जगातील सर्वाधिक उंचीवरचे किब्बर गाव

शनिवार, 3 सप्टेंबर 2016 (12:28 IST)
समुद्रसपाटीपासून तब्बल 4850 मीटर म्हणजे साधारण 14 हजार फुटांवर वसलेले हिमाचल प्रदेशातील किब्बर हे जगातील सर्वाधिक उंचीवर वसलेले गाव आहे. हिमाचलच्या स्पिती खोर्‍यात वसलेले किब्बर राजधानी सिमलापासून 430 किमी दूर आहे व येथे जाण्यासाठी खडतर मार्गाचा प्रवास करावा लागतो. स्पितीपासून 12 तासांचा हा खडतर प्रवास सार्थकी लागेल असे निसर्गसौंदर्य या गावाला निसर्गाने बहाल केले आहे. याच गावात जगातील सर्वात उंचावर असलेला बौद्ध मठही आहे.
 
स्पिती नदीच्या उजव्या तीरावर लेसर हे पहिले गाव लागते. स्पिती खोर्‍यातले हे पहिले गाव. तेथून किब्बर 20 किमीवर आहे. चहूकडे बर्फाची चादर व मधून जाणारा रस्ता पाहताक्षणीच मोहात पाडतो. येथे सुमोसारख्या गाडय़ांतून जाता येते. एकदा का या गावात पाऊल टाकले की आयुष्यभर पुरेल इतका ताजेपणा आणि डोळ्यांचे पारणे फिटेल असे निसर्गसौंदर्य लाभतेच लाभते. त्यामुळे या गावाचा विसर पडणे अवघडच. 2011 च्या जनगणनेनुसार येथे 77 कुटुंबे आहेत व नागरिकांची संख्या आहे 366. येथे पाऊस फारसा पडत नाही मात्र हिमवर्षाव खूप होतो. त्यामुळे येथे बर्फाचे थरच्या थर हे नेहमीचे दृष्य आहे. येथील नागरिक शेती करतात व अन्य शेतीपूरक व्यवसाय करतात. येथून ट्रेकचेही अनेक मार्ग जातात व मोठय़ा प्रमाणावर ट्रेकर्स तसेच पर्यटक येथे आवर्जून भेट देतात.
 

वेबदुनिया वर वाचा