अन्नपूर्णी’ सिनेमा नेटफ्लिक्सनं हटवला, कारण...

शुक्रवार, 12 जानेवारी 2024 (16:16 IST)
नेटफ्लिक्स या ऑनलाईन स्ट्रीमिंग कंपनीने अभिनेत्री नयनतारा हिचा तमिळ सिनेमा ‘अन्नपूर्णी : द गॉडेस ऑफ फूड’ सिनेमा आपल्या प्लॅटफॉर्मवरून हटवला आहे. कथितरित्या हिंदूंच्या धर्मिक भावनांना दुखावल्यानं सिनेमावरून वाद सुरू झाला होता.
 
या सिनेमात अभिनेत्री नयनतारा हिने एका ब्राह्मण महिलेचं पात्र साकारलं आहे. हे पात्र शेफ बनू इच्छित असते. तसंच, हे पात्र तिच्या कुटुंबातील धार्मिक नियमांच्या विरूद्ध जात मांसाहार करताना दिसतं आणि मांस शिजवणं शिकतानाही दिसतं.
 
ब्राह्मण समाजातील एक मोठा गट मांसाहार सेवन करण्याच्या विरोधात असल्याचं म्हटलं जातं. मांसाहार हे धार्मिक नियमांच्या विरोधात असल्याचं हा गट मानतो.
 
 
काही कट्टरतावादी हिंदू संघटनांशी संबंधित लोकांनी ‘अन्नपूर्णी’ सिनेमाच्या दृश्यांवर आक्षेप घेतला. या सिनेमात नयनताराच्या पात्राला बिर्याणी बनवण्याआधी नमाज पठन करताना दाखवण्यात आलंय.
 
तसंच, या सिनेमातील एका दृश्यात असं दाखवण्यात आलंय की, एक मुस्लीम पात्र असं म्हणतो की, हिंदूंचे आराध्य दैवत राम मांस खात असत. या दृश्यालाही काही लोकांनी विरोध केलाय.
 
सिनेमाच्या निर्मात्यांनी अद्याप अधिकृतरित्या या प्रकरणावर काहीही भाष्य केलं नाहीय.
 
मध्य प्रदेशमध्ये अभिनेत्री नयनतारा आणि सिनेमाशी संबंधित इतर दोघांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आलीय.
 
गेल्या काही वर्षात कट्टरतावादी हिंदू गटांशी संबंधित लोक काही सिनेमांवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करताना दिसू लागले आहेत.
 
2021 साली अमेझॉन प्राईम शोची सीरीज ‘तांडव’च्या टीमलाही माफी मागावी लागली होती. हिंदू देव-देवतांची थट्टा केल्याचा आरोप त्यांच्यावर करम्यात आला होता.
 
‘अन्नपूर्णी : द गॉडेस ऑफ फूड’ सिनेमा एक डिसेंबर 2023 रोजी प्रदर्शित झाला. सिनेसमीक्षकांमधून मिश्र प्रतिक्रिया या सिनेमाबाबत आल्या.
 
सिनेमाला प्रदर्शनासाठी प्रमाणपत्र देणाऱ्या सेन्सॉर बोर्डाने मात्र ‘अन्नपूर्णी’ला प्रदर्शनाची परवानगी दिली होती.
 
 
अन्नपूर्णी’ सिनेमा 29 डिसेंबर 2023 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आणि त्याच दिवशी वादालाही सुरुवात झाली. गेल्या आठवड्यात मुंबईतील एका व्यक्तीनं सिनेमावर आक्षेप घेत, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, मुंबई पोलिसांनी त्या तक्रारीवरून कुठलीच एफआयआर नोंदवली नव्हती.
 
रॉयटर्स वृत्तसेवा संस्थेच्या माहितीनुसार, विश्व हिंदू परिषदेच्या काही समर्थकांनी मुंबईत नेटफ्लिक्सच्या ऑफिसबाहेर निदर्शनं केली.
 
गुरुवारी (11 जानेवारी 2024) विश्व हिंदू परिषदेच्या प्रवक्त्यांनी सिनेमे सहनिर्माते झी स्टुडिओची पॅरेंट कंपनी ‘झी एंटरटेन्मेंट इंटरप्रायझेस’कडून माफीनामा घेतला.
 
हिंदू आणि ब्राह्मणांच्या धार्मिक भावनांना दुखावण्याचा कुठलाच हेतू नव्हता, असं त्यांच्याकडून लिहून घेण्यात आलं.
 
 
Published By- Priya Dixit
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती