सदाबहार देव आंनद यांना कोण ओळखत नाही. या महिन्याच्या 26 तारखेला सदाबहार अभिनेते देव आनंद यांची जन्मशताब्दी आहे. देव आनंदचे जगभरात करोडो चाहते आहेत. ते जेव्हाही मुंबईत येतात तेव्हा त्यांचा 1950 साली बांधलेला जुहू येथील बंगला नक्कीच बघतात. देव आनंद यांनी आपल्या आयुष्यातील 40 सुंदर वर्षे यात घालवली पण बराच काळापासून बंद पडलेला हा बंगला आता जमीनदोस्त होणार आहे. येथे 22 मजली इमारत उभी राहील आणि त्यासोबतच या शहरातून देव आनंद यांची शेवटची आठवण कायमची जाणार.
26 सप्टेंबर 1923 रोजी अविभाजित पंजाबमधील शकरगढ येथे जन्मलेल्या देव आनंद यांनी त्या काळात जुहू येथे बंगला बांधला होता जेव्हा येथे खूप शांतता होती. लोकांची गजबज नव्हती. जुहू समुद्रकिनाऱ्यावर मच्छिमारांची वस्ती असायची. आणि त्या काळात देव आनंदला सिनेमाच्या गोंगाटाचा कंटाळा आला की ते या बंगल्यात यायचे. ही गोष्ट 1950 सालाची आहे. .
पण एकांतात राहण्याची सवय असलेल्या देव आनंदला जुहूमधली वाढती गर्दी आवडली नाही. त्यांच्या घरासमोर एक भव्य आणि हिरवेगार उद्यान असायचे. हे उद्यान नसल्यामुळे आणि तिथे इतर बंगले बांधल्यामुळे देव आनंद यांना गुदमरल्यासारखे व्हायचे. देव आनंद यांच्या जुहूच्या बंगल्याचा सौदा सुमारे 400 कोटी रुपयांचा असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या केवळ चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली असून त्याची कागदोपत्री कार्यवाही होणे बाकी आहे.
बंगला विकण्यामागचे मुख्य कारण आता मुंबईत देव आनंदचा कोणताही वारस नसणे हे मानले जात आहे. 2011 मध्ये वडिलांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा सुनील आनंदही इथे क्वचितच येतो. त्याने आपले कुटुंब लंडनमध्ये स्थायिक केले आहे. देव आनंद यांची मुलगी देविना आता उटी येथे राहते. आई कल्पना कार्तिकसोबत. 1954 मध्ये कल्पनासोबत लग्न केल्यानंतर देव आनंद आपल्या दोन मुलांसह या बंगल्यात वर्षानुवर्षे राहत होते. परंतु, आता त्यांच्या वारसदारांना हा बंगला सांभाळणे शक्य नाही.
दिग्दर्शक पीएल संतोषी यांच्या 'हम एक हैं' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणारे अभिनेते देव आनंद यांची गणना भूतकाळातील दिग्गज चित्रपट अभिनेत्यांमध्ये केली जाते. देव आनंद, दिलीप कुमार आणि राज कपूर हे त्रिकूट जगभर प्रसिद्ध झाले. देव आनंदने झीनत अमान, टीना मुनीम आणि जॅकी श्रॉफ सारख्या स्टार्सना हिंदी चित्रपटसृष्टीत प्रसिद्धी मिळवून दिली. 'गाइड' सारखा चित्रपट बनवला जो जगभर प्रसिद्ध झाला. त्यांचे चित्रपट हिट झाले आहेत. पण, या सर्व हिट चित्रपटांपेक्षा जास्त हिट ठरलेले एक नाव म्हणजे देव आनंद.