वर्ल्ड कप 2019: इंग्लंड फायनलमध्ये; ऑस्ट्रेलियावर सनसनाटी विजय
शुक्रवार, 12 जुलै 2019 (10:28 IST)
बेधडक आणि आक्रमक क्रिकेट खेळणाऱ्या इंग्लंडने पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाला 8 विकेट्सने चीतपट करत वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत धडक मारली.
14 जुलैला लॉर्ड्स इथं होणाऱ्या अंतिम लढतीत इंग्लंडचा सामना न्यूझीलंडशी होईल. या दोन्ही संघांनी एकदाही वर्ल्ड कपवर नाव कोरलेलं नाही. यानिमित्ताने वर्ल्ड कपला नवा विजेता मिळणार हे स्पष्ट झालं आहे.
ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत वर्ल्ड कप सेमी फायनल गमावली नव्हती. मात्र इंग्लंडने सर्वसमावेशक खेळाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचं संस्थान खालसा केलं.
जगाला क्रिकेटची देणगी देणाऱ्या इंग्लंडने 1979, 1987 आणि 1992 मध्ये वर्ल्ड कपची अंतिम फेरी गाठली होती. मात्र जेतेपदाने त्यांनी हुलकावणी दिली होती.
ऑस्ट्रेलियाने पाचवेळा वर्ल्ड कप पटकावला आहे. यंदाही सेमी फायनलपर्यंत धडक मारत त्यांनी इरादे स्पष्ट केले होते. मात्र इंग्लंडच्या धडाकेबाज खेळासमोर ऑस्ट्रेलिया निरुत्तर ठरलं.
माफक मात्र आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो जोडीने सावध सुरुवात केली. खेळपट्टीवर स्थिरावण्यासाठी त्यांनी वेळ घेतला. मात्र त्यानंतर त्यांनी प्रत्येक ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा समाचार घेतला.
जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांनी 124 धावांची भागीदारी केली. बेअरस्टो 34 धावांवर बाद झाला. बेअरस्टो बाद झाल्यावर रॉयने जोरदार आक्रमण करत ऑस्ट्रेलियाचं स्वप्न धुळीस मिळवलं.
शतकाच्या दिशेने वाटचाल करणारा जेसन रॉय 85 धावांवर बाद झाला. रिप्लेमध्ये रॉय याच्या बॅटला चेंडूचा स्पर्श झाल्याचं स्पष्ट झालं मात्र इंग्लंडकडे रिव्ह्यू शिल्लक नव्हता. रॉयने 9 चौकार आणि 5 षटकारांसह 85 धावांची दिमाखदार खेळी केली.
रॉय बाद झाल्यानंतर जो रूट आणि इऑन मॉर्गन यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली. रूटने ४९ तर मॉर्गनने ४५ धावांची खेळी केली.
बर्मिंगहॅम इथे झालेल्या महत्वपूर्ण लढतीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. दुसऱ्याच ओव्हरमध्ये ख्रिस वोक्सच्या टप्पा पडून स्विंग झालेल्या बॉलवर फिंच एलबीडब्ल्यू झाला. त्याला भोपळाही फोडता आला नाही.
तिसऱ्या ओव्हरमध्ये वोक्सच्या टप्पा पडून उसळी घेतलेल्या चेंडूवर वॉर्नर यष्टीपाठी झेल देऊन बाद झाला. त्याने 9 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाला वॉर्नर-फिंच जोडीकडून खूप अपेक्षा होत्या. उस्मान ख्वाजा दुखापतग्रस्त झाल्याने संधी मिळालेला पीटर हँड्सकॉम्ब वोक्सच्याच गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याने 4 धावा केल्या.
जोफ्रा आर्चरचा भेदक उसळता चेंडू अलेक्स कॅरेच्या हेल्मेटवर जाऊन आदळला. हेल्मेट डोक्यावरून बाहेर पडलं आणि कॅरेच्या हनुवटीला जखम होऊन रक्त आलं.
कॅरेने हुशारीने हेल्मेट स्टंप्सवर जाण्याचं टाळलं. ऑस्ट्रेलियाच्या फिजिओने कॅरेच्या दुखापतीवर उपचार केले.
स्टीव्हन स्मिथ आणि कॅरे जोडीने चौथ्या विकेटसाठी 103 धावांची भागीदारी केली. खेळपट्टीवर स्थिरावलाय असं वाटत असतानाच कॅरे आदिल रशीदच्या गोलंदाजीवर बाद झाला. कॅरेने 46 धावा केल्या.
रशीदचा गुगली मार्कस स्टोनिअसला कळला नाही आणि तो भोपळाही न फोडता बाद झाला.
स्टीव्हन स्मिथने ग्लेन मॅक्सवेलला साथीशी घेत सहाव्या विकेटसाठी 39 धावांची भागीदारी केली. जोफ्रा आर्चरच्या टप्पा पडून थांबून आलेल्या उसळत्या चेंडूवर मॅक्सवेल फसला. त्याने 22 धावा केल्या.
आदिल रशीदने पॅट कमिन्सचा अडथळा दूर केला. त्याने 6 धावा केल्या.
स्मिथने संघर्ष सुरू ठेवत मिचेल स्टार्कच्या साथीने आठव्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी केली. जोस बटलरच्या अफलातून थ्रोच्या बळावर स्टीव्हन स्मिथ रनआऊट झाला. त्याने 6 चौकारांसह 85 धावांची खेळी केली.
ख्रिस वोक्सने स्टार्कचा प्रतिकार संपुष्टात आणला. त्याने 29 धावा केल्या. मार्क वूडने जेसन बेहनड्रॉफला त्रिफळाचीत केलं. ऑस्ट्रेलियाचा डाव 223 धावांतच संपुष्टात आला.