तर म्हणतो, "आता मी पंक्चर दुरुस्त केल्यावर ती आभार मानेल आणि मग आपण बोलून घेऊ."
 
अख्तर जेनिफरला म्हणतो, 'मेरी दुकान पास में ही है, पाँच मिनट में ही ठीक कर दूंगा.'
 
संपूर्ण संदर्भ पाहिला तर या दृश्यात चित्रपटातील दोन व्यक्तिरेखांना भेटविण्याची शक्यता दिसते.
 
खरे तर मुसलमानांच्या पंचर दुरुस्त करण्याच्या कामाबद्दल तुम्ही अनेक टिप्पण्या वाचल्या असतील. त्यामुळे लोकांनी या दृश्याला वेगळ्याच नजरेतून पाहिले.
 
काही सोशल मीडिया पोस्ट्समध्ये राजामौलींनी मुसलमान व्यक्तिरेखा अख्तरच्या तोंडी पंचर दुरुस्त करण्याचा संवाद घातल्याबद्दल राजौमौलींची प्रशंसा केली. 
 
याच आरआरआर या चित्रपटात शेवटी स्वातंत्र्यासाठी लढणारे नेते, क्रांतिकारकांना सलाम केला आहे. पण महात्मा गांधी आणि नेहरू यात दिसत नाहीत. 
 
राजामौली यांचे वडील आणि बजरंगी भाईजानसारख्या चित्रपटांची कथा लिहिणारे लेखक के. व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनी याचे कारण सांगितले, "कारण गांधींमुळे सरदार पटेल नाही तर नेहरू पंतप्रधान झाले आणि काश्मीर अजूनही धुमसतेच आहे." 
 
2022 मध्ये के. व्ही. विजयेंद्र प्रसाद यांना राज्यसभेसाठी नामांकित करण्यात आले. 
 
काश्मीर फाइल्स
काश्मीरच्या पार्श्वभूमीवर अनेक चित्रपट तयार झाले. उदा. रोजा, हमीद, मिशन कश्मीर, यहाँ, तहान, हैदर, शिकारा.
 
पण ‘द कश्मीर फाइल्स’सारखे यश दुसऱ्या चित्रपटांना मिळाले नाही.
 
आयएमडीबी या वेबसाइटनुसार या चित्रपटाच्या निर्मितीचे बजेट 20 कोटी होते तर या चित्रपटाने 340 कोटींहून अधिक कमाई केली.
 
किंबहुना ‘द कश्मीर फाइल्स’ हा बहुधा असा पहिलाच चित्रपट होता, जो पाहण्याचे आवाहन देशाच्या पंतप्रधानांनी केले असावे.
 
मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा असोत किंवा यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असोत, जे चित्रपट किंवा गाण्यांमुळे भावना दुखावल्याबद्दल अनेकदा तक्रार करतात, सर्वजण 'काश्मीर फाइल्स' या चित्रपटाबद्दल उत्साही आणि उदारमतवादी दिसले.
 
अनेक राज्यांमध्ये चित्रपटांना करमुक्त केले गेले.
 
हा चित्रपट 1990 मधील काश्मिरी पंडितांच्या पलायनाच्या सत्य घटनेवर आधारित होता. काश्मिरी पंडितांना एका रात्रीत काश्मीरमधून कशा प्रकारे निष्कासित व्हावे लागले होते, हे दाखविण्यात आले आहे.
 
मोठ्या लोकसंख्येला हा चित्रपट खूप आवडला होता. कित्येक वर्षे काश्मिरी पंडितांच्या या पैलूकडे दुर्लक्ष करण्यात आले होते, असे म्हटले गेले.
 
पण या चित्रपटातून कोणता संदेश गेला? हे तुम्ही अनेक दृष्टिकोनातून समजून घेऊ शकता.
 
तुमच्या आजुबाजूला एक प्रकारची चर्च होत असेल. त्याचप्रमाणे जेव्हा चित्रपटगृहांमध्ये ‘काश्मीर फाइल्स’ सुरू होता तेव्हा काही व्हिडिओ शेअर होत होते. त्यात चित्रपट पाहून पडणारे प्रेक्षक रडत होते आणि ते विवेक अग्निहोत्रींच्या पाया पडत होते.
 
काही असेही व्हिडिओ शेअर झाले ज्यात चित्रपट संपल्या संपल्य काही लोक मुसलमान मुलींशी लग्न करून मुले जन्माला घालताना किंवा हिंसक वृत्तीचे प्रदर्शन करताना दिसत होते.
 
या व्हिडिओंमधून काश्मीरच्याच मुद्यावर तयार करण्यात आलेल्या ‘हैदर’ या चित्रपटाची आठवण करून देतात, " इंतकाम से सिर्फ़ इंतकाम पैदा होता है.'
 
मग, प्रेक्षकांना शिकारासारखा चित्रपट का आवडला नाही आणि काश्मीर फाइल्स इतका का आवडला?
 
काश्मिरी पंडित संजय काक यांनी बीबीसीला सांगितले, "द काश्मिर फाइल्सने ही गोष्ट उजव्या विचारसरणीच्या लोकांना जशी हवी होती, तशीच सांगितली. शिकारा हा चित्रपट तसा नव्हता. पण काश्मिर फाइल्स जगासमोर आणण्यासाठी जणू संपूर्ण इकोसिस्टिम कामाला लागली होती, असे वाटत होते.
 
बनारस हिंदू विद्यापीठातील प्राध्यापक आणि चित्रपट समीक्षक आशीष त्रिपाठी म्हणतात, "या विचारसरणीच्या लोकांनी राजकारणात प्रगती केल्यामुळे हा चित्रपट लोकप्रिय झाला." 
 
उजव्या विचारसरणीसाठी एक अत्यंत मोठा मीडिया काम करत आहे, सिनेमा हा त्याचाच एक भाग आहे. हा विचार पुढे नेण्यासाठी एक पूर्ण कॅटेगरी काम करत आहे. काश्मीर फाइल्स त्याच विचारसरणीचे प्रतिनिधीत्व करते. काश्मीर फाइल्समधील काही दृश्ये तुम्हाला सुन्न करतात हे सत्य आहे. या घटना कोणासोबत तरी घडलेल्या आहेत, हे हा चित्रपट न आवडलेल्या लोकांनी लक्षात घेतले पाहिजे. आपल्याला पुढे नेण्यास मदत करणारे मानवी पैलू उलगडून दाखविणे हेसुद्धा कलेचे एक काम असते. असे घडले नाही तर आपण कायम भूतकाळातच जगत राहू. 
 
प्रपोगंडा चित्रपट नेहमीच वाईट असतात असे नाही. पण काश्मीर फाइल्स हा एक वाईट प्रोपगंडा चित्रपट आहे. कारण हा चित्रपट समाजाला जोडणाऱ्या घटकांकडे पूर्ण दुर्लक्ष करतो. समाजाला जोडणाऱ्या कमकुवत होत जाणाऱ्या बलस्थानांवर हा चित्रपट हल्ला करतो." 
 
याच काश्मीर फाइल्स या चित्रपटाला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचे प्रमुख ज्युरी नदाव लॅपिड यांनी प्रचारकी आणि वाईट चित्रपट असल्याचा शेरा दिला. 
 
प्राध्यापक इरा भास्कर म्हणतात, "मी वर्गात काश्मीरच्या पार्श्वभूमीवरील हैदर हा चित्रपट शिकवला. त्यानंतर मी काश्मीर फाइल्स हा चित्रपट पाहिला. मी आश्चर्यचकीत झाले. काश्मीर फाइल्सने धार्मिक तणाव वाढवलाच, त्याचप्रमाणे ही एकांगी गोष्ट आहे. काश्मिरी पंडितांना कोणत्या संकटांना सामोरे जावे लागले याची मला जाणीव आहे. पण मुसलमानांनाही परिणाम भोगावे लागले होते." 
 
इरा भास्कर काश्मीर फाइल्सच्या प्रचाराबद्दल म्हणाल्या, "चित्रपटाची तिकिटे मोफत वाटण्यात आली. नेत्यांनी या चित्रपटाचा खूप प्रसार केला. यातून हेच दिसून येते की, चित्रपटाला सत्तेचे समर्थन मिळाले आहे. देशातले नेते एखाद्या चित्रपटाचा प्रचार करत असल्याचे मला यापूर्वी कधीही दिसले नव्हते. विवेक अग्निहोत्रींना अवकाश प्रदान करण्यात येत असेल तर बाकीच्या चित्रपटकर्त्यांनाही संधी दिली गेली पाहिजे." 
 
चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री या वादांवर भाष्य करताना म्हणाले, "लोकांनी काश्मीरच्या नावाने अनेक प्रकारच्या गोष्टी केल्या आहेत. चर्चा केली आहे. मी अनेक प्रकारचे चित्रपट केले होते आणि इतरही गोष्टी केल्या होत्या. त्यामुळे काश्मीरबद्दल लोकांना नक्कीच कळवळा आहे, याची मला खात्री होती." 
 
मला खात्री होती की काश्मीर या चित्रपटाचा स्टार आहे. जे लोक दिवसरात्र काश्मीरचा जप करतात, त्यांच्या हृदयात इतके काश्मीर तर नक्कीच असेल की, चित्रपटात कोणी स्टार आहे की नाही, याची चिंता ते करणार नाहीत. 
 
सीता रामम : हिंदू-मुस्लिम प्रेमकथा
‘सीता रामम’ हा चित्रपट म्हणजे एक प्रेमकथा आहे, ज्यात लेफ्टनंट राम याला एक अनोळखी मुलगी सीता महालक्ष्मीच्या नावाने पत्र लिहित असते. 
 
ही खरे तर राजकुमारी नूरजहाँ असते. हे दोघे एकमेकांना भेटले, त्यांच्यात प्रेम झाले, या गोष्टीत काश्मीरही आले आणि हिंदू-मुसलमानांशी संबंधित मुद्देसुद्धा आहे. 
 
हा चित्रपट काहीसा दुर्मीळच म्हणावा लागेल, कारण या चित्रपटात पाकिस्तानी व्यक्तिरेखासुद्धा मानवी आणि भावनिक जाणीवांमधून दाखविण्यात आल्या. रामाचा संदेश पोहोचविण्यासाठी पाकिस्तानी मुलगी भारतात इकडून तिकडे जाताना दाखवली आहे.  
 
चित्रपटातील काही दृश्यांमध्ये काश्मिरी पंडितांची घरे जाळण्यात किंवा वाचविण्यात मुसलमानांनी केलेले प्रयत्नसुद्धा दाखविले आहेत. यात सकारात्मकता दिसून येते. 
 
अनाथ लेफ्टनंट राम चित्रपटात लोकांना जोडताना दिसून आला. 
 
एका दृश्यात, अतिरेकी मारले जातात, तेव्हा राम जवळ ठेवलेले कुराण उचलतो आणि म्हणतो – कदाचित पुढच्या जन्मात तुम्हाला कुराणचा खरा अर्थ समजेल! 
 
लोकसंख्येचा एक असा टक्का जो कुरणाचा वेगळाच अर्थ समजून आपले मत तयार करतो, त्याच्याशी या संवादाचा अर्थ जोडून विचार करा. 
 
तरुणांची धर्माच्या नावाने कशा प्रकारे दिशाभूल केली जाते, यावरही या चित्रपटातून ताशेरे ओढण्यात आले आहेत. 
 
उदा. हा संवाद, ''मज़हब के नाम पर छिड़ी जंग जब ख़त्म हुई तो बाक़ी बचा था तो सिर्फ़ इंसान. हाथ में हथियार लेकर लड़ने वाला बस एक सिपाही है पर धर्म को हथियार बनाने वाला... राम.'' 
 
'सीता रामम' हा चित्रपट काहीसा वीर झाराच्या कथेजवळ जाणारा वाटला तरीही ते नवीन वाटतो. जेव्हा राम समोर येतो तेव्हा नूरजहा पटकन म्हणते, ''अब मुझे नूरजहां नहीं... सीता कहिए.'' 
 
तथाकथित लव्ह जिहादच्या या काळात एक मुसलमान मुलगी राम नावाच्या हिंदू मुलासाठी प्रेम आणि पाकिस्ताच्या मुलीचा रामाबद्दलचा सन्मान वाढत जाणे. सीता रामममध्ये असे अनेक पदर होते. 
 
'सीता रामम' या चित्रपटात रामची व्यक्तिरेखा दुलकर सलमान आणि राजकुमारी नूरजहाची व्यक्तिरेखा मृणाल ठाकूरने साकरली होती. 
 
प्राध्यापक इरा भास्कर म्हणतात, "सीता रामम सारखे चित्रपट धार्मिक तेढ कमी करण्याचा प्रयत्न करतात. हा एक छान चित्रपट आहे, ज्यात हिंदू-मुसलमान युगुलामधला रोमान्स दाखविला आहे. 
 
जेव्हा सगळीकडेच द्वेष पसरलेला असेल तेव्हा एखाद्या दृश्याने द्वेष कमी होत नाही. त्याचप्रमाणे भारतातील प्रत्येक प्रांत एकसारखा नाही, हेही आपण लक्षात घेतले पाहिजे.  
 
सम्राट पृथ्वीराज
पृथ्वीराज चौहान यांच्या मृत्यूच्या 350 वर्षांनंतर लिहिण्यात आलेल्या पृथ्वीराज रासो (लेखक - चंद बरदाई) यावर आधारित चित्रपट सम्राट पृथ्वीराज अनेक भाजपाशासित राज्यांमध्ये टॅक्स फ्री करण्यात आला.
 
गृहमंत्री अमित शहांनी एका स्पेशल स्क्रीनिंगमध्ये हा चित्रपट पाहिला आणि याचा भरपूर प्रचार झाला.
 
मोगलांबद्दल बरेच काही सांगितले गेले, पण हिंदू राज्यकर्त्यांबद्दल कोणतेही ठोस काम झालेले नाही, असेही म्हटले जाते. तसेच हिंदू राज्यकर्त्यांची कथाही चित्रपटांमध्ये सांगितली जात नव्हती, असेही म्हटले गेले.
 
इतके सगळे होऊनही सम्राट पृथ्वीराज पाहण्यासाठी प्रेक्षक आले नाहीत. सामान्य जनतेपासून ते चित्रपट समीक्षकांपर्यंत सगळ्यांनीच या चित्रपटाकडे पाठ फिरवली.
 
टीकाकार असेही म्हणतात की, पृथ्वीराजसारखे चित्रपट मुसलमानांना बाहेरून आलेले व क्रूर आक्रमणकर्त्यांच्य छबीशी जोडण्याचे काम करतात.
 
इतिहासकार अरूप बॅनर्जी यांनी बीबीसीला सांगितले, "असे चित्रपट एका निश्चित उद्दिष्टाने तयार करण्यात येतात. पृथ्वीराज आपल्या राज्याच्या रक्षणासाठी लढले होते. ते कोणा मुसलमान आक्रमणकर्त्याविरोधात लढले नव्हते.
 
अशा वेळी एखाद्या राजकीय पक्षाचा कल लक्षात घेत पृथ्वीराज चौहान यांचा वापर करणे चुकीचे आहे. हिंदूंनी मुसलमानांवर विजय मिळविला हा विचार पक्का करणे हे या चित्रपटाचे उद्दिष्ट होते.
 
चित्रपट समीक्षक शुभ्रा गुप्ता म्हणतात, "असे अनेक चित्रपट भूतकाळाचे गुणगान करण्यासाठी तयार करण्यात येतात, जेणेकरून प्रेक्षक त्यात गुंतून राहतील आणि आज जे घडत आहे, त्याकडे त्यांचे लक्षच जाणार नाही. हे भारतातच नव्हे तर जगभर होत आहे."
 
प्राध्यापक आशीष त्रिपाठी म्हणतात, "आता तयार होणारे ऐतिहासिक चित्रपट लोकांच्या भावनांना चेतवण्याचा प्रयत्न करतात. सम्राट पृथ्वीराजसारखे अनेक चित्रपट याचे उदाहरण आहेत. मुसलमान राज्यकर्त्यांची नकारात्मक प्रतिमा दाखविणारे अनेक चित्रपट तयार झाले आहेत.
 
या चित्रपटात दाखवलेले प्रसंगही काल्पनिक असतात. पण या चित्रपटातून चुकीचा इतिहास दाकवला जातो. त्याचप्रमाणे समाजातील अंतर्विरोधाला हे चित्रपट प्रोत्साहन देतात. अशा चित्रपटांमध्ये समाजाला जोडण्याच्या गोष्टी करणाऱ्यांची निवड केली जात नाही.
 
लाल सिंह चढ्ढा
2022 अजूनही काही चित्रपट आले. या चित्रपटांच्य केंद्रस्थानी धर्म नव्हता. पण आशा दिसून आली.
 
यात पहिले नाव येते लालसिंग चढ्ढाचे. या चित्रपटातील अनेक दृश्यांमध्ये 1984 चे ऑपरेशन ब्ल्यू स्टार, इंदिरा गांधींची हत्या आणि बाबरी मशीदीच्या पतनानंतर झालेल्या दंगली आणि 1993 च्या बॉम्बस्फोटांचा उल्लेख आला. पण या चित्रपटात 2002 च्या दंगलीचा संदर्भ येत नाही.
 
आमिर खान म्हणजेच लालसिंग चढ्ढाची आई दंगल झाल्यावर आपल्या मुलाला घरीच राहण्यास सांगते. ती म्हणते, 'बाहर नहीं जाना, बाहर मलेरिया फैला हुआ है. '
 
पण या चित्रपटात मोहम्मद भाईच्य व्यक्तिरेखेच्या आधारे एक पाकिस्तानी भारतात राहून आणि एक माणूस म्हणून अधिक चांगला झाल्याचे कथानक पेरण्यात आले आहे.
 
दलजीत दोसांजचा चित्रपट ‘जोगी’ हा 1984 च्या शीख दंगलींची गोष्ट आहे. या चित्रपटात त्या काळातील अडचणी दाखविण्यात आल्या आहेत.
 
चित्रपट किती बदलला आहे आणि चित्रपटांमधून धार्मिक सौहार्दाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न कितपत चुकीचा आहे आणि किती योग्य आहे, हा खरा प्रश्न आहे.
 
प्राध्यापक इरा भास्कर म्हणतात, "इतक्या गोष्टी आजुबाजूला घडत आहेत, पण त्याचे प्रतिबिंब चित्रपटांमध्ये दिसत नाही. म्हणजेच चित्रपटकर्त्यांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दबाव आहे. चित्रपटसुद्धा बहुसंख्याकवादाच्या राजकारणाला लक्षात घेऊन तयार होत आहेत.
 
आवश्यक मुद्दे आणि प्रश्न घेऊन काही लहान चित्रपट तयार होत आहेत. मुल्क सारखे चित्रपट तयार होतात, पण ते मोठ्या पातळीवर नाही होत.
 
इरा यांच्यानुसार चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही तर ती एक कला आहे आणि समाजाला आवश्यक असलेले मुद्दे मांडण्याचे ते एक माध्यम आहे ही चित्रपटनिर्मात्यांची जबाबदारी आहे.
 
प्राध्यापक आशीष म्हणतात, "हिंदी सिनेमाममध्ये व्यावसायिक सिनेमा वाढला. पण गोविंद निहलानी, श्याम बेनेगल यांच्यासारख्या मोठ्या चित्रपटकर्त्यांची संख्या मात्र घटली."
 
धार्मिक तेढ कमी करण्यासाठी चित्रपट मोठा वाटा उचलू शकतात?
या प्रश्नाच्या उत्तरावर प्रा. इरा म्हणाल्या, "धर्मातील दरी वाढविण्यासाठी किंवा ती बुजविण्यासाठी चित्रपट वाटा उचलू शकतात. चित्रपट राजकीय उत्तर देऊ शकत नाहीत. पण विचार निश्चितच बदलू शकतात. धार्मिक दूरियों को ख़त्म करने में फ़िल्में कितना बड़ा रोल अदा कर सकती हैं? तसे नसेल तर सध्याचे सरकार या चित्रपटांमध्ये इतकी गुंतवणूक का करत आहे? सोशल मीडियापासून ते चित्रपटांपर्यंत ते आपल्या विचारधारेचा प्रसार करत आहेत."
 
इरा म्हणतात, "हिंदीमध्ये मुख्य प्रवाहाताली राजकीय वातावरण मुसलमानांच्या विरुद्धच्य द्वेषाने भरलेले आहे. अंतर कमी करणारे चित्रपट तयार होणे कठीण आहे.
 
असे चित्रपट तयार झाले तरी त्यांच्यासमोर अनेक अडचणी येतील. सत्तास्थानी असलेले नेते जे म्हणत आहेत, त्यालाच अनेक मोठे अभिनेते दुजोरा देत आहेत. ते स्वतःला या सगळ्यापासून वेगळे ठेवत नाही आहेत. एक कलाकार म्हणून जेव्हा तुम्हाला गरजेच्या मुद्द्यांवर बोलणे आवश्यक असते तेव्हा तुम्ही मुग गिळून गप्प बसता."
 
आशीष त्रिपाठी यांचेही असेच म्हणणे आहे, "आता हेच पाहा ना, वीर हमीद यांच्यावर एकही चित्रपट झालेला नाही. खऱ्या मुलाचे कर्तव्य पार पाडलेल्या लोकांविषयी कोणीही बोलणार नाही. त्याचप्रमाणे फितूर झालेल्या हिंदूविषयीही कोणी काही बोलणार नाही."
 
सिनेमाच्या अर्थशास्त्राचा त्यावर मोठा प्रभाव आहे. चित्रपट पाहणारे मोठ्या संख्येने मध्यमवर्गीय हिंदू आहेत. अशा वेळी चित्रपटही त्यांना डोळ्यासमोर ठेवून तयार केला जातो.
 
आता सेक्युलर सिनेमा कमी झाला आहे. मला वाटते की, राजकीय, सामाजिक शक्ती समाज व राजाकारणात जेव्हा कमकुवत होईल, तेव्हाच तो सिनेमा बदलेल. ही एक अशी काल आहे, जी प्रेक्षकांच्या आवडीनिवडीनुसार प्रभावीत होते.
 
धर्मातील तेढ ही बहुधा दंगलींचे रूप धारण करते. अशा वेळी दंगलींपासून बचाव करण्यासाठी आणि धर्माला मनाणाऱ्यांमध्ये जवळीक वाढविण्यासाठी 'बाई' या 'मॉडर्न लव्ह मुंबई' या सीरीजमधील गोष्टीत समजवण्याचा प्रयत्न केला आहे.
 
कथेच्या एका दृश्यात, जेव्हा घरातील वृद्ध आजी दंगलखोरांसाठी गेट उघडते तेव्हा त्या परत जातात.
 
त्यानंतर जेव्हा बाईला विचारले जाते की, दंगलखोरांना काय म्हणालीस? ती उत्तर देते की, "पैसे देऊ केले. द्वेष पसरवणारे लोक बहुधा विकले जातात. त्यांना पैसे दिले आणि ते निघून गेले."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती