सुजलाम सुफलाम बांगलादेश

सोमवार, 7 जानेवारी 2019 (15:45 IST)
बांगलादेश हा भारताचा शेजारी देश आहे. या रुपाने पूर्वी पाकिस्तानचा भाग असणार्‍या बंगाली भाषिक प्रांताला 1971 मध्ये स्वतःची ओळख मिळाली. हा दक्षिण आशियातला देश आहे. आकाराने खूप लहान असणार्‍या या देशाच्या सीमा भारत आणि म्यानमारला लागून आहेत. ढाका ही बांगलादेशची राजधानी. ढाक्याला मशिदींचं शहर असंही म्हटलं जातं. इस्लाम हा बांगलादेशातला प्रमुख धर्म आहे तर बंगाली ही इथली अधिकृत भाषा आहे. हा जगातला आठव्या क्रमांकाचा तरआशिया खंडातला पाचव्या क्रमांकाचा सर्वात जास्त लोकसंख्येचा देश आहे. इथल्या चलनाला टाका असं म्हटलं जातं. रॉयल बंगाल टायगर हा बांगलादेशचा राष्ट्रीय प्राणी आहे तर मॅगपाय रॉबिन हा राष्ट्रीय पक्षी आहे. फणस हे बांगलादेशचं राष्ट्रीय फळ आहे. 
 
या देशाची भूमी सुजलाम सुफलाम आहे. देशात अनेक नद्या आहेत. या नद्या बंगालच्या उपसागराला मिळतात. बंगालचा उपसागर हा जगातला सर्वात मोठा उपसागर आहे. बांगलादेशात सतत पूर येत असतात. त्यावेळी वाहून येणार्‍या गाळामुळे इथली जमीन सुपीक बनली आहे. इथले बरेच लोक शेती करतात. जगातल्या तिवरांच्या सर्वात 
मोठ्या जंगलांपैकी एक जंगल बांगलादेशात आहे. भात हे इथल्या लोकांचं प्रमुख अन्न आहे. शेती हा इथला प्रमुख व्यवसाय असला तरी कपड्यांची तसंच ज्यूटची निर्यातही मोठ्या प्रमाणावर होते. कापड उद्योग हा इथल्या प्रमुख व्यवसायांपैकी एक आहे. बांगलादेशात क्रिकेट खूप लोकप्रिय आहे. कबी हा राष्ट्रीय खेळ आहे. या देशात दोन 
हजारपेक्षा जास्त मासिकं आणि वर्तमानपत्रं छापली जातात. गंगा, ब्रह्मपुत्रा आणि मेघना या इथल्या प्रमुख नद्या आहेत.
 
आरती देशपांडे

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती