'टुकडे-टुकडे गँग'ला अद्दल घडवा - अमित शाह

शुक्रवार, 27 डिसेंबर 2019 (08:40 IST)
''नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत विरोधक संभ्रम निर्माण करत आहेत. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील 'टुकडे-टुकडे गॅंग' दिल्लीत अशांतता पसरवत असून तिला अद्दल घडवा,'' असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे.  
 
दिल्ली विकास प्राधिकरणानं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जामिया नगर आणि सीलमपूरमधील हिंसक आंदोलनाचे खापर शाह यांनी विरोधकांवर फोडले.
 
त्यांनी म्हटलं, ''काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधकांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत (CAA) जनतेची दिशाभूल केली. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक संसदेत मांडले, तेव्हा विरोधकांनी अपप्रचार सुरू केला. दिल्लीतील वातावरण बिघडविण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील 'टुकडे-टुकडे गँग' कारणीभूत आहे. त्यांना अद्दल घडविण्याची वेळ आली आहे.''
 
''दिल्लीनं लोकसभेच्या सातही जागा भाजपला दिल्या. आता दिल्लीच्या विकासासाठी विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांना निवडून आणा,'' असंही त्यांनी म्हटलं.
 
दरम्यान, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात येत आहेत. या आंदोलनात आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 1,113 जणांना अटक करण्यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती