Tanhaji: 'तान्हाजी'मध्ये तथ्यांशी छेडछाड, तो इतिहास नाही - सैफ अली खान
सोमवार, 20 जानेवारी 2020 (16:54 IST)
तान्हाजी चित्रपटात ऐतिहासिक संदर्भांशी छेडछाड करण्यात आली असून, हा धोकादायक प्रकार असल्याचं मत अभिनेता सैफ अली खानने व्यक्त केलं आहे.
'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' चित्रपटात अजय देवगण तानाजींच्या मुख्य भूमिकेत आहे. सैफ या चित्रपटात उदयभान राठोडच्या भूमिकेत आहे.
'फिल्म कम्पॅनियन'साठी सिने पत्रकार आणि चित्रपट समीक्षक अनुपमा चोप्रा यांना दिलेल्या मुलाखतीत सैफने सांगितलं की त्याला उदयभान राठोडचं पात्र अतिशय भावलं होतं, त्यामुळे तो ही भूमिका सोडू शकलो नाही. मात्र यामध्ये राजकीय नरेटिव्ह बदलण्यात आला आहे आणि ते धोकादायक आहे.
सैफ मुलाखतीत म्हणतो, "काही कारणांमुळे मी ठाम भूमिका घेऊ शकलो नाही. पुढच्या वेळी तसं वागेन. ही भूमिका करण्यासंदर्भात मी अतिशय उत्साहात होतो. मात्र हा इतिहास नाही, इतिहास काय होता, हे मला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे."
सैफ पुढे म्हणतो, "भारत ही संकल्पना इंग्रजांनी आपल्याला दिली असं मला वाटतं. त्याआधी भारत अशी संकल्पना नव्हती असं मला वाटतं. या चित्रपटात ऐतिहासिक काहीही नाही. यासंदर्भात आम्ही काहीही तर्कशुद्ध सांगू शकत नाही. कलाकार उदारमतवादी विचारधारा मानतात मात्र लोकानुनयामुळे ही चांगली परिस्थिती नाही. मात्र सत्य हेच आहे."
तान्हाजी' चित्रपटात इतिहासाची व्याख्या चुकीची पद्धतीने केली गेली असल्याचं सैफने सांगितलं. कोणत्याही चित्रपटाच्या व्यावसायिक यशात इतिहासाची चुकीची व्याख्या करून मांडलेल्या गोष्टी असतात. त्याचा वापर केला जातो.
सैफ अली खानने कबीर खानच्या एका बोलण्याचा संदर्भ दिला. मी खराब अभिनय आणि विस्कळीत पटकथा हे सहन करू शकत नाही, असं कबीर खान म्हणाला होता. राजकीय नरेटिव्हमध्ये व्यावसायिक यशासाठी सूट सहन केली जात नाही."
तान्हाजी चित्रपटात दाखवण्यात आलेल्या राजकारणावरून उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे. तान्हाजी चित्रपटातल्या राजकारणाशी तुम्ही किती सहमत आहात, असं विचारल्यावर सैफ म्हणाला, "तान्हाजी चित्रपटात दाखवलेला इतिहास इतिहास नाही. मी याच्याशी अभिनेता म्हणून नव्हे तसेच भारतीय म्हणूनही सहमत नाही. अशा स्वरूपाच्या कथानकासंदर्भात मी याआधीही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पुढच्या वेळेपासून मी अशी भूमिका स्वीकारताना काळजी घेईन.
"ही भूमिका मला भावली. हा इतिहास नाही हे मला माहिती आहे. मग असा प्रश्न पडतो की मी ही भूमिका का साकारली? लोकांना असं वाटतं असे चित्रपट चालतात आणि हे धोकादायक आहे. एकीकडे आपण सद्सदविवेकबुद्धी आणि उदारमतवादाबद्दल बोलतो. दुसरीकडे लोकप्रिय गोष्टींच्या आहारी जातो."
बॉलिवुडमध्येही ध्रुवीकरण वाढतं आहे का? यावर सैफ म्हणाला, "हो तसंच घडतंय. फाळणीनंतर माझ्या कुटुंबातली जी माणसं देश सोडून गेली, त्यांना वाटलेलं फाळणीनंतर इथे राहणं सुरक्षित नसेल. बाकी सदस्यांनी भारतातच राहण्याचा निर्णय घेतला, कारण त्यांना वाटलेलं हा धर्मनिरपेक्ष देश आहे आणि इथे राहताना कोणतीही अडचण येणार नाही."
तो पुढे सांगतो, "मात्र आता गोष्टी ज्या दिशेने जात आहेत, ते बघता धर्मनिरपेक्षतेचं वातावरण राहणार नाही. मी माझ्या घरच्यांबद्दल विचार केला तर सगळं छान चाललं आहे. सगळे आनंदात आहेत. कुणी डॉक्टर आहे, मुलांचं शिक्षण चांगल्या पद्धतीने होतंय, गुंतवणूक चांगल्या पद्धतीने होत आहे आणि त्याचा परतावाही चांगला आहे.
"मात्र देशात धर्मनिरपेक्षतता आणि बाकी गोष्टींवर जी चर्चा होते आहे, त्यात आम्ही सामील नाही. आम्ही त्यासाठी लढा देत नाहीयोत. विद्यार्थी लढा देत आहेत. आम्ही कोणत्याही मुद्यावर एखादी भूमिका घेतो किंवा बोलतो तेव्हा आमच्या चित्रपटांवर बंदी घातली जाते. लोकांना त्रास दिला जातो. म्हणून लोक भूमिका घेणं टाळतात. बहुतांश लोक स्वत:चं, घरच्यांचं आणि कामाचं नुकसान करून घेऊ इच्छित नाहीत."
तान्हाजी चित्रपटात आहे तरी काय?
या चित्रपटात मुघलांना विदेशी दाखवण्यात आलं होतं. मुघल भारतात पिढ्यानपिढ्या राहत होते, मात्र संपूर्ण चित्रपटात त्यांना संपूर्ण पद्धतीने विदेशी दाखवण्यात आलं आहे. मुघल-ए-आझम चित्रपटात अकबरला भारतीयच दाखवण्यात आलं होतं. 'जोधा अकबर' चित्रपटात ऐतिहासिक घटनांच्या परस्परविरोधी दाखवण्यात आलं होतं.
इतिहासाचे जाणकार हरबन्स मुखियांनी बीबीसीला सांगितलं की 'जोधा अकबर' चित्रपटात जोधा बाईंना अकबरची पत्नी म्हणून दाखवण्यात आलं होतं. या नावाच्या कोणी महिलाच नव्हत्या.
"पद्मावत चित्रपटात अल्लाउद्दीन खिलजीला अय्याशी करणारा मुस्लीम शासक म्हणून दाखवण्यात आलं होतं. तान्हाजी चित्रपटात मुघलांबद्दल दाखवण्यात आलेलं सारंकाही काल्पनिक आहे. यामध्ये मुघल शासक स्वत:लाच संधीसाधू म्हणवतो. चित्रपटात मुघल आणि मुसलमान पात्रांना हिरव्या कपड्यात दाखवण्यात आलं आहे, ही एक साचेबद्ध प्रतिमा आहे."
चित्रपटाच्या सुरुवातीला सूत्रधार दावा करतो की हिंदूंच्या (राजपूत) विरुद्ध हिंदू (मराठे) यांना लढावं लागणं औरंगजेबाने दिलेला सगळ्यात मोठा धोका आहे. इतिहासानुसार मुघलांच्या मनसबदारीत राजपूतांची भूमिका निर्णायक होती.
मात्र चित्रपटातलं हे बोलणं पुढे काय बघायला मिळणार, याची झलक देतो.
मराठ्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला प्रचंड महत्त्व दाखवण्यात आलं आहे. दुसरीकडे मुघल आणि राजपूतांच्या महत्त्वाकांक्षेला तितकंचं मोल नाही.
सैफ अली खान उदयभान राठोड यांच्या भूमिकेत आहेत. उदयभान यांच्या पात्राला नकारात्मक दाखवण्यात आलं आहे, कारण त्यांना औरंगजेबाशी इमानदार असं दाखवण्यात आलं आहे.