हिजाब म्हणजे काय? मुस्लिम महिला तो का घालतात?

मंगळवार, 15 मार्च 2022 (11:51 IST)
कर्नाटक हायकोर्टानं हिजाब हा मुस्लिमांचा मख्य पेहराव नाही, धार्मिक प्रथांप्रमाणे तो आवश्यक नाही असं म्हटलंय. कर्नाटकात सुरू झालेल्या हिजाब दावावर निर्णय देताना कोर्टानं हे मत नोंदवलं आहे.
 
कर्नाटकात काही हिंदुत्ववादी संघटनांनी हिजाबला विरोध केला आहे. तसंच तिथल्या सरकारनं शाळा-कॉलेजमध्ये हिजाबला बंदी केली घातलीय.
 
पण ज्या हिजाबला विरोध केला जात आहे तो हिजाब नेमका काय आहे? त्याला विरोध का केला जात आहे आणि मुस्लिम महिला हिजाब का घालतात, त्यामागे काय कारण आहे हे आपण जाणून घेऊया.
 
हिजाब म्हणजे काय?
जगभरातल्या मुस्लीम महिला अनेक प्रकारचे हेडस्कार्फ बांधतात, मग तो हिजाब असो, नकाब किंवा बुरखा. यातला फरक सामान्यतः लक्षात येत नाही, म्हणजे कुठला पूर्ण चेहरा झाकतो, कुठला फक्त डोक्यावरून घेतला जातो, आणि कशात डोळ्यांवर जाळी असते.
 
याबाबत मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमसुद्दीन तांबोळी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं,
 
"आपल्याकडे जो बुरखा वापरला जातो, त्यालाच पर्यायी शब्द म्हणून हिजाब हा शब्दही वापरला जातो. पण त्याच्यामध्ये थोडासा फरक आहे. हिजाब हा फक्त डोकं झाकणं, आपण जसं स्कार्फ बांधतो त्यापद्धतीच्या प्रथेला हिजाब असं म्हणतात. आणि संपूर्ण चेहरा झाकून, काळा अंगावर झब्बा घालण्यात येतो त्याला बुरखा असं म्हणतात. सुन्नींमध्ये काळा बुरखा वापरण्यात येतो. तर शिया किंवा बोहरी समाजात रंगीबेरंगीसुद्धा वापरण्यात येतात."
 
"हिजाब आणि बुरखा यामध्ये फरक आहे. हिजाब म्हणजे चेहरा झाकणे तर बुरख्यामध्ये संपूर्ण शरीर झाकले जाते. पर पुरुषाने स्त्रीकडे वाईट नजरेने पाहू नये म्हणून मुस्लिम धर्मानुसार स्त्रियांनी बाहेर पडताना बुरखा परिधान करावा असं सांगितले जातं," असं मूलनिवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अजुम इनामदार यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
 
"परपुरूष आपल्याकडे आकर्षित होऊ नये यासाठी बुरखा घातला जातो. असे नियम केवळ मुस्लिम महिलांना नाही, तर मुस्लिम पुरुषांना देखील आहेत. मुस्लिम पुरुषांनी पर स्त्रीकडे नजर वर करून पाहू नये असे देखील धर्मात सांगण्यात आले आहे," असंसुद्धा अजुम इनामदार सांगतात.
 
कुराण काय सांगतं?
शमसुद्दीन तांबोळी सांगतात, "वस्तुस्थिती अशी आहे की कुराणामध्ये हिजाब हा जो शब्द वापरलेला आहे, त्याचा अर्थ त्यांनी फक्त डोकं झाकणं आणि डिसेंट कपडे वापरणं या अर्थाने वापरलेला आहे.
 
बुरखा हा नंतर आलेला प्रकार पुरुष प्रधान मानसिकतेतून आलेला आहे. स्री माझी प्रॉपर्टी आहे आणि माझ्या प्रॉपर्टीला इतरांनी पाहू नये अशी ती भावना आहे. हे इस्लाममधून आलेलं नाही. इस्लामी कल्चरमधून आलेलं आहे. कुराणात, इस्लाममध्ये ते नाही."
 
मग हिजाब कधी परिधान करायचा असतो, "यात पुरुषांना सुद्धा असं सांगितलेलं आहे की त्यांनी स्त्रीशी बोलताना डोळ्यांत डोळे घालून न बोलता, खाली नजर ठेवून बोलावं. 'नजरोंका हिजाब' असं म्हटलेलं आहे.
 
स्त्रियांनी डोकं झाकून घ्यावं, डिसेंट कपडे घालावे एवढाच उल्लेख आहे. नंतरच्या काळात 'ना महरम'सारख्या काही गोष्टी पुढे आल्या. स्त्रियांनी वडील, मुलगा, भाऊ, नवरा यांच्यासोबतच मोकळेपणाने बोलावं, इतरांशी बोलताना बंधन घालण्यात आली. मुस्लिम महिलांना एका अर्थाने दुय्यम वागणूक देणं आणि पुरुषप्रधान मानसिकतेचं वर्चस्व राखणं यातून पुढे आलेली ही परंपरा आहे."
 
शमसुद्दीन तांबोळी सांगतात, "माझ भूमिका अशी आहे, शिक्षणसंस्थेमध्ये जिथे आपण स्त्री पुरूष समानतेचे धडे घेतो, सर्वांनी एकत्र राहण्याच्या, समानतेच्या बाबतीत बोलतो, सेक्युलरिझम बाबतीत बोलतो, अशावेळी त्या संस्थेचा ड्रेसकोड असेल तर त्याठिकाणी किमान अशी जी प्रतिगामी संस्कतीची प्रतिकं आहेत, त्याचा अस्मितेसाठी वापर करणं हे चुकीचं आहे.
 
पण दुर्दैवाने याच्या पाठीशी पुरूषप्रधान संस्कतीच आहे. ट्रिपल तलाक बंद करत असतानाच ते महिलांच्या हिताचं असूनही हजारो महिलाच रस्त्यावर येत होत्या. NRC-CAA आंदोलनावेळी 'हमें चाहिए आझादी' म्हणणाऱ्या महिला बुरख्यात होत्या."
 
आंबेडकर, देशाची घटना आणि हक्क
संविधानाने आपल्याला आपल्या आवडीचे कपडे घालण्याचा हक्क असल्याचं या प्रकरणी काही विद्यार्थ्यांनी म्हटलंय. याविषयी बोलताना शमसुद्दीन तांबोळी सांगतात,
 
" डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिजाब वा बुरखा हे अप्रगत समाजाचं लक्षण आहे हे म्हटलं होतं. मुस्लिम समाजात सुधारणा होण्याची अत्यंत गरज असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. Thoughts on Pakistan मधलं त्यांचं हे विधान आहे. त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने आम्हाला अभिव्यक्ती आहे असं म्हणायचं, आणि सर्वोच्च न्यायालयाने शाळेत हिजाब वापरू नये असा निकाल दिला तर तो मानणार नाही म्हणायचं.
 
म्हणजे एकाबाजूला तुम्ही संविधानाचा आधार घेताय आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नाकारू असंही म्हणताय. हे म्हणजे अत्यंत धर्मवादी, अप्रगत व्यवस्थेचे अवशेष जपण्याचा अट्टाहास आहे, जो दुर्दैवी आहे."
 
हिजाबचे वेगवेळे प्रकार
हेडस्कार्फचे आणि परिधान करण्याचे प्रकार.
 
1. हिजाब
तसं तर 'हिजाब'चा शब्दशः अर्थ हा कुठलीही गोष्ट झाकणे किंवा त्यावर पांघरूण घालणे, असा आहे. पण आता हिजाब म्हटलं की लगेच मुस्लीम स्त्रिया डोक्यावरून घेतात तो स्कार्फ डोळ्यांसमोर येतो.
 
हिजाब वेगवेगळ्या रंगात आणि अनेक स्टाईल्समध्ये येतो. पाश्चात्त्य देशांमध्ये जे हिजाब सर्वाधिक दिसतात ते डोकं आणि गळा पूर्णपणे झाकतात, पण चेहरा स्पष्टपणे दिसतो.
 
2. नकाब
नकाब चेहऱ्यासाठीचा एक पदर असतो, ज्यात डोळ्यांभोवतीचा भाग उघडा असतो. तो स्वतंत्रपणे फक्त चेहरा झाकण्यासाठी वापरतो येऊ शकतो, किंवा त्याला हिजाबच्या सोबतीनेही घालता येतं.
 
3. बुरखा
मुस्लीम महिला सर्वांत जास्त पर्दानशीन असतात त्या बुरख्यात. डोक्यापासून पायांपर्यंत, असं अख्खं शरीर झाकलेलं असतं आणि फक्त डोळ्यांसमोर येणाऱ्या भागावर एक जाळी असते.
 
4. अल-अमिरा
अल-अमिरा या वस्त्राचे दोन भाग असतात. एक म्हणजे कॉटन आणि पॉलीस्टरपासून बनलेली घट्ट बसणारी टोपी, आणि दुसरा म्हणजे एक झोळीसारखा स्कार्फ.
 
5. शायला
आखाती देशांमधला एक लोकप्रिय स्कार्फचा प्रकार म्हणजे शायला. हा लांबलचक स्कार्फ डोक्याभोवती गुंडाळून, कमीज किंवा टॉपवर खांद्याजवळ त्याला पिन लावली जाते.
 
6. खीमार
खीमार एक लांब केपसारखा कपडा असतो, जो डोक्यावरून थेट कमरेपर्यंत असतो. त्याने डोकं, गळा आणि खांदे झाकले जातात, पण चेहऱ्यावर पदर नसतो.
 
7. चादोर
इराणमधल्या महिलांमध्ये चादोर खूप प्रसिद्ध आहे. घराबाहेर पडायचं असल्यास त्या हे वस्त्र घालतात, जे पूर्ण शरीर झाकतं. कधी कधी त्याच्यासोबत एक छोटा हेडस्कार्फ असतो.
 
कर्नाटकात नेमकं काय घडलंय?
शांतता आणि सौहार्द कायम राखावं असं आवाहन हिजाब प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी विद्यार्थी आणि नागरिकांना केलं आहे. कोर्टाने असं आवाहन करण्याची ही दुर्मिळ घटना आहे.
 
शाळा कॉलेजात हिजाब घालण्यावर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयाच्या विरोधातल्या याचिकांवर सुनावणी सुरू असताना कॉलेजच्या आवारात आणि बाहेर घडलेल्या हिंसेच्या घटनांबद्दल जस्टिस कष्णा दीक्षित यांनी काळजी व्यक्त केली.
 
काही विद्यार्थी आणि समाजकंटकांकडून दगडफेकीच्या आणि कॉलेजमध्ये शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या हिजाब घातलेल्या तरुणींना धक्काबुक्कीच्या घटना घडल्यानंतर मध्य कर्नाटकमधल्या दावणगिरी, हरीहर आणि शिवामोगा भागामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
 
उडुपीमधल्या खासगी कॉलेजच्या बाहेर विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये घोषणाबाजी आणि वादावादी झाली. हिजाब घातलेला एक गट तर भगवे शेले पांघरलेला दुसरा गट एकमेकांसमोर आल्यानंतर हे कॉलेज हायकोर्टाचा याविषयीचा निकाल येईपर्यंत बंद करण्यात आलं.
 
शिवमोगा आणि बागलकोट जिल्ह्यातल्या बनहट्टीमध्ये दोन्ही बाजूंकडून घोषणाबाजी आणि वादावादीनंतर दगडफेक करण्यात आली. हिजाब घातलेल्या ज्या मुलींना कॉलेजमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलं होतं त्यांच्यापैकी एकीचे पालक व्हीडिओत दगड फेकताना दिसतात.
 
"बनहट्टीमधली परिस्थिती आता नियंत्रणाखाली आहे," असं बागलकोटचे पोलीस निरीक्षक लोकेश जगलसार यांनी बीबीसी हिंदीशी बोलताना सांगितलं.
 
उडुपीमधल्या MGM कॉलेजच्या परिसरामध्ये विद्यार्थी सकाळी जमले होते. हिजाब परिधान केलेल्या काही मुलींनी सकाळी लवकर कॉलेजमध्ये प्रवेश केला. पण दुसऱ्या काही मुली गेटपाशी आल्यानंतर त्यांना कॉलेजमध्ये प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली नाही. यावेळी भगवे फेटे बांधलेले आणि भगव्या शाली पांघरलेले काही विद्यार्थी गेटपाशी आंदोलन करत होते.
 
"आतापर्यंत अनेक वर्षं कॉलेजने आम्हाला हिजाबसह येऊ दिलं. आम्हाला कॉलेजच्या अगदी लेडीज रूममध्येही परवानगी देण्यात येणार नसल्याचं अचानक आम्हाला सांगण्यात आलं," हिजाब परिधान केलेल्या एका विद्यार्थिनीने सांगितलं.
 
भगवी ओढणी पांघरलेल्या दुसऱ्या एका मुलीने कन्नड वाहिनीला सांगितलं, "आम्हाला फक्त समानता हवीय. आम्ही यापूर्वी कधीही भगव्या ओढण्या घेतल्या नाहीत."
 
या मुलांमधली घोषणाबाजी वाढत गेल्यावर कॉलेजचे मुख्याध्यापक डॉ. देवदास भट यांनी कोर्टाचा निर्णय येईपर्यंत कॉलेज बंद ठेवण्याचं जाहीर केलं.
 
"या सगळ्या किरकोळ घटना आहे. परिस्थितनी नियंत्रणाखाली आहे," कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे ADGP प्रताप रेड्डी यांनी बीबीसीला सांगितलं.
 
विद्यार्थिनींनी कॉलेजमध्ये हिजाब परिधान करण्यावरून 28 डिसेंबरपासून वादाला सुरुवात झाली. PU सरकारी कॉलेजच्या मॅनेजमेंटने हिजाब घातलेल्या सहा मुलींना वर्गात शिरण्यास मनाई केली. त्यानंतर उडुपी जिल्ह्यातल्या कुंदापूर तालुक्यामधल्या सरकारी आणि खासगी कॉलेजांमध्ये हे प्रकरण पसरलं. पण आतापर्यंत त्याला हिंसक वळण लागलं नव्हतं.
 
उडुपी कॉलेज आणि त्यानंतर कुंदापूर खासगी महाविद्यालयातल्या काही विद्यार्थ्यांनी हे प्रकरण उच्च न्यायालयाकडे नेलं. याविषयीची प्राथमिक सुनावणी गेल्या आठवड्यात झाली. आज पहिल्यांदाच याविषयीची व्यवस्थित सुनावणी सुरू झाली.
 
कोर्टाचं कामकाज सुरू झाल्यानंतर एका वकीलाने सुनावणी तहकूब करण्याची मागणी केली. पण जस्टिस दीक्षित यांनी आपली भूमिका सगळ्या वकिलांसमोर स्पष्ट केली.
 
ते म्हणाले, "आपण आपल्या सगळ्या भावना कोर्टाबाहेर ठेवूयात. आपल्यासाठी आपली घटना हीच आपली भगवत गीता आहे. मी पद स्वीकारताना जी शपथ घेतली त्यानुसार मी वागणार आहे. विद्यार्थ्यांनी वर्गाबाहेर असणं ही चांगली परिस्थिती नाही."
 
"मी सकाळी उठून सोशल मीडिया अॅप पाहतो तेव्हा मला 'या कोर्टाने हे सांगितलं' असं सांगणारे शेकडो मेसेजेस अनेक अनोळखी नंबरवरून आलेले असतात," जस्टिस दीक्षित म्हणाले.
 
हिजाबवर बंदी घालणाऱ्या सरकारच्या आदेशामध्ये कोर्टाच्या एका निर्णयाचा उल्लेख करण्यात आल्याचं विद्यार्थ्यांची बाजू मांडणाऱ्या देवदत्त कामत यांनी कोर्टाला सांगितलं.
 
"हिजाब परिधान करणं ही पवित्र कुराणात सांगितलेली एक महत्त्वाची प्रथा आहे. आपल्या निवडीप्रमाणे वस्त्र परिधान करण्याचा हक्क हे घटनेच्या कलम 19(1) (a) मध्ये नमूद असून त्यावर फक्त कलम 19 (6) नुसार मर्यादा घालता येऊ शकतात. आणि जस्टिस पुट्टस्वामींच्या प्रकरणानुसार आपल्या आवडीचे कपडे घालण्याचा हक्क हा राईट टू प्रायव्हसीही आहे," असं कामत यांनी म्हटलं.
 
सरकारने त्यांच्या ऑर्डरमध्ये नमूद केलेल्या कोर्ट ऑर्डर या इथे लागू होत नसल्याचंही कामत यांनी म्हटलं. "सामाजिक हितासाठी धार्मिक पद्धती थांबवण्याचा हक्क सरकारला आहे. पण यातलं खरं खोटं तपासणं कोर्टाचं काम आहे. आणि शाळेमध्ये हिजाब घालणं हे सामाजिक हिताला बाधा आणणारं कसं असू शकतं? राज्य सरकारचा हा निर्णय म्हणजे कलम 25, 19 आणि 14 द्वारे देण्यात आलेल्या हक्कांना धक्का आहे."
 
परीक्षा दोन महिन्यांवर असल्याने कोर्टाने याबाबत अंतरिम आदेश द्यावा अशी मागणी कामत यांनी केली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती