‘ब्रदर्स’चे नवे पोस्टर रिलीज

मंगळवार, 4 ऑगस्ट 2015 (12:40 IST)
‘हॉलिडे’, ‘बेबी’, ‘गब्बर इज बॅक’ या हिट सिनेमानंतर बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार ‘ब्रदर्स’ हा नवा सिनेमा घेऊन चाहत्यांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात अक्षय कुमार आणि सिद्धार्थ मल्होत्रा पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. ‘ब्रदर्स’च्या ट्रेलरनंतर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यू-टय़ूबवर आतापर्यंत 8 लाखांहून अधिक प्रेक्षकांनी अक्षयच्या ‘ब्रदर्स’चा ट्रेलर पाहिला आहे. अक्षय कुमारने ‘ब्रदर्स’चे आणखी पोस्टर्स रिलीज केले आहेत. या सिनेमात अक्षय कुमार आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे अतिशय रफ-टफ भूमिकेत आहेत. करण मल्होत्रा दिग्दर्शित ‘ब्रदर्स’ या सिनेमात अक्षय कुमारसह सिद्धार्थ मल्होत्रा, जॅकी श्रॉफ आणि जॅकलीन फर्नाडिस मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाच्या नावाप्रमाणेच हा सिनेमा दोन भावांवर आधारित आहे. अक्षय आणि सिद्धार्थ दोन्ही भाऊ बॉक्सर असून, दोघांवरही एकमेकांच्या विरोधात उभे ठाकण्याची वेळ येते. मात्र ही वेळ का आली, दोघांमध्ये बाजी कोण मारते, हे सिनेमा रिलीज झाल्यानंतरच समजणार आहे. हॉलिवूडच्या ‘वॉरियर्स’ या सिनेमाचा ऑफिशिअल हिंदी रिमेक म्हणजे ‘ब्रदर्स’ आहे. येत्या 14 ऑगस्ट रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

वेबदुनिया वर वाचा