सनीला 5 वर्षाची शिक्षा होणार?

शुक्रवार, 29 मे 2015 (14:25 IST)
पॉर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास केलेली बेबी डॉल सनी लिऑन बुधवारी ठाणे पोलीस आयुक्तालयात तिच्या वकिलांसह हजर राहिली. तिच्यावर दाखल झालेल्या एका गुन्ह्याअंतर्गत चौकशीसाठी सनी लिऑन पोलिसांसमोर हजर झाली.
 
वेबसाईटवर अश्लील व्हिडिओ अपलोड करुन समाजात अश्लिलता पसरवल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्या अंजली पालन यांनी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये केली होती. 
 
सनी लिऑन सुमारे दीड तास पोलीस आयुक्तालयात होती. सनीविरोधात भारतीय दंड विधान कलम 292, 292 अ आणि 34 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामध्ये सनी दोषी ठरली तर तिला पाच वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते.
 
सनी लिऑनने तिच्या ब्लॉगवर अलील व्हिडिओ आणि ङ्खोटो अपलोड केले आहेत, जे तरुण पिढीसाठी विषाप्रमाणे आहे, असं पालन यांनी तक्रारीत म्हटलं होतं. तक्रार दाखल झाल्यानंतर ठाणे पोलिसांच्या सायबर सेलने सनीला नोटीस बजावली आणि त्या नोटिसीचं उत्तर देण्यासाठी सनी बुधवारी ठाणे पोलीस आयुक्तालयात वकिलांसह पोहोचली.
 
ठाण्याच्या सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश सावंत यांनी सांगितलं की, सनी लिऑनविरोधात डोंबिवली पोलीस स्टेशनमध्ये आयटी अँक्टअंतर्गत गुन्ह्याची नोंद झाली आहे. त्याची नोटीस आम्ही सनीला पाठवली होती. सनीचा जबाब नोंदवला असून पुढील तपास सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं. 

वेबदुनिया वर वाचा