उद्धव ठाकरे - राज ठाकरे राजकारणाच्या मंचावर एकत्र येण्याच्या शक्यता किती?

सोमवार, 25 जानेवारी 2021 (20:01 IST)
प्राजक्ता पोळ  
बीबीसी मराठीसाठी
 
27 नोव्हेंबर 2005 राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरच महाराष्ट्रातल्या राजकारणाला मोठा धक्का देणारी ती घटना होती. या घटनेला आता 16 वर्षं झाली.
 
या 16 वर्षांच्या काळात राजकारणात ठाकरे बंधू समोरासमोर आले. अनेक आरोप-प्रत्यारोप केले गेले. पण राजकारणापलीकडे कौटुंबिक कार्यक्रमात ते एकत्र दिसले.
 
त्यांच्या खाजगी आयुष्यतल्या संवादांमुळे भविष्यात ते एकत्र येण्याच्या शक्यता वर्तविण्यात आल्या.
 
'राज आणि उद्धव या ठाकरे बंधूंनी एकत्र यावं. त्यांची एकत्र ताकद ही महाराष्ट्र जिंकेल.' मागच्या 16 वर्षांत अशी अनेक विधानं महाराष्ट्रातल्या मोठ्या राजकारण्यांनी केली आहेत.
 
स्वत: बाळासाहेब ठाकरे यांनीही राज आणि उद्धवने भविष्यात एकत्र यावं ही इच्छा बोलून दाखवली होती. पण राजकीय मंचावर या दोन्ही भावांनी एकत्र येणं टाळलं.
 
23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज आणि उद्धव एकत्र आले. त्या दरम्यान दोघांमध्ये सुरू असलेला संवाद माध्यमांच्या कॅमेर्‍यातून सुटला नाही.
 
यानिमित्ताने राज-उद्धव ठाकरे राजकारणाच्या निमित्ताने एकत्र येणार का? ते एकत्र आले पाहिजेत का? कौटुंबिक संबंध कार्यक्रमात ठाकरे बंधू एकत्र दिसत असले तरी राजकारणात ते एकत्र मंचावर येतील का? हे प्रश्न पुन्हा उपस्थित होऊ लागले.
 
उद्धव आणि राज यांच्यातील राजकीय संघर्ष

राज हे सुरवातीपासून राजकारणात सक्रीय होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रत्येक दौऱ्यात, त्यांच्या सभांमध्ये राज हे सोबत असतं. उद्धव ठाकरे यांची राजकारणातली 'एन्ट्री' उशीरा झाली. राज यांच्यावर असलेल्या जबाबदाऱ्यांमध्ये उद्धव यांचा हस्तक्षेप वाढत होता, असं राज यांचे निकटवर्तीय सांगतात.
 
1991 साली सुधाकर नाईक मुख्यमंत्री असताना राज यांनी महाराष्ट्राचा दौरा केला. राज्यात हिवाळी अधिवेशन सुरू होतं. राज हे हिवाळी अधिवेशनादरम्यान बेरोजगारीच्या मुद्यावर विधानभवनावर युवकांचा मोर्चा घेऊन धडकणार होते. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी राज यांना फोन करून या मोर्चा दरम्यान उद्धवही भाषण करतील, असा निरोप दिला. तेव्हा राज कमालीचे नाराज झाल्याचं पत्रकार सांगतात.
 
त्यानंतर उद्धव आणि राज यांच्यातील राजकीय वादाची दरी वाढत गेली. 2004-05 च्या काळात बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी निवड करून त्यांचा उत्तराधिकारी निवडला. महाबळेश्वरला झालेल्या अधिवेशनात राज ठाकरे यांनीच उद्धव ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. बाळासाहेब ठाकरे यांनी तो राज यांना मांडायला लावला, असं राजकीय विश्लेषक सांगतात.
 
ज्येष्ठ पत्रकार राही भिडे सांगितात, "2005 साली नारायण राणे यांनी उद्धव यांच्या नेतृत्वावर टीका करून शिवसेना सोडली. नारायण राणे यांच्या जागेवर पोटनिवडणुक होणार होती. या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेनेने आपली ताकद पणाला लावली. सर्व नेते कोकणात गेले पण राज ठाकरे गेले नाहीत. हे बाळासाहेबांच्या लक्षात आलं. मग त्यांनी राज यांना फोन करून प्रचारासाठी जायला सांगितलं.
 
राज ठाकरे प्रचारासाठी कोकणात गेले पण त्यांनी फक्त कॉंग्रेसच्या धोरणांबाबत टीका केली. नारायण राणे यांच्याविरुद्ध एका शब्दाचीही टीका केली नाही. तेव्हापासून राज ठाकरे यांच्या मनात स्वतंत्र पक्ष काढण्याचा विचार घोळत होता."
 
त्यानंतर राज यांनी शिवसेना सोडली आणि 9 मार्च 2006 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. राज यांच्या राजकीय आयुष्यातल्या या कलाटणीचं कारण उध्दव ठाकरेंचं नेतृत्व होतं.
 
राज आणि उद्धव एकत्र येण्याची शक्यता किती?

या सर्व राजकीय घटनांनंतर राज ठाकरे यांनी भाषणांमधून उद्धव यांच्यावर अनेकदा टीका केली. उद्धव यांनीही राज यांच्यावर टीका केली आहे.
 
पण उद्धव ठाकरे हे आजारी असताना राज हे स्वतः गाडी चालवत त्यांना हॉस्पिटलमधून घरी घेऊन आले होते. राज यांची ईडी चौकशी होणार हे विचारल्यावर उद्धव हे राज यांच्या बाजूने उभे राहिले.
 
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा राज हे आवर्जून उपस्थित राहिले. राज यांचे पुत्र अमित यांच्या लग्नाला उद्धव ठाकरे कुटुंबासह उपस्थित राहिले.
 
या घटना दोघांमधला सुसंवाद अधोरेखित करणाऱ्या असल्या तरी दोघांमधले राजकीय मतभेद दूर करण्याएवढा नसल्याचं बोललं जातं.
 
राही भिडे सांगतात, "उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी करून मुख्यमंत्री झाले. त्यानंतर राज यांनी स्वत:च्या पक्षाचा झेंडा बदलला. हिंदुत्वाची भूमिका राज हे प्रकर्षाने मांडताना दिसत आहेत. यातून शिवसेनेच्या मतांचं विभाजन होऊन त्याचा फायदा मनसेला होईल, असं चित्र आहे. त्यामुळे उद्धव आणि राज यांना जर एकत्र यायचं असतं तर ते केव्हाच आले असते.
 
"आता ती शक्यता आहे असं वाटत नाही. जर असा विचार केला तरी शिवसेना हा आताचा मोठा पक्ष आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे राज यांना त्यांच्या नेतृत्वाखाली काम करावं लागेल. त्याच बरोबर राज यांची माघार यातून स्पष्ट होईल. जर एका क्षणाला खूप ओढून ताणून हे दोन नेते एकत्र येतील अशी शक्यता पडताळली तर ते कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी सारखी आघाडी करून एकत्र येऊ शकतात. पण सध्याच्या राजकीय वातावरणात ते शक्य असल्याचं वाटत नाही".
 
पण राजकारण कधीही काही होऊ शकतं असं म्हटलं जातं. त्यामुळे खूप पुढच्या राजकीय गणितांचा अंदाज लावण्यापेक्षा सध्याची परिस्थिती पडताळणं योग्य ठरेल.
 
याबाबत ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत सांगतात, "राज आणि उद्धव ठाकरे हे दोघं चुलत भाऊ आहेत. ठाकरे घराण्याच्या राजकारणाकडे लोकांचं विशेष लक्ष असतं म्हणून या चर्चा सुरू होतात. पण सध्याच्या परिस्थितीत उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे नेते आहे. त्यांचे भाजपबरोबर टोकाचे मतभेद झाले आणि ते भाजप पासून लांब गेले. तितकेच राज ठाकरे आता भाजपच्या जवळ जाताना दिसत आहेत. या दोघांमधली दरी इतकी वाढली आहे की ते एकत्र येतील अशी शक्यता वाटत नाही.
 
"काही विरोधी पक्षही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत एकत्र येतात. मनसे आणि शिवसेना हे पक्ष म्हणून आगामी महापालिका निवडणुकीत एकत्र दिसण्याची शक्यता नाही. पण पुढच्या विधानसभा निवडणुकीवेळी काय राजकीय चित्र असेल यावरही काही गोष्टी अवलंबून असतील," असं राऊत यांना वाटतं.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती