वेलकम टू कराचीच्या गाण्यावर येणार बंदी?

शुक्रवार, 22 मे 2015 (10:35 IST)
दिल्ली उच्च न्यायालयात एका स्वयंसेवी संस्थेमार्फत अशरद वारसी आणि जॅकी भगनानी यांच्या वेलकम टू कराची या चित्रपटातील बालगीतातून दारूचे प्रमोशन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करीत या गाण्यावर बंदी आणण्यात यावी, अशी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
 
या गाण्याचे बोल लल्ला लल्ला लोरी, दारू की कटोरी असे असून घराघरात लोकप्रिय असलेल्या बालगीताच्या चालीवर हे गीत बेतले असून यावर तातडीने बंदी आणावी, असे सिटिझन्स फॉर बेटर इंडिया या एनजीओने दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. हा चित्रपट पुढील आठवड्यात प्रदर्शित होणार आहे.
 
दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बादर दुरेझ अहमद आणि संजीव सचदेव यांच्यासमोर हा खटला चालणार असून या गाण्यात दारूचे समर्थन होत आहे का याची पडताळणी होणार आहे. या गाण्यामुळे समाजातील लहान आणि तरुण मुलांच्या मनावर चुकीचा परिणाम होणार असल्याची भीती या एनजीओने व्यक्त केली आहे. सेन्सॉर बोर्ड आणि चित्रपटाच्या निर्मात्याने हे गाणे काढून टाकावे असे एनजीओला वाटते आहे. टीव्ही 
 
जाहिरातीमध्ये दारूला स्थान नसताना या गाण्यात मात्र बिनधास्त दारू पिण्याविषयीचे बोल आहेत याच गोष्टीवर आक्षेप घेण्यात आला आहे.

वेबदुनिया वर वाचा