राजमाता विजयाराजे आणि माधवराव शिंदे यांच्यात का आला होता दुरावा?

शनिवार, 19 जून 2021 (18:02 IST)
रेहान फजल
भारतीय लोकशाहीमधील घराणेशाहीबद्दल बोलायचं झाल्यास नेहरू-गांधी घराण्यानंतर मुलायम, लालू, पायलट, करुणानिधी आणि काश्मीरमध्ये अब्दुल्ला अशी अनेक घराणी भारतीय राजकारणाचा भाग बनली आहेत.
 
यापैकीच आणखी एक ग्वाल्हेरचं शिंदे घराणं.1957पासून आतापर्यंत या कुटुंबातील एक तरी सदस्य हा कायम संसदेचा अथवा विधानसभेचा सदस्य असतो. याउलट 1991 ते 1996 दरम्यानचा पाच वर्षांचा काळ असा होता, जेव्हा नेहरूंच्या कुटुंबातील किंवा वंशातील कुणीही संसदेचं सदस्य नव्हतं.
 
माधवराव यांच्या आई आणि ग्वाल्हेर घराण्याच्या राजमाता विजयाराजे शिंदे यांनी काँग्रेसमधून राजकीय कारकीर्द सुरू केली. पण, त्यानंतर त्यांनी स्वतंत्र पार्टीमध्ये प्रवेश केला, त्यानंतर त्या भारतीय जनता पार्टीच्या संस्थापक सदस्यांपैकी एक बनल्या.
त्यांचा मुलगा माधवराव शिंदे यांनी 1971 मध्ये जनसंघाच्या पाठिंब्यावर निवडणूक जिंकली. पण 1979 पर्यंत ते काँग्रेसवासी झाले होते.

तणावापूर्वी होतं दृढ नातं
प्रसिद्ध राजकीय विश्लेषक रशीद किडवई यांचं एक पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. 'द हाऊस ऑफ सिंधियाज-अ सागा ऑफ पॉवर, पॉलिटिक्स अँड इन्ट्रीग' नावाच्या या पुस्तकात त्यांनी शिंदे कुटुंबातील सदस्य आणि त्यांच्या संबंधांवर लिखाण केलं आहे.
 
"एक काळ असा होता जेव्हा राजमाता आणि त्यांचा मुलगा माधवराव शिंदे यांच्यात एवढं दृढ नातं होतं की, माधवराव त्यांच्या मैत्रिणींबाबतही आईबरोबर चर्चा करायचे," असं रशीद यांनी म्हटलं आहे.
 
"भय्या (माधवराव शिंदे) आणि मी मित्रांसारखेच होतो. एका रात्री ते हॉटेलमध्ये माझ्या रूममध्ये आले आणि खाली अंथरलेल्या गालिचावर पडले. त्यांना एकटेपणा वाटत होता. आम्ही रात्री दोन वाजेपर्यंत गप्पा मारल्या. ते माझ्याशी एवढं मनमोकळेपणानं बोलायचे की, त्यांच्या मैत्रिणींबाबतही माझ्याकडं उल्लेख करायचे," असं महाराणी विजयाराजे शिंदे यांनी त्यांच्या 'प्रिंसेस' या आत्मचरित्रात लिहिलं आहे.
 
आईची साथ सोडल्याचा आरोप
पण मग, नेमकं असं काय झालं की आई आणि मुलाच्या नात्यामध्ये एवढी कटुता आली आणि ते एकमेकांपासून दुरावले गेले.
 
प्रसिद्ध पत्रकार एनके सिंह यांनी इंडिया टुडेच्या 30 सप्टेंबर 1991 च्या अंकामध्ये एक लेख लिहिला होता. 'डोमेस्टिक बॅटल बिटवीन विजयाराजे अँड माधवराव शिंदे' या लेखात त्यांनी लिहिलं की, "माधवराव शिंदे आणि राजमाता यांच्यातील संबंधांमध्ये दुरावा येण्याची सुरुवात 1972 मध्ये झाल्याचं, माधवरावांनी मला सांगितलं होतं. त्यावेळी माधवराव शिंदे यांना आईचा जनसंघ हा पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करायचा होता. ऑक्सफर्डहून परतल्यानंतर जनसंघाचं सदस्यत्व घेणं ही त्यांची मोठी चूक होती, असं माधवरावांनी मान्य केलं होतं."
त्याच लेखात एनके सिंह यांनी पुढं असंही लिहिलं आहे की, "सरदार आंग्रे यांचं मत मात्र वेगळं होतं. राजमाता त्यांना 'बाळ' तर इतर लोक 'बाल्डी' म्हणायचे. त्यांच्या मते, 1972 च्या विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेशमध्ये जनसंघाचा पराभव झाला होता, त्यामुळं माधवरावांनी घाबरून आईची साथ सोडली होती."
 
माधवरावांना आवडत नव्हता सरदार आंग्रेंचा प्रभाव
माधवराव शिंदे यांना राजमातांवर सरदार आँग्रे यांचा असलेला प्रभाव आवडत नव्हता. शिंदे कुटुंबाची संपत्ती कोणताही विचार न करता बेफिकीरपणे राजकारणात खर्च केली जात होती, त्यालाही माधवरावांचा आक्षेप होता.
 
"माधवराव यांच्या जवळच्या मित्रांच्या मते, जयविलास पॅलेसमधून संपत्ती आणि दागिने गायब होत चालले होते. त्याचा तरुण महाराजांना (माधवराव) मोठा धक्का बसला. शिंदे राजपरिवाराकडं सोनं चांदी आणि दागिन्यांनी भरलेल्या विहिरी होत्या, असं म्हटलं जायचं. पण हा खजिना हळुहळू रिता होत असल्याचं पाहून माधवरावांना आश्चर्य वाटत होतं," असं रशीद किडवई यांनी लिहिलं आहे.
माधवराव यांच्या मते त्यांच्या आईकडं व्यावहारिक दृष्टीकोन अगदी नसल्यासारखाच होता. राजमाता यांनी मुंबई आणि इतर ठिकाणच्या शिंदे कुटुंबाच्या मालमत्ता बाजारभावापेक्षा अत्यंत कमी, कवडीमोल भावात विकल्या होत्या, असं त्यांना वाटत होतं.
 
"असाही दावा करण्यात आला होता की, या व्यवहारांमागे आंग्रे यांचा हात होता, आणि यातून त्यांना कमिशन मिळत होतं. राजमातादेखील या मालमत्तांच्या विक्रीमधून मिळालेल्या पैशापैकी काही पैसे आंग्रे यांना सेवांच्या मोबदल्यात देत होत्या. पण आंग्रे हे हळूहळू विजयाराजे आणि त्यांच्या मुलाच्या संबंधांमध्ये कटुता वाढवत गेले," असं माधवराव शिंदे यांच्या चरित्रात वीर सांघवी आणि नमिता भंडारे यांनी लिहिलं आहे.
 
राजमातांचा माधवीराजेंवर आरोप
माधवराव शिंदे यांनी इंडिया टुडेचे प्रतिनिधी एनके सिंह यांच्याशी बोलताना, त्यांची आई ही अधिकार गाजवणारी महिला होती, असं वर्णन केलं होतं.
 
"माधवरावांनी मला सांगितलं होतं की, राजमाता त्यांना पक्षात राहण्यासाठी इमोशनल ब्लॅकमेल करत होत्या. त्यांच्यावर सरदार आंग्रे यांचा विचित्र प्रभाव होता. एकदा तर त्या असंही म्हणाल्या होत्या की, मला हत्तीच्या पायाखाली द्यायला हवं होतं. आता त्या वेगळ्या राहत असल्यामुळं, कुटुंबात खूप शांतता आहे," असं एनके सिंह यांनी त्यांच्या लेखात लिहिलं आहे.
 
दरम्यान, राजमाता यांनी एनके सिंह यांच्याशी बोलताना, आई आणि मुलाच्या नात्यात आलेल्या या दुराव्यासाठी माधवराव शिंदे यांच्या पत्नी माधवीराजे यांना जबाबदार ठरवलं होतं.
"राजमातांनी मला सांगितलं होतं की, एक काळ असा होता जेव्हा माधवराव यांना सर्वांसमोर माझी चपला उचलायलाही संकोच वाटत नव्हता. पण त्यांच्या पत्नीला आमच्यात असलेलं एवढं जवळचं नातं सहन होत नव्हतं," असं सिंह यांनी लिहिलं आहे.
 
"मी राजमातांबरोबर बोलत होतो त्यावेळी सरदार आंग्रेदेखील त्याठिकाणी उपस्थित होते. त्यांनी मध्ये बोलताना म्हटलं की, राजमाता या एका आईप्रमाणं सर्व दोष सुनेवर टाकत आहेत. पण राजमातांना माधवरावांची सर्वाधिक खटकलेली बाब म्हणजे, आणीबाणीच्या काळात जेव्हा त्या तुरुंगात होत्या, त्यावेळी माधवराव नेपाळला पळून गेले होते. त्याचा त्यांना प्रचंड धक्का बसला होता," असं सिंह यांनी सांगितलं.
 
राजमातांनी आंग्रेंना निवडलं
माधवराव शिंदे यांच्या तीव्र विरोधानंतरही राजमातांनी सरदार आंग्रे यांना कधीही स्वतःपासून दूर केलं नाही.
 
"माझ्या पतीचे जवळचे नातेवाईक आणि मित्र म्हणून बाळ आंग्रे यांनी माझ्या कुटुंबालाच सर्वस्व मानलं होतं. त्यांची आणि माझी राजकीय विचारसरणी एकसारखी होती आणि हिंदू धर्माप्रती आमच्या दोघांच्या भावनादेखील सारख्याच होत्या. आमचं हित हे त्यांच्यासाठी एवढं महत्त्वाचं होतं की, ते आमचे आर्थिक सल्लागार बनले होते. त्यांच्या निष्ठा आणि प्रामाणिकपणावर मला कधीच संशय नव्हता. त्यांच्या सल्ल्ल्याशिवाय आमच्या कुटुंबामध्ये कोणताही निर्णय घेतला जात नाही," असं राजमातांनी आत्मचरित्रात लिहिलं आहे.
दुसरीकडं, "माधवराव यांनी आईला सांगितलं होतं की- अम्मा, हे असं चालणार नाही. तुम्हाला माझ्या आणि आंग्रे यांच्यापैकी एकाला निवडावं लागेल. त्यावर राजमातांनी अगदी सहजपणे आणि थेट सांगितलं होतं की, त्या आंग्रेंना सोडू शकत नाही,'' वीर सांघवी यांनी माधवरावांच्या आत्मचरित्रात हा उल्लेख केला आहे.
 
''त्यांनी कठीण काळामध्ये माझी साथ दिली आहे, असं राजमाता म्हणाल्या. त्यावर, तुमचा एकुलता एक मुलगा दूर गेला तरी तुम्ही आंग्रेंना सोडणार नाही का, असा सवाल माधवरांनी केला. पण राजमातांनी काहीही उत्तर दिलं नाही. त्यामुळं माधवराव नाराज झाले आणि तिथून निघून गेले होते."
 
शिवलिंगासाठी राजमातांचे उपोषण
माधवराव आणि राजमाता यांच्यात पन्ना रत्नापासून तयार करण्यात आलेल्या एका छोट्याशा शिवलिंगावरूनही वाद झाले.
 
"ते शिंदे कुटुंबाचं वारसाहक्कानं मिळालेलं शिवलिंग होतं. प्रत्येक महाराज त्याची पुजा करायचे. ग्वाल्हेरचं सैन्य जेव्हा एखाद्या मोहिमेवर निघायचं तेव्हा, महादजी शिंदे (शिंदे राजघराण्याची स्थापना करणारे रानोजी राव शिंदे यांचे पाचवे आणि सर्वात लहान पुत्र - महादजी शिंदे) हे नेहमी ते शिवलिंग त्यांच्या मुकुटामध्ये ठेवायचे, आणि त्यामुळं त्यांना विजय मिळायचा, असं म्हटलं जातं," असं रशीद किडवई सांगतात.
"त्या शिवलिंगाच्या किंमतीचा तर काही हिशोब किंवा तो विषयही नव्हता पण, शिंदे कुटुंबासाठी ते चांगल्या भाग्याचं लक्षण मानलं जात होतं. राजमाता आणि माधवराव यांच्या नात्यात दुरावा आल्यानंतर राजमातांनी ते शिवलिंग परत मागितलं. त्यावर माधवरावांच्या पत्नी माधवी यांनी, शिंदे कुटुंबामध्ये विवाहित स्त्रीनं केलेली पुजा हीच विधिवत आणि शुभ मानली जाते, असं म्हटलं. राजमातांना याचं अत्यंत वाईट वाटलं. राजमातांनी जाहीर केलं की, जोपर्यंत त्यांना शिवलिंग मिळणार नाही, तोपर्यंत त्या आमरण उपोषण करतील. अखेर कंटाळून माधवरावांनी पत्नीला ते शिवलिंग राजमाता यांना देण्यास सांगितलं."
 
सार्वजनिक ठिकाणी शिष्टाचारांचं पालन
एवढ्या वादांनंतरही वैयक्तिक संबंधांमध्ये विशेषतः सार्वजनिक ठिकाणी या तणावाची किनार कधी दिसली नाही. महाराजा आणि राजमाता एकत्रितपणे औपचारिक सोहळ्यांमध्ये सहभागी व्हायचे, त्यावेळी पूर्णपणे राज शिष्टाचाराचं पालन केलं जात होतं.
"माधवराव यांचे वैयक्तिक सचिव महेंद्र प्रताप सिंह यांनी त्यांच्याबरोबरच राहणं पसंत केलं. पण राजमातांना महेंद्र प्रताप सिंहांचं काम आवडतं हे माधवरावांना माहिती होतं. बाहेर दौरे असताना त्यांच्यासारखी काळजीपूर्वक व्यवस्था कोणी पाहत, नाही असं राजामातांना वाटत होतं. त्यामुळं राजमाता बाहेर दौऱ्यावर जाताना माधवराव त्यांना राजमातांबरोबर जाण्याची परवानगी देत होते,'' असं सांघवी आणि भंडारे यांनी लिहिलं आहे.
"पण, एकदा अमृतसरच्या दौऱ्यावर असताना बाळ आंग्रे यांनी महेंद्र प्रताप सिंह यांच्या समोरच माधवरावांसाठी अपशब्द वापरले. त्यानंतर महेंद्र प्रताप परत ग्वाल्हेरला परतल्यानंतर त्यांनी महाराजांना स्पष्ट सांगितलं की, ते आता पुन्हा कधीही राजमातांबरोबर बाहेर जाणार नाहीत."
कुत्र्यावर झाडली गोळी
मुलाबरोबर सुरू असलेल्या वादामुळं राजमाता बाळ आंग्रे यांच्यावर अधिक विसंबून राहू लागल्या. आणीबाणीच्या काळात जेव्हा माधवराव नेपाळमध्ये आणि राजमाता तुरुंगात होत्या त्यावेळी आँग्रे यांचं कुटुंब ग्वाल्हेरमधील जयविलास पॅलेसजवळील हिरणवन पॅलेसमध्ये येऊन राहू लागलं.
"आंग्रे यांच्या पत्नी मनू यांनी जयविलास महालातील सोन्याचा मुलाला दिलेल्या ढाली, झुंबरं आणि गालिचे काढून आणले आणि त्यांच्या घरात लावले, असे आरोप केले जातात. नंतर जेव्हा काँग्रेसची सत्ता आली, त्यावेळी माधवराव शिंदे यांनी या वस्तू परत मिळवण्याचा प्रयत्न केला. कुटुंबाशी संबंधित एका सुत्रानं सांगितलं की, जेव्हा माधवराव शिंदे यांचे लोक या वस्तू घेण्यासाठी हिरणवन पॅलेमध्ये गेले त्यावेळी आंग्रेच्या लोकांनी त्यांच्या अंगावर रॉटवेलर कुत्री सोडली होती. त्यापैकी एका कुत्र्यावर माधवराव यांच्या कर्मचाऱ्यांनी गोळीही झाडली होती," असं रशीद सांगतात.
रायबरेलीत राजमातांचा इंदिरा गांधींकडून पराभव
माधवराव शिंदे यांचं काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचं मुख्य कारण, राजमाता आणि आंग्रे यांच्यात असलेली जवळीक हे होतं. पण तसं असलं तरी रणनिती म्हणून त्यांनी 1980 ची निवडणूक ग्वाल्हेरमधून अपक्ष म्हणून लढवली.
तर, राजमातांनी इंदिरा गांधींच्या विरोधात रायबरेलीमधून नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. स्वतःची स्वतंत्र राजकीय ओळख आणि मुलाबरोबरच्या सबंधांमधील तणावानंतरही त्यांनी ग्वाल्हेरच्या नागरिकांना 'महालाची' निवड करण्याची विनंती केली.
 
माधवराव शिंदे यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या विरोधात ग्वाल्हेरमधून मोठा विजय मिळवला, मात्र राजमाता विजयाराजे यांचा रायबरेलीमध्ये इंदिरा गांधीकडून पराभव झाला.
 
ग्वाल्हेरमध्ये वाजपेयींचा पराभव
1984 च्या निवडणुकीत माधवराव शिंदे यांनी आधी गुनामधून उमेदवारी अर्ज दाखल केला. पण 25 नोव्हेंबर, 1984 रोजी उमेदवारी दाखल करण्याची वेळ संपण्याच्या दीड तासापूर्वी त्यांनी अचानक ग्वाल्हेरमधून उमेदवारी अर्ज दाखल केला.
ग्वाल्हेरमधून अटल बिहारी वाजपेयी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते. वेळ एवढा कमी होता की, वाजपेयींना दुसरीकडून कुठूनही उमेदवारी अर्ज भरणं शक्य नव्हतं.
 
राजमातांना ही बातमी समजताच त्यांना धक्का बसला.
 
या घटनेबाबात आंग्रे यांची पहिली प्रतिक्रिया अशी होती की, "माधवराव ग्वाल्हेरमधून पराभूत होतील. त्यांना असा फटका बसेल की, हा धडा ते आयुष्यभर विसरू शकणार नाहीत."
या निवडणुकीत माधवराव शिंदे यांनी अटल बिहारी वाजपेयी यांना पराभूत केलं. राजमातांना याचं प्रचंड वाईट वाटलं आणि त्यांना हा स्वतःचा अपमान वाटला.
पण राजमातांच्या निधनापूर्वी माधवराव आणि त्यांच्या आईमधला दुरावा काहीसा कमी झाला होता.
 
वीर सांघवी आणि नमिता भंडारे लिखित माधवराव शिंदे यांच्या आत्मचरित्रानुसार, "राजमातांच्या अंतिम दिवसांमध्ये माधवराव नेहमी रुग्णालयात जात होते. ते हात पकडून आईच्या शेजारी बसायचे आणि हनुमान चालिसा पठन करायचे. वसुंधरा राजे यांनी म्हटलं होतं की, माधवरावांचा आवाज ऐकताच राजमातांच्या डोळ्यात वेगळीच चमक येत होती. माधवराव यांची लहान बहीण यशोधरा यांनी, त्या काळात राजमाता आणि माधवराव दोघांचेही डोळे पाणावलेले असायचे, असं म्हटलं."
मृत्यूपत्रात नाकाराला अंत्यसंस्काराचा हक्क
मात्र राजमाता यांच्या मृत्यूनंतर 13 दिवसांत या संपूर्ण प्रकरणात आणखी एक गंभीर वळण आलं.
 
दिल्लीच्या प्रेस क्लबमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये, विजयाराजे शिंदे यांचे सचिव राहिलेले बाळ आंग्रे यांनी 20 सप्टेंबर 1985 रोजी राजमातांनी स्वतःच्या हाताने लिहिलेलं बारा पानांचं मृत्यूपत्र प्रसिद्ध केलं होतं. यात त्यांनी माधवरावांचा उल्लेख त्यांच्या जीवनातील सर्वात वाईट भाग असा केला होता.
"या मृत्यूपत्रावर प्रेमा वासुदेवन आणि एस गुरुमूर्ती अशा दोन साक्षीदारांच्या सह्या होत्या. माधवराव यांच्याबाबत यात असं लिहिलं होते की, ते त्यांच्या राजकीय मालकांचे गुलाम बनले आहेत. त्याचबरोबर त्यांनी मला आणि माझ्या समर्थकांना त्रास देण्यासाठी त्या मालकांचं शस्त्र म्हणून भूमिका पार पाडली. त्यांनी आता त्यांच्या आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करावे, या लायकीचेही ते राहिले नाहीत," असा उल्लेख मृत्यूपत्रात असल्याचं माधवरावांच्या आत्मचरित्रात लिहिलेलं आहे.
 
पण तरीही, माधवराव शिंदे यांनी त्यांच्या आईचे अंत्यसंस्कार स्वतः केले होते.
 
याबाबत जेव्हा सरदार आंग्रे यांना विचारण्यात आलं तेव्हा, "माझ्या हातात काहीही नव्हतं. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर मी मृत्यूपत्र पाहिलं. राजमातांनी त्यांच्या मृत्यूनंतर मला हा लिफाफा देण्याची सूचना माझ्या पत्नीला केली होती," असं ते म्हणाले.
 
त्यांच्या सूचनांनुसार मृत्यूनंतर हा लिफाफा लगेच का उघडला नाही, याबाबत विचारलं असता, "असं कधीही केलं जात नाही. ते चुकीचं ठरलं असतं. मला मृत्यूपत्राची प्रत, अंत्यसंस्कारानंतर मिळाली," असं त्यांनी सांगितलं.
माधवराव शिंदे यांनी या मृत्यूपत्राला न्यायालयामध्ये आव्हान दिलं. त्यानंतर फेब्रुवारी 1999 मध्ये लिहिलेलं राजमातांचं आणखी एक मृत्यूपत्र न्यायालयात सादर करण्यात आलं.
 
आठ महिन्यांनी माधवराव शिंदे यांचं एका विमान दुर्घटनेमध्ये निधन झालं. तर मार्च 2008 मध्ये 87 वर्षांचे असताना बाळ आंग्रे यांनीही जगाचा निरोप घेतला.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती