सोलापूर निकाल: प्रणिती शिंदेंची विजयी हॅट्रीक, एमआयएम पराभूत

शनिवार, 26 ऑक्टोबर 2019 (10:47 IST)
माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या आणि आमदार प्रणिती शिंदेंना आपला यां असलेल्या सोलापूर शहर मध्य मतदारसंघांत आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी बरीच धडपड करावी लागली.
 
पहिल्या काही फेऱ्यांमध्ये पिछाडीवर असलेल्या काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंना नंतर आघाडी मिळत गेली.
 
सोलापुरात प्रणिती यांच्याबरोबरीने शिवसेनेचे दिलीप माने, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे नरसय्या आडम, एमआयएमचे फारुख शाब्दी आणि अपक्ष उमेदवार महेश कोठे रिंगणात होते.
 
शेवटच्या फेरीपर्यंत प्रणिती शिंदे यांना 48 हजार 832 मते मिळाली तर दुसऱ्या क्रमांकावरील एमआयएमचे उमेदवार फारूक शाब्दी यांना 36 हजार 889 मते मिळाली. एकूण 11 हजार 943 मताधिक्याने शिंदे यांनी विजय प्राप्त केला.
लढतीची पार्श्वभूमी
प्रणिती शिंदे यांची महिला आणि तरुणांमध्ये क्रेझ आहे. त्यांचा जनसंपर्कही चांगला आहे. त्याचा फायदा त्यांना मिळाला.
 
तसंच यावेळी त्यांचेच एकेकाळचे सहकारी दिलीप माने आणि महेश कोठे त्यांच्याविरोधात उभे ठाकले आहेत. त्याशिवाय आडम आणि शाब्दी यांच्याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही.
2009 निवडणुकीत चारही पक्ष वेगळे लढल्याने भाजप आणि सेनेत झालेल्या मतविभाजनाचा प्रणिती यांना फायदा झाला होता.
 
यंदा शिवसेनेने ऐनवेळी महेश कोठे यांचं तिकीट कापून माजी आमदार दिलीप माने यांना उमेदवारी दिली. निराश झालेल्या कोठे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारलं आहे. नरसय्या आडम यांना माकपची मुलूखमैदानी तोफ मानलं जातं. मतदारसंघात बहुतांश कामगार वर्ग असून त्यांच्यावर आडम यांचा प्रभाव आहे.
शहर मध्य मतदारसंघात एक तृतीयांश मतं मुस्लीम समाजाची असून मागच्या वेळी त्यांनी MIM पक्षाच्या मागे आपली ताकद उभी केली होती. विशेषतः मुस्लीम तरुणांमध्ये हा पक्ष लोकप्रिय आहे. त्यामुळे MIMचे उमेदवार शाब्दी यांना कमी लेखून चालणार नाही.
 
प्रणिती शिंदे या दोनवेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या आहेत. 2009 मध्ये त्या पहिल्यांदा निवडून आल्या. कमी वयातील आमदार म्हणून त्यांनी राज्याचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यानंतर 2014 मध्ये मोदी लाटेत लोकसभेत वडिलांचा पराभव होऊनसुद्धा प्रणिती शिंदे यांनी विधानसभेत आपली जागा राखली होती.
 
महेश कोठे 2009ला काँग्रेसकडून तर 2014ला शिवसेनेकडून रिंगणात होते. दोन्ही वेळी त्यांना विजयाने हुलकावणी दिली. त्यांनी 2019 साठीही तयारी केली होती. पण शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख मंत्री तानाजी सावंत आणि इतर नेत्यांच्या राजकीय व्यूहरचनेनुसार उमेदवारी दिलीप माने यांना मिळाली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती