केनिया : वनसंपदेने नटलेला देश

बुधवार, 8 जानेवारी 2020 (11:23 IST)
केनिया हा आफ्रिका खंडातला देश आहे. नैरोबी ही केनियाची राजधानी. केनियामध्ये 60 पेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात. इथले लोक एकापेक्षा जास्त आफ्रिकन भाषा बोलतात. केनियामध्ये शालेय शिक्षण मोफत दिलं जातं. इथली बरीच मुलं घरातल्या तसंच शेतीच्या कामांमध्ये मदत करत असल्याने शाळेत जात नाहीत. संगीत, गोष्टी सांगणं इथल्या संस्कृतीत महत्त्वाचं मानलं जातं. इथे राहणार्‍या विविध समाजांनी गाणी, गोष्टी आणि कवितांमधून संस्कृती पुढे नेली.

हा देश हिंदी महासागर आणि व्हिक्टोरिया तलावाच्या मध्ये असल्यामुळे व्यापारउद्योगासाठी सतत माणसांची ये-जा असायची. जगभरातून तसंच मध्य-पूर्वेतून लोक येत असत. यामुळे केनियामध्ये सांस्कृतिक वैविध्य पाहायला मिळतं. विविध जातीधर्माचे, वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक इथे राहतात. माणसाचा उगम सर्वात आधीउत्तर केनिया आणि टांझानियामध्ये झाल्याचं शास्त्रज्ञांचं मत आहे. इसवी सन 1600 आणि 1700 या काळात अरब, अमेरिकन आणि युरोपियन लोक केनियातल्या लोकांना गुलाम बनवून आपल्या देशात नेत असत. केनियामध्ये भरपूर निसर्गसौंदर्य आहे. जंगलं आणि प्राणी पाहण्यासाठी लोक इथे भेट देतात. हत्ती, सिंह, चित्ता, झेब्रा, जिराफ, गेंडा यासारखे प्राणी केनियातल्या जंगलांमध्ये पाहायला मिळतात. प्राण्यांच्या संरक्षणासाठी केनियामध्ये 50 पेक्षा जास्त अभयारण्यं आणि राष्ट्रीय उद्यानं आहेत. आफ्रिकेतलं वन्यजीवन पाहण्यासाठी अनेक परदेशी पर्यटक केनियाला येतात.

जगात कुठेही न आढळणारे प्राणी इथे पाहायला मिळतात. 1920 ते 1963 या काळात केनियावर ब्रिटिशांचं राज्य होतं. स्वातंत्र्यानंतर आता तिथे लोकशाही आहे. केनियन शिलिंग हे इथलं चलन आहे. स्वाहिली आणि इंग्रजी या इथल्या प्रमुख भाषा आहेत.
 
आरती देशपांडे

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती