बहुचर्चित ‘बाजीराव मस्तानी’ सोशल मीडियावर

सोमवार, 20 जुलै 2015 (09:17 IST)
माहिती-तंत्रज्ञान, संगणक आणि मोबाइलच्या सध्याच्या जमान्यात फेसबुक, ट्विटर आणि ब्लॉग यालाही विशेष महत्त्व आले आहे. बॉलिवूडमधील अनेक अभिनेते व अभिनेत्री आपला नवा चित्रपट, त्यातील भूमिका किंवा ‘लुक’ बाबतची माहिती, छायाचित्रे सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांसाठी प्रस्तारित करत असतात. संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित ‘बाजीराव मस्तानी’ या आगामी हिंदी चित्रपटाची चर्चा सध्या सुरू असून सोशल मीडयावरून ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातील पहिली छायाचित्रे फिरत आहेत. चित्रपटातील ‘बाजीराव’ अर्थात रणवीर सिंग, ‘मस्तानी’ (दीपिका पदुकोण) आणि ‘काशीबाई’ (प्रियंका चोप्रा) या कलाकारांची त्या भूमिकेतील छायाचित्रे प्रेक्षकांना पाहयला मिळाली आहेत.
 
मराठी इतिहासातील बाजीराव आणि मस्तानी यांची प्रेमकथा संजय लीला भन्साळी यांनी या चित्रपटातून मांडण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. चित्रपटाची झलक (ट्रेलर) आणि त्याचे पोस्टर नुकतेच एका कार्यक्रमात प्रदर्शित झाले. याबाबतची माहिती स्वत: प्रियंकाने ट्विटर या सोशल नेटवर्किग साइटवरून जाहीर केली आहे.

वेबदुनिया वर वाचा