'किम जाँग-उन कुठे आहेत?' तब्येत नाजूक असल्याच्या वृत्तांवरून सर्वत्र चर्चा
मंगळवार, 21 एप्रिल 2020 (13:40 IST)
लॉरा बिकर
उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किंम जाँग-उन यांची प्रकृती चिंताजनक असल्याच्या बातम्या येत आहेत. कुणाच्या मते ते ब्रेन डेड झाले आहेत, तर काही वृत्तांनुसार हृदयावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती गंभीर झाली आहे. मात्र, अजूनतरी कुठल्याही अधिकृत सूत्रांकडून या वृत्ताची खात्री पटू शकलेली नाही.
दक्षिण कोरियाच्या प्रशासनानेही या वृत्ताचं खंडन केलं आहे. 36 वर्षीय किम जाँग-उन यांची प्रकृती गंभीर असल्याचे कुठलेही विशिष्ट संकेत उत्तर कोरियाकडून मिळाले नसल्याचं दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.
किम आजारी असल्याच्या अफवा यापूर्वीही अनेकदा पसरल्या होत्या.
15 एप्रिल रोजी किम जाँग-उन यांचे आजोबा आणि उत्तर कोरियाचे संस्थापक किम इल-सुंग यांचा वाढदिवस होता. या निमित्ताने उत्तर कोरियात दरवर्षी मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. या कार्यक्रमाला फार महत्त्व असतं.
किम जाँग-उन आजवर कधीही या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिलेले नाहीत. त्यामुळे काहीतरी मोठं कारण असल्याशिवाय ते या कार्यक्रमाला अनुपस्थित राहणार नाहीत, या तर्कावरून पुढे ते आजारी असावेत, असे अंदाज वर्तवले गेले.
किम जाँग-उन प्रसार माध्यमांमध्ये शेवटचे दिसले ते 12 एप्रिल रोजी. त्याच दिवशी प्रसार माध्यमांमध्ये छापून आलेल्या काही बातम्यांनुसार किम यांनी 11 एप्रिल रोजी एक महत्त्वाची राजकीय बैठकही बोलावली होती. मात्र त्यानंतर ते कुठे आहेत, काय करत आहेत, याबाद्दल कुणालाची काहीही माहिती नाही.
गेल्या आठवड्यात उत्तर कोरियाने एक क्षेपणास्त्र चाचणी घेतली होती. अशा चाचण्यांना किम जाँग-उन सहसा उपस्थित राहतात. मात्र गेल्या आठवड्यात घेतलेल्या क्षेपणास्त्र चाचणीवेळी ते उपस्थित होते की नाही, याबाद्दल तिथल्या प्रसार माध्यमांनीही काहीही सांगितलेलं नाही.
उत्तर कोरियातून कुठलीही खात्रीशीर बातमी मिळवणं एरवीही अवघड असतं. आता तर कोव्हिड-19 मुळे उत्तर कोरियाने सर्व सीमा बंद केल्या आहेत. त्यामुळे तिथून बातमी मिळवणं पूर्वीपेक्षा जास्त कठीण झालं आहे.
आजारी असल्याचं पहिलं वृत्त
उत्तर कोरियाच्या 'डेली NK' नावाच्या वेबसाईटने सर्वप्रथम हे वृत्त दिलं. किम जाँग-उन यांना गेल्या ऑगस्टपासूनच हृदयाच्या आजाराने ग्रासलं आहे. मात्र पाएक्तू पर्वतावर वारंवार गेल्याने आजार अधिकच बळावल्याचं वृत्त अज्ञात सूत्राच्या हवाल्याने या वेबसाईटने प्रकाशित केलं आहे.
आणि मग याच एकमेव बातमीच्या आधाराने आंतरराष्ट्रीय प्रसार माध्यमांमध्ये हे वृत्त प्रसारित झालं. वृत्तसंस्थांनीही त्या वेबसाईटने केलेल्या दाव्यावरून बातम्या दिल्या. पुढे दक्षिण कोरियाची गुप्तचर संस्था आणि अमेरिका उत्तर कोरियावर लक्ष ठेवून असल्याच्या बातम्याही आल्या.
यानंतर हृदय शस्त्रक्रियेनंतर किम जाँग-उन यांची प्रकृती चिंताजनक बनल्याची हेडलाईन अमेरिकेच्या प्रसारमाध्यमांमध्ये आली आणि एकच खळबळ उडाली.
मात्र दक्षिण कोरिया सरकारकडून एक पत्रक जारी करून या बातम्या खऱ्या नसल्याचं सांगण्यात आलं. चीनच्या गुप्तचर अधिकाऱ्यांनीही रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना किम यांची प्रकृती चिंताजनक नसल्याचं स्पष्ट केलं. इथे एक गोष्ट मात्र लक्षात घेतली पाहिजे, की कुणीच किम यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया झाल्याची बाब नाकारली नाही.
बेपत्ता असण्याची पहिलीच वेळ नाही
12 एप्रिलपासून किम जाँग-उन यांचा ठावठिकाणा कुणालाही माहिती नसला तरीही, असं होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2014 साली ते असेच 40 दिवस बेपत्ता होते. त्यावेळी अनेक अफवा पसरल्या होत्या. राजकीय विरोधकांनी उठाव करत त्यांना पायउतार केल्याच्याही बातम्या आल्या.
मात्र 40 दिवसांनंतर काठीचा आधार घेऊन उभे असलेले किम जाँग-उन यांचा फोटो छापून आला. शारीरिक त्रास असल्याने ते इतके दिवस कुणासमोरही आले नसल्याचं प्रसार माध्यमांनी सांगितलं. मात्र त्यांना संधीवात आहे का, याविषयी कुठलीही माहिती देण्यात आली नाही.
किम यांचा उत्तराधिकारी कोण?
किम जाँग-उन यांना काही झालंच तर त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल, याविषयी फारशी स्पष्टता नाही.
देशाचं नेतृत्त्व करण्यासाठी किम जाँग-उन यांच्या वडिलांना त्यांना फार पूर्वीपासूनच तयार करायला सुरुवात केली होती. किम जाँग-उन यांची बहीण किम यो-जाँग यांच्या गळ्यात उत्तराधिकारी पदाची माळ पडण्याची शक्यता अधिक आहे. एक म्हणजे त्या किम वंशाच्या आहेत आणि दुसरं म्हणजे त्या स्वतःदेखील बातम्यांमध्ये असतात.
गेल्या महिन्यात त्यांनी स्वतः एक पत्रक प्रसिद्ध केलं होतं. शिवाय, अनेक महत्त्वाच्या परिषदांमध्ये त्या भाऊ किम जाँग-उन यांच्याबरोबर दिसतात. मात्र सध्या तरी किम जाँग-उन यांच्या प्रकृतीविषयी उठलेल्या वावड्यांना स्वतः उत्तर कोरियातून काही उत्तर येतं का, हे बघावं लागेल.