उदयनराजेंचा भाजपमध्ये प्रवेश, साताऱ्याच्या राजकारणात काय बदल होणार

शनिवार, 14 सप्टेंबर 2019 (11:40 IST)
स्वाती पाटील राजगोळकर
भाजप अध्यक्ष अमित शाह, भाजप कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उदयनराजे यांनी दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश केला. अमित शाह आणि मोदी यांनी भारताची लोकशाही बळकट केली असं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं.
 
लढाई रयतेच्या विकासासाठी फक्त अशा आशयासह ट्वीट करत अखेर साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी स्वतःच्या भाजप प्रवेशाची घोषणा होती
 
उदयनराजेंच्या भाजप प्रवेशामुळे राज्याच्या आणि विशेष करून साताऱ्याच्या राजकारणावर नेमका काय परिणाम होऊ शकतो हे पाहणं महत्वाचं आहे.
 
उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशाचा भाजपला फायदा होणार नाही असं राजकीय विश्लेषक प्रकाश पवार यांना वाटतं. याची कारणं सांगताना ते सांगतात, "राजेंना एकनिष्ठ असलेला मतदार नाही."
 
सातारा जिल्ह्यातील जनतेचं नातं राष्ट्रवादीशी आहे त्यामुळेच ते निवडून येत होते. कदाचित भाजप आणि राष्ट्रवादी कॉग्रेसच्या विरोधी भूमिकेमुळे उदयनराजे एकटे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं पवार यांना वाटतं.
 
भाजपमध्ये जाण्याचा उदयनराजेंना कितपत फायदा?
उदयनराजे छत्रपती घराण्यातील आहेत या गोष्टीचा भाजपला प्रचारात वापर करता येईल मात्र यामुळं भाजपला किती मतं मिळतील याबाबत आपण साशंक आहोत असं पवार यांना वाटतं.
 
उदयनराजे निवडून येण्यामागे राष्ट्रवादी कॉंग्रेसला मानणारा वर्ग आणि संभाजी भिडे यांना मानणाऱ्या युवकांची मतं कारणीभूत आहेत, असं पवार सांगतात.
 
गेल्या काही काळात दोन्ही राजेंमधला वाद शांत आहे. शिंवेद्रसिंहराजे जिल्ह्यात सर्वांना धरून चालणारे आहेत. हे पाहता शिवेंद्रसिंहराजेच्या रूपानं भाजपकडे एक आमदार निवडून येईल हा एकमेव फायदा भाजपला होईल. भाजपने दोन्ही राजेंना पक्षात घेऊन सरंजामदारांना जवळ केलं आहे. पण प्रत्यक्षात याच लोकांवर सामान्य जनतेचा मोठा रोष आहे. येत्या काळात हा रोष मतांच्या रुपाने व्यक्त होईल असं पवार यांना वाटतं.
 
राष्ट्रवादी काँग्रेस हा जनतेचं मत आकलन करणारा पक्ष आहे. त्याचं उदाहरण म्हणजे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या रूपानं सामान्य जनतेत नेता म्हणून नावारूपाला आले आहेत. त्याचा फायदा राष्ट्रवादी कॉंग्रेसला होईल याउलट ज्यांच्यावर लोकांचा राग आहे अशांनाच भाजपने जवळ केल्याने याचा परिणाम नकारात्मक होईल असं पवार यांना वाटतं.
राष्ट्रवादीला बालेकिल्ल्यातच धक्का
सातारा जिल्ह्याच्या राजकारणात उदयनराजेंचा भाजप प्रवेश हा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का आहे असं दैनिक लोकमतचे सातारा आवृत्ती प्रमुख दीपक शिंदे यांना वाटतं. उदयनराजेचं जिल्ह्यावर वर्चस्व आहे. शत्रुचा शत्रू तो आपला मित्र या नितीनुसार रामराजे, शिवेंद्रसिंहराजे यांच्या विरोधात उदयनराजे यांचा गट कार्यरत आहे.
 
त्यामुळे उदयनराजेंचा गट उपद्रवमूल्य म्हणून यापुढेही कार्यरत राहील आणि याचा फटका राष्ट्रवादीला बसू शकतो. दोन्ही राजे एकत्र असले तरी ते एकमेंकाना मदत करतील यांची शाश्वती नाही. त्यामुळं शिंवेंद्रसिंहराजेंना स्वबळावरच जिंकून यावं लागेल.
 
कास धरणाची उंची वाढवणं आणि सातारा शहरात भूयारी मार्ग तयार करणे ही कामं निधीअभावी रखडली होती. राजेंच्या प्रवेशामुळं या कामांसाठी निधी मिळण सोपं होईल अशी शक्यता शिंदे यांनी व्यक्त केली.
 
'शिवरायांचे वंशज ही ओळख भाजपसाठी महत्त्वाची'
उदयनराजेंचा भाजप प्रवेश हा साताऱ्यातील पवार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या निष्ठावंताना कितपत रुचेल हा प्रश्नच आहे. लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयनराजेंना अडचणींचा सामना करावा लागेल, असं सकाळचे पत्रकार प्रविण जाधव यांना वाटतं.
सातारा आणि कराड उत्तर या मतदार संघात शिवेंद्रसिंहराजेच्या गटाचा प्रभाव असल्याने याचा फायदा भाजपला होईल पण शिवरायांचे वंशज म्हणून असलेल्या ओळखीचा भाजपकडून प्रचारात मराठा कार्ड म्हणून वापर करण्याच्या हेतूने हा प्रवेश केला असेल असं जाधव यांना वाटतं.
 
उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशाने राष्ट्रवादी कॉंग्रेसला तोटा होणार नाही असं सकाळचे पत्रकार प्रविण जाधव यांना वाटतं, राजघराण्यातील व्यक्ती भाजपमध्ये आहे याचा राज्यभरात भाजप केवळ प्रचारासाठी वापर करेल. पण सातारा जिल्ह्यात मात्र याचा मतांच्या स्वरूपात फायदा होणार नाही."
 
उदयनराजे यांनी विकासकामांसाठी भाजपमध्ये प्रवेश केला असला असं भाजप म्हणतंय. तरी या आधी आघाडीचे सरकार असताना देखील साताऱ्यात विकासकामं झाली नाही त्यामुळं राजेंच्या प्रवेशामुळे साताऱ्याच्या विकासकांमावर परिणाम होईल असं वाटत नाही," असं जाधव यांनी म्हटलं.
राजेच्या जाण्याने सामान्य जनतेत असंतोषाचं वातावरण असल्याचं दिव्य मराठीचे पत्रकार विजय मांडके यांना वाटतं. नरेंद्र मोदीच्या लाटेतही दोन वेळा साताऱ्यात उदयनराजे निवडून आले होते.
 
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी उदयनराजेंना निवडून दिलं. त्यामुळं आता पुन्हा भुर्दंड का भरायचा असा सवाल सामान्य जनता करेल असंही मांडके यांना वाटतं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती