दीपिकाने शेतकरी प्रश्नी पुढाकार घ्यावा

बुधवार, 14 ऑक्टोबर 2015 (10:56 IST)
अभिनेत्री दीपिका पदुकोणने दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना मानसिक आधार देण्यासाठी हातभार लावावा, अशी इच्छा खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. गेल्या काही वर्षात शेतकर्‍यांच्या वाढत्या आत्महत्यांच्या पाश्र्वभूमीवर फडणवीसांनी ही गरज व्यक्त केली आहे.

‘आम्हाला दीपिकाला एक मिशन द्यायचं आहे. हे मिशन शेतकर्‍यांशी संवाद साधण्याचं आहे’ अशी माहिती ‘लिव, लव्ह, लाफ’ या दीपिकाच्या फाउंडेशनच्या लाँचच्या वेळी दिली. ‘एखाद्या व्यक्तीशी बोलताना तुम्ही ताण-तणाव हे शब्द वारंवार ऐकता. जवळपास सगळेच जण त्याला सामोरे जात आहेत. प्रत्येकाचा त्याच्याशी दोन हात करण्याचा मार्ग वेगवेगळा असतो. काही जणांना ताणतणाव कसे हाताळावे याची माहिती नसते. बरेच जण त्याविषयी बोलणं टाळतात, भावना व्यक्त करताना कचरतात.’ असंही ते म्हणाले. ‘ज्येष्ठ नागरिकांना मन मोकळं करायला कोणी सोबती नसतो. त्यामुळे काही वेळा ते पोलीस कंट्रोल रुमला (100 क्रमांकावर) फोन करतात. आम्ही शेतकर्‍यांच्या आत्महत्येवर केलेल्या एका सर्वेक्षणात 40 टक्के शेतकरी तणावग्रस्त असल्याचं समोर आलं. त्यामुळे आर्थिक मदतीपेक्षा शेतकर्‍यांना त्यांचं महत्त्व, त्यांची आवश्यकता पटवून देण्याची गरज आहे.’ असं मुख्यमंर्त्यांनी सांगितलं.

मानसिक आरोग्य दिनाचं औचित्य साधून दीपिका पदुकोणने मानसिक आरोग्यासाठी एका स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. लिव्ह, लव्ह, लाफ फाउंडेशन असं दीपिकाच्या संस्थेचं नाव आहे. स्वत: डिप्रेशनची शिकार झालेल्या आणि त्यातून यशस्वीपणे बाहेर आलेल्या दीपिकाने 6 ऑगस्टला ट्विटवरून या फाउंडेशनची माहिती दिली होती.

वेबदुनिया वर वाचा