मराठी फिल्ममध्ये टिस्का चोप्रा

गुरूवार, 2 जुलै 2015 (10:55 IST)
सध्या मराठी चित्रपटांमध्ये होणार्‍या नवनव्या प्रयोगांमुळे, आणि त्यांना मिळणार्‍या आंतरराष्ट्रीय सन्मानांमुळे बॉलीवूड आता मराठीची दखल घेऊ लागलंय. बॉलीवूड दिग्दर्शक, निर्मात्यांना मराठी चित्रपट बनवावेसे आणि पाहावेसे वाटत आहेत. तर अभिनेता, अभिनेत्रींना मराठी चित्रपटांचा हिस्सा व्हावेसे वाटते आहे. ‘तारे जमीन पर’ फेम अभिनेत्री टिस्का चोप्रा आता आपल्याला गिरीश कुलकर्णी लिखित आणि उमेश कुलकर्णी दिग्दर्शित ‘हायवे’ या आगामी चित्रपटांत दिसणार आहे.
 
हा चित्रपट तिला कसा मिळाला याबद्दल ती सांगते, ‘उमेशच्या घरी एक संगीतसंध्या आयोजित केली होती. तिथे मी गेले होते. पण आम्ही त्या दिवशी काहीच बोललो नाही. मला वाटलं उमेश तर फारच वैचारिक दिग्दर्शक आहे, त्यामुळे त्याने माझ्यासारख्या अभिनेत्रीला पाहिलेही नसेल. आणि काही दिवसांनी मला जेव्हा कळले की त्याला मला भेटायचे आहे तेव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला. उमेशने त्याच्या घरी मला त्या दिवशी पाहिलं होतं आणि त्याला माझ्यासोबत फिल्मही करायची होती. नंतर जेव्हा उमेश माझ्या घरी फिल्मची स्क्रिप्ट घेऊन आला, तेव्हा तर ती जाडजूड स्क्रिप्ट मी पाहातच राहिले. एवढ्या मोठ्या चित्रपटात आपल्याला काम कारायचं? असा प्रश्न मनात निर्माण झाला असतानाच, उमेशने मला चित्रपटाचे कथानक ऐकवले. ते ऐकण्यात मी एवढी गुंग होऊन गेले की त्यात साडेचार तास कसे गेले मला कळलेच नाही. आणि उमेशची ‘हायवे’ची कथा मला एवढी आवडली की मी लगेच हो म्हणून टाकले. 
 
मला असं वाटतं, की ह्या चित्रपटाला भाषिक चित्रपटाच्या विभागात बंदिस्त न करता, ह्याला वर्ल्डसिनेमा म्हटलं पाहिजे. एखाद्या कुंभाराने मातीचा घडा हळूहळू आपल्या सृजनशील हातांनी घडवावा, तसाच उमेशही आपल्या फिल्मला आकार देतो. आणि हेच त्याचे वेगळेपण आहे, असे मला वाटते. तो कधी तुम्ही चित्रित केलेला सीन खूप सुंदर होता, आणि तुम्ही किती छान अभिनय करता, अशी स्तुतिसुमनं उधळत, उगाच अभिनेत्याला खूश करण्याच्या फंदात पडत नाही. तो तुम्ही दिलेल्या चांगल्या शॉटला अजून काही सुंदर बनवता येईल का, याच्या शक्यता पडताळू लागतो. फक्त चित्रीकरणातच नाही. संकलन करतानाही त्याची सर्जनशीलता काही वेगळं करण्याच्या तयारीत असते.

वेबदुनिया वर वाचा