India Tourism : नवरात्रीचे पवित्र पर्व सुरु होत आहे. या नऊ दिवसांमध्ये देवीची आराधना केली जाते. तसेच अनेक भक्त आपल्या कुलस्वामिनीची मनोभावे आराधना करतात व घट स्थापित करतात. तर अनेक जण आपल्या कुलस्वामिनीच्या दर्शनासाठी जातात. भक्त या नऊ दिवसांमध्ये देवीच्या मंदिरांमध्ये जाऊन देवीआईचे आशीर्वाद घेतात. तसेच आज आपण अश्याच एक देवीच्या जागृत मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत. गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यातील निझर तालुक्यात असलेले छोटेसे गाव देवाळ. या देवाळ गावात मनोरम देवीचे अतिशय सुरेख असे मंदिर आहे. नवसाला पावणारी देवी असे देवीचे जागृत मंदिर प्रसिद्ध आहे. हिरव्यागार डोंगरांमध्ये स्थापित हे मंदिर खूप सुंदर आणि आकर्षक आहे.
श्री मनोरमा देवी मंदिर-
गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यातील निझर तालुकामधील देवाळ गावात वसलेले मनोरमा माता मंदिर हे एक प्रमुख धार्मिक स्थळ आहे. अनेक कुटुंबांची कुलस्वामिनी असलेली मनोरमा देवी ही शक्तीची देवता असून आरोग्य, संरक्षण आणि कुटुंब सुखासाठी देवीची पूजा केली जाते. तसेच हे मंदिर आदिवासी समाजासाठी विशेष महत्वाचे असून, निसर्गरम्य भागात वसलेले आहे. मंदिराच्या जवळचा परिसर हिरवा आणि शांत आहे. तसेच देवीचे मंदिर नंदुरबार सीमेजवळ असल्याने महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील भाविकांसाठी सोयीचे आहे.
श्री मनोरमा देवी मंदिर महत्व-
हे मंदिर प्राचीन असून, आदिवासी परंपरेशी जोडलेले आहे. स्थानिक कथा प्रमाणे, मनोरमा देवीने या भागातील लोकांना संकटातून वाचवले, त्यामुळे ते जागृत देवस्थान मानले जाते. मंदिराची स्थापना शतकांपूर्वी झाली असावीअसे सांगण्यात येते. मनोरमा देवीची प्रतिमा ही शिळा रूपातीलअसून, तिची पूजा मनःशांती आणि समृद्धीसाठी केली जाते. तसेच नवरात्रोत्सवात येथे मोठा मेळा भरतो. आदिवासी समाजासाठी हे कुलदेवता स्थान आहे. येथे येणारे भाविक निसर्ग, अध्यात्म आणि सांस्कृतिक अनुभव घेतात.
मंदिराची वैशिष्ट्ये-
मंदिर साधे पण सुंदर आहे. पूर्वी हे मंदिर प्राचीन होते आता या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून सुंदर असे बांधकाम करण्यात आले आहे. देवीची मूर्ती आकर्षक असून, आसपास तापी नदी, जंगल आणि डोंगररांगा आहे. मंदिर परिसरात छोटीशी बाग असून महादेवाचे शिवलिंग स्थापित आहे. नवसाला पावणारी मनोरम देवी आपल्या भक्तांच्या पाठीशी नेहमी उभी असते.
श्री मनोरमा देवी मंदिर देवाळ गुजरात जावे कसे?
रस्ता मार्ग-श्री मनोरमा देवी मंदिर देवाळ हे गाव निझर शहरापासून १५ किमी अंतर आहे. निझर आणि देवाळ रोडवरून MSRTC किंवा GSRTC बस व खासगी वाहनाने काही मिनिटांत मंदिरापर्यंत पोहोचता येते.