टोमॅटोनं ग्राहकांना, तर कांद्यानं शेतकऱ्यांना रडवलं कारण...

रविवार, 29 मे 2022 (14:47 IST)
संपूर्ण देशभरात उष्णतेच्या लाटेमुळे शेतमालाचे मोठे नुकसान होत असल्यामुळे खाद्यपदार्थाच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशात राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी मात्र ढासळल्या दरामुळे चिंतेत आहेत. तर बाजारात आवक घटल्यामुळे टोमॅटो बाजारात मात्र तेजी दिसून येत आहे.
 
यावर्षी राज्यात जवळपास सहा लाख हेक्टरवर कांद्याची लागवड झाली असून देशभरात 12 लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. असे असले तरी उष्णतेची लाट, नैसर्गिक आपत्ती, करपाजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे कांद्याच्या उत्पादकतेत मोठ्या प्रमाणात घट आली आहे.
 
कांदा भाव निच्चांकी पातळीवर
उत्पादकतेत घट आली असली राज्यात आजघडीला कांद्याचे भाव निच्चांकी पातळीवर गेल्याचे दिसून येत आहे.
 
याविषयी बोलताना सोलापूर जिल्ह्यातील उपळाई येथील शेतकरी ओंकार पाटेकर सांगतात, "मला कांद्याला प्रतिकिलो फक्त एक रुपया एवढा दर मिळाला. त्यामुळे कांद्याची सोलापूर बाजारात विक्री केल्यांनतर आलेल्या पैशातून कांद्याचा वाहतूक खर्च आणि हमालीही निघाली नाही. वाहतूक खर्च भरण्यासाठी मला माझ्या खिशातून 7 रुपये भरावे लागले."
 
"सध्या अजून माझ्या शेतात 80 पोती कांदे पडून आहेत. पण बाजारात आणून नुकसान सहन करण्यापेक्षा ते शेतामध्येच सडू दिलेले बरा, असे वाटते" अशी प्रतिक्रिया पाटेकर देतात.
 
तर नाशिक येथील कांदा उत्पादक शेतकरी सागर लांडगे म्हणतात, "नाशिक मध्ये सध्या नाफेडच्या माध्यमातून कांद्याची खरेदी चालू आहे. नाफेडचा दर 1100-1250 दर आहे. मागच्या वर्षी याच काळात नाफेडचा दर 1700 रुपये होता."
 
तर भाव वाढल्यानंतरही सरकारने लक्ष देऊ नये
"कांद्याचे दर वाढल्यावर शासनाकडून दर रोखण्यासाठी प्रयत्न केले जातात, मग दर पडल्यावर शासन याकडे ढुंकूनही का पाहत नाही" असा प्रश्न महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघाचे अध्यक्ष भारत दिघोळे विचारतात.
 
ते म्हणतात, "जेव्हा बाजारात दर वाढतात, साधारणपणे दर 3500 - 4500 पर्यंत पोहचले की केंद्रीय पथके येतात. पाहणी करतात. निर्यातबंदी सारखी पावले उचलली जातात, आयात केली जाते. पण दर पडल्यानंतर मात्र सरकार काहीच लक्ष देत नाही."
 
"जर भाव पडल्यानंतर सरकारला लक्ष द्यायचे नसेल तर भाव वाढल्यानंतर देखील यामध्ये सरकारने लक्ष देऊ नये. बाजाराच्या मागणीनुसार भाव कमी-जास्त होत राहतील," अशी अपेक्षा दिघोळे व्यक्त करतात.
 
टोमॅटो बाजारात तेजी का?
राज्यात कांद्याचे भाव कोसळले असले तरी टोमॅटोच्या भावात मात्र मोठ्या प्रमाणात तेजी दिसून येत आहे.
 
"वाढती उष्णता, बाजारात यापूर्वी नसलेली मागणी आणि राज्यात झालेली कांदा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड या तीन बाबीचा परिणाम टोमॅटो मार्केटवर झाला," असे मत बाजारभाव अभ्यासक दीपक चव्हाण मांडतात.
 
"राज्यात 15 एप्रिलपासून टोमॅटो बाजारात तेजी असून सध्या पुणे-मुंबई मध्ये चांगल्या मालाला 40-50 रुपये या प्रमाणात दर मिळत आहे," असे फलटण येथील कांदा उत्पादक शेतकरी अजित कोरडे सांगतात.
 
ते म्हणतात, "राज्यात यंदा अनेक भागात तापमान 40 डिग्रीपेक्षा जास्त होते. एवढ्या तापमानात टोमॅटो उत्पादन शक्य नाही. त्यामुळे यंदा अति तापमानामुळे राज्यातील जवळपास 30 टक्के उत्पादनात घट झाली आहे.
 
"दक्षिण भारतात सध्या टोमॅटो मार्केट मध्ये मोठी तेजी असून त्याला जवळपास 60-70 रुपये भाव मिळत आहे, पण 15 जूननंतर बाजारात बदल दिसेल," असल्याचेही ते सांगतात.
 
बदलत्या हवामानाचा शेतमालाला फटका
यावर्षी देशभरात वाढत्या तापमानामुळे शेतमालाला मोठा फटका बसला आहे. कांदा आणि टोमॅटो यांच्या भावावर देखील याचा परिणाम झाला आहे.
 
"राज्यातील अहमदनगर, नाशिक, पुणे या भागात या भाजीपाला उत्पादक पट्ट्यामध्ये तापमान दरवर्षी 40 डिग्रीपेक्षा जास्त जात नाही पण यावर्षी 20 मार्चपासून तापमान 40 डिग्रीपेक्षा जास्त दिसून आले," अशी माहिती हवामान अभ्यासक उदय देवळाणकर सांगतात.
 
याविषयी बाजारभाव अभ्यासक दीपक चव्हाण म्हणतात, "उष्णतेच्या लाटेमुळे यंदा दुसऱ्या प्रतीच्या मालाचे उत्पादन जास्त झाले आहे. त्यामुळे कमी टिकवण क्षमता असलेला माल होल्ड करू शकत नाही. यामुळे बाजारात सप्लाय वाढल्यामुळे भाव कोसळले"
 
टोमॅटो पिकाबद्दल बोलताना ते म्हणतात, "यंदा वाढत्या तापमानामुळे टोमॅटो पिकाची लागवड कमी झाली होती आणि त्यानंतर झालेल्या अतिपावसामुळे झालेली लागवड देखील मोठ्या प्रमाणात खराब झाल्या. याचा परिणाम बाजारातील आवकेवर झाला."
 
शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे?
सध्या बाजारात दर ढासळले आहेत या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायला हवी? या प्रश्नावर बाजारभाव अभ्यासक दीपक चव्हाण म्हणतात, "साधारणपणे जून महिन्यापासून कांद्याचे दर स्थिर होतील. त्यामुळे कमी टिकवणं क्षमता असलेला मालही तोपर्यंत होल्ड करावा."
 
ते म्हणतात, "सध्या ज्या मालाला चांगला दर मिळतो आहे. हा चांगला मालही काही काळ होल्ड केल्यास शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो."
 
वाढत्या तापमानाबद्दल हवामान अभ्यासक उदय देवळाणकर म्हणतात "यावर्षी 122 वर्षामतील उच्चांकी तापमान आढळून आले पण दरवर्षी अशा प्रकारचे पॅटर्न पुन्हा दिसतील. हे देखील पाहावे लागेल आणि तश्या पद्धतीच्या उपाययोजना कराव्या लागतील."
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती