एन्काउंटर करणारे व्ही. सी. सज्जनार कोण आहेत?

शुक्रवार, 6 डिसेंबर 2019 (17:52 IST)
हैदराबाद बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणातील चारही आरोपींना पोलिसांनी ठार केलं आहे. सर्व आरोपी चकमकीत ठार झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र, हे सर्व आरोपी पोलिसांच्याच ताब्यात होते. ज्या ठिकाणी महिला डॉक्टरचा जळालेला मृतदेह सापडला होता, तिथेच या चारही जणांना ठार केल्याचं सांगितलं जात आहे.
 
सर्व आरोपींना सीन रि क्रिएशनसाठी घटनास्थळी घेऊन गेले असताना त्यांनी पोलिसांवर हल्ला केला आणि त्यानंतरच चकमकीत सर्व आरोपी ठार झाले, असं पोलिसांचं म्हणणं आहे. गेल्या दहा वर्षांत माओवाद्यांव्यतिरिक्त करण्यात आलेली ही तिसरी चकमक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यापूर्वी 2008 आणि 2015 सालीदेखील पोलीस चकमकी झाल्या होत्या.
 
2008 साली झालेली चकमक आणि शुक्रवारी सकाळी झालेली चकमक या दोन्हींमध्ये बरंच साम्य आहे आणि ते म्हणजे -
 
दोन्ही प्रकरणांमध्ये पीडित महिला होत्या.
व्ही. सी. सज्जनार यांचा दोन्ही चकमकींशी संबंध
दोन्ही ठिकाणी घटनास्थळीच चकमक झाली.
2008 ची घटना
 
2008 सालीदेखील वारंगळ जिल्ह्यात पोलिसांनी अशाच पद्धतीने सीन रिक्रिएशनदरम्यान अॅसिड हल्ल्यातील तीन आरोपींना ठार केलं होतं. त्यावेळीदेखील पोलिसांनी हेच सांगितलं होतं की तिन्ही आरोपींनी पोलिसांवर हल्ला केला आणि प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत आरोपी ठार झाले. सध्या हैदराबाद प्रकरणाचा तपास करणारे सायबराबादचे पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार त्यावेळी वारंगळचे एसपी होते.
 
अॅसिड हल्ल्यातील तिन्ही आरोपींना त्यांनी ज्या ठिकाणी बाईक लपवली होती तिथे घेऊन गेल्यावर आरोपींनी बाईकमधून बंदूक आणि चाकू काढले आणि पोलिसांवर हल्ला केला. प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीही गोळीबार केला आणि आरोपी ठार झाले, असा दावा पोलिसांनी केला होता.
 
2008 साली वारंगळमधील एका इंजीनिअरिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या दोन तरुणींवर त्यांच्या सोबतच शिकणाऱ्या तिघांनी अॅसिड फेकल्याचा आरोप होता. अॅसिड हल्ल्यात दोन्ही तरुणी गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यापैकी एकीचा काही महिन्यांनी मृत्यू झाला. प्रेमाचा प्रस्ताव नाकारल्यामुळे संतापलेल्या तरुणांनी हा हल्ला केल्याचं सांगण्यात आलं होतं.
 
या घटनेनंतर निर्माण होणारे प्रश्न
हैदराबाद प्रकरण आणि 2008 सालच्या प्रकरणात बरंच साम्य आहे. सोशल मीडियावर चकमकीसाठी लोक एकीकडे सज्जनार यांना हिरो ठरवत आहेत तर दुसरीकडे त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नही उपस्थित होत आहेत.
 
कायद्याच्या राज्यात अशाप्रकारच्या घटना घडणं घातक ठरु शकतं, असं त्यांचं म्हणणं आहे. 2008च्या चकमकीत स्वतः व्ही. सी. सज्जनारदेखील सहभागी होते.
 
एन्काउंटर स्पेशलिस्ट
व्ही. सी. सज्जनार एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून ओळखले जातात. 1996च्या बॅचचे आयएएस अधिकारी व्ही. सी. सज्जनार यांनी अविभक्त आंध्र प्रदेशच्या पोलीस विभागात अनेक महत्त्वाची पदं भूषवली आहेत.
 
तेलंगणातील वारंगळ आणि मेदक जिल्ह्याचे ते एसपीदेखील होते. सध्या ते सायबराबादचे पोलीस आयुक्त आहेत. 2018 साली त्यांनी या पदाचा कार्यभार हाती घेतला होता. मेदक जिल्ह्याचे एसपी असताना त्यांनी एका अफीम तस्कराचं एन्काउंटर केलं होतं. त्या तस्करावर एका पोलीस कॉन्स्टेबलच्या खुनाचा गुन्हा दाखल होता. नक्षलवाद्यांचा नेता नईमुद्दीन याच्या हत्येसाठीही व्ही. सी. सज्जनार ओळखले जातात. स्पेशल इंटेलिजन्स ब्रांचचे आयजी असताना त्यांनी नईमुद्दीनला ठार केलं होतं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती